‘टेक्नोसॅव्ही’ शिक्षणपद्धतीची ‘आनंदी’ वाटचाल
जागर स्त्री शक्तीचा लोगो
आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ ः शिक्षण क्षेत्रात सतत नवनवीन उपक्रम करणे, प्रयोग करणे हा त्यांचा ध्यासच... याच ध्यासातून ‘स्पीड ब्रेकरवर वीजनिर्मिती’ या त्यांच्या विज्ञान प्रकल्पाला २००२-०३ मध्ये पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने उपलब्ध वस्तूंचा वापर करून ‘डिश वॉशर’चे चलित मॉडेल बनवले. विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये, अन् त्यांना दप्तराचे ओझे वाटू नये या तळमळीतून २०१६ मध्ये ‘एकात्मिक पाठ्यपुस्तके’ हा प्रयोग त्यांनी सर्वात प्रथम राबवला. राज्य शासनाने बालभारतीद्वारे अशी पुस्तके छापली, अमलात आणली. आणि तंत्रस्नेही शिक्षिका आनंदी जगंम यांच्या प्रयत्नांना फळ मिळाले.
गेल्या पंचवीस वर्षांपासून त्या शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत. बीएस्सी. डी. एड. करून शिक्षिका म्हणून रायगड जिल्ह्यातून त्यांचा या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला होता. सध्या पिंपरी-चिंचवड मनपाच्या म्हेत्रेवाडी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच कौशल्यांचीही आवड निर्माण करून देण्यावर त्या काम करतात. विद्यार्थ्यांसाठीच्या तळमळीची दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागातर्फे ‘मेंटॉर टिचर’ म्हणून त्यांची निवड केली. या अंतर्गत त्या ४१ शिक्षकांना मदत करत आहेत.
बदलत्या शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. हे ओळखून तिने ‘टेक्नोसॅव्ही’ बनण्याचा ध्यास घेतला आणि तो पूर्णही केला. गुगल फॉर्म, शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, अनेक शैक्षणिक ॲप्सचा अध्यापनात वापर, अलेक्सा, एआय, चॅट जीपीटी या तंत्रांची कास धरून तिने विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावली. ‘आनंदी वाचन आणि लेखन’ हा उपक्रम राबवून वर्ग इंग्रजीसाठी १०० टक्के तयार केला.
पीसीएमसी पब्लिक स्कूल म्हेत्रेवाडी ठरली ‘पीएम श्री’
केंद्र शासनाच्या ‘पीएम श्री’ या योजनेत पीसीएमसी पब्लिक स्कूल म्हेत्रेवाडी शाळा निवडली गेली. शाळेला एक कोटींचा निधी मंजूर झाला. शाळा निवडीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जेव्हा संपूर्ण महापालिकेत एकच आयएसओ मानांकन प्राप्त शाळा होती, तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन दुसऱ्या क्रमांकाला अजंठानगरच्या शाळेला आयएसओ मानांकन मिळवून दिले, त्यांच्या या कामाचा ठसा शिक्षण क्षेत्रात उमटत आहे.
डॉक्टर बनण्याचे स्वप्न अपूर्णच
खरं तर त्याचं स्वप्न होत डॉक्टर होण्याचे.. त्या स्वप्नांच्या जवळपास आनंदी पोहोचल्या देखील होत्या. मात्र, काही कारणाने ते शक्य झाले नाही. डॉक्टर होता आले नाही, तरीही त्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणाऱ्या ‘डॉक्टर’ मात्र झाल्या आहेत. आपल्या उपक्रमशील, अभ्यासू व विज्ञाननिष्ठ वृत्तीमुळे त्या विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रिय आहेत.
‘‘शिक्षण क्षेत्रात, अशैक्षणिक कामे वगळता काम करणे हा खरं तर आनंदसोहळा असतो. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येक पैलू मुले टिपत असतात. भविष्यातील शैक्षणिक कार्यात एनएमएमएस, मंथन, शिष्यवृत्ती इत्यादी परीक्षांमध्ये विद्यार्थी कसे चमकतील? यासाठी प्रयत्न करण्याचा मानस आहे.’’
- आनंदी जंगम, पदवीधर शिक्षिका महापालिका पब्लिक स्कूल म्हेत्रेवाडी क्र.९२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

