दहा गावांच्या समावेश प्रस्तावावर दफ्तर दिरंगाईची ‘धूळ’
पिंपरी, ता.५ ः पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील दहा गावे पिंपरी-चिंचवड नगरभूमापन कार्यालयात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पाच वर्षांपासून शासन दरबारी धूळखात पडून आहे. अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे, या दहा गावांतील नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांना आपल्या विविध कामांसाठी पुण्यातील हवेली भूमी अभिलेख कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे, नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे.
पिंपरीतील डिलक्स चौकाजवळ पिंपरी-चिंचवड नगरभूमापन कार्यालय असून त्यामध्ये महापालिका हद्दीतील १९ गावांचा समावेश आहे. मोजणी आणि फेरफारच्या कामासाठी या कार्यालयांत दिवसाकाठी सुमारे ६० नागरिक येतात. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चऱ्होली, चोवीसावाडी, डुडुळगाव, मोशी, चिखली, देहू, किन्हई, रावेत, मामुर्डी, किवळे आदी गावांतील काही भाग पिंपरी-चिंचवड नगर भूमापन कार्यालय तर उर्वरित भाग हवेली भूमी अभिलेख कार्यालयात विभागलेला आहे. काही गावांतील गावठाण क्षेत्र पिंपरी-चिंचवड नगरभूमापन कार्यालयात समाविष्ट आहे. तर उर्वरित क्षेत्र येरवड्याच्या हवेली भूमी अभिलेख कार्यालय अंतर्गत येत आहे. त्यामुळे, शहरातील नागरिकांवर जवळच्या कार्यालयाऐवजी येरवडा येथे हेलपाटे मारण्याची पाळी येत आहे.
सर्व गावांचा समावेश गरजेचा
नागरिकांची गैरसोय लक्षात घेता महापालिका हद्दीतील सर्वच गावांचा पिंपरी-चिंचवड नगर भूमापन कार्यालया अंतर्गत समावेश करणे गरजेचे आहे. या मागणीसाठी माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी देखील विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने शासनाने त्याबाबतचा प्रस्ताव जमाबंदी कार्यालयाला सादर करण्याचे आदेश दिला होता. त्यानंतर, २०१८-१९ मध्ये जमाबंदी कार्यालयाकडून शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र, हा शासनाकडे हा प्रस्ताव धूळखात पडून असल्याचे चित्र आहे. अद्याप यावर कोणताही तोडगा निघाला नाही.
नगर भूमापन कार्यालयातील कामाचे स्वरूप
प्रॉपर्टी कार्ड, शेत जमिनीची मोजणी, जमिनीचे नकाशे, भू-संपादनाची मोजणी, न्यायालयातून आलेल्या प्रकरणाचे निर्गतीकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीच्या मोजणी, खरेदी विक्री, वारसा वाटणी नोंदी, आकार फोड आदींसह त्या संदर्भातील दाखले, नमुने देण्याचे काम नगर भूमापन कार्यालयाकडून केले जाते.
एका कामासाठी तीन दिवस हेलपाटे
हवेली भूमी अभिलेख कार्यालय येरवड्यात असल्याने अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास करून शहरातील नागरिक, विकसकांना तिथे जावे लागत आहे. त्या ठिकाणी आपल्या कामांसाठी दिवस घालवावा लागत आहे. अनेक वेळा कामे पूर्ण न झाल्याने पुन्हा परतावे लागत आहे. एका कामासाठी तीन दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याचे विकसक सांगत आहेत. नागरिकांची ही गैरसोय टाळण्यासाठी दहा गावे पिंपरीतील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी होत आहे.
मोशी, चिखली, डुडुळगावसह इतर गावांतील नागरिकांना पुण्यातील येरवडा येथील हवेली कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. तिथे एका कामासाठी संपूर्ण दिवसभर बसावे लागत आहे. एका दिवसाच्या कामाला तीन दिवसांचा वेळ जात आहे. नागरिकांना मानसिक आणि शारिरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे, हवेली कार्यालयाऐवजी पिंपरी-चिंचवडमधील कार्यालयात त्या गावांचा समावेश होणे गरजेचे आहे. ते सर्व नागरिकांना सोयीचे होईल.
- संतोष बारणे, संचालक, सिल्व्हर ग्रुप
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सीमावर्ती भागातील अनेक गावे हवेली भूमी अभिलेख कार्यालयांच्या अंतर्गत येतात, अशी गावे पिंपरी-चिंचवड नगर भूमापन कार्यालयाला संलग्न करण्यासाठी २०१८-१९ मध्ये जमाबंदी कार्यालयाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
- अमित ननावरे, नगर भूमापन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

