मराठीच्या अभिजात दर्जाची लढाई यशस्वी
पिंपरी, ता.५ ः प्राचीन परंपरा, साहित्यिक श्रीमंती, आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे एखाद्या भाषेला अभिजात भाषा म्हणून ओळखले जाते. तो दर्जा मिळवण्यासाठी काही विशिष्ट निकष पूर्ण करावे लागतात. मराठीने हे सर्व निकष पूर्ण केले आणि म्हणूनच तिचा दर्जा अभिजात भाषांमध्ये समाविष्ट केला गेला. एक लढाई यशस्वी झाली. आपल्या मराठी भाषकांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, अशा शब्दांत पिंपरी-चिंचवडमधील साहित्यिकांनी आनंद व्यक्त केला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे अभिमानास्पद आहे. आता जबाबदारी लेखकांची आहे. त्यांनी या दर्जाला कायम ठेवण्यासाठी आता जोमाने कार्यरत व्हावे. आपले लिखाण, लिखाणाची शैली, अभिजात दर्जाला साजेशी असावी. आपण इतिहास चाळून अभिजात दर्जा मिळविला. त्यामुळे, भविष्यात इतिहास आजच्या वर्तमानाची चाहूल घेणार आहे. हे साहित्यिकांनी विसरू नये.
-राज अहेरराव, सदस्य, मराठी भाषा संवर्धन समिती, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
देशात तिसऱ्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा आणि जगामध्ये दहाव्या क्रमांकावरील दहा कोटी लोकांची भाषा अशा खऱ्या अर्थाने मराठी ही एक समृद्ध भाषा आहे. आता अभिजात दर्जा मिळाल्यामुळे भाषेचा प्रसार आणि प्रचार जास्त जोमाने होईल. भाषेचे साहित्य इतर भाषांमध्ये जाईल आणि संपूर्ण जगामध्ये मराठी भाषेच्या वैभवाची ओळख नव्याने निर्माण होईल. आपण सर्वांनी ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा म्हणून आग्रहाने मराठीचा वापर वाढवणे गरजेचे आहे. आपली भाषा जोपासत ती वृद्धिंगत होण्याचा संकल्प या निमित्ताने करू या !
- राजेंद्र घावटे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड साहित्य मंच
मराठी भाषा प्राचीन असून या भाषेत सतत श्रेष्ठ दर्जाची वाङमय निर्मिती होत राहिली आहे. अभिजात भाषेसाठी लागणारे सर्व निकषही मराठी भाषा पूर्ण करते. अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला केंद्र सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. मराठी भाषा जवळपास २ हजार वर्ष इतकी जुनी आहे.
- सूरज बाबर, अध्यक्ष, कृषी पर्यावरण शिक्षण, नागरी समस्या निवारण संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

