समाविष्ट गावांचा होतोय कायापालट
पिंपरी, ता. ९ ः पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. विशेषतः १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्था, वीजपुरवठा, उद्याने अशा विकास आराखड्यांतील कामांवर भर दिला आहे. कारण, या भागांमध्ये आता नागरी वस्ती वाढू लागली आहे. गगनचुंबी इमारतींचे गृहप्रकल्प साकारत आहेत.
चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी, दिघी, डुडुळगाव, मोशी, चिखली, तळवडे यांसह वाकड, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी आदी गावे १९९७ मध्ये महापालिकेत समाविष्ट झाली. त्यांच्या विकासासाठी आराखडा (डीपी) मंजूर झाला. पंधरा वर्षांपूर्वी ताथवडेगाव महापालिकेत आले. त्याच्या विकासाचाही आराखडा करण्यात आला. त्यांसह समाविष्ट गावांतील विविध रस्त्यांना आयुक्त शेखर सिंह यांनी गेल्या आठवड्यात मंजुरी दिली. तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी चार वर्षांपूर्वी भोसरी मतदारसंघातील दिघी, तळवडे, चिखली, मोशी परिसरातील तब्बल २७ हेक्टर गायरान जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली होती. या जागांवर रस्ते, शाळा, उद्याने, पोलिस ठाणे, अग्निशामक केंद्र, रुग्णालये, पाण्याच्या टाक्या उभारण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार आता कामे सुरू आहेत. जागा ताब्यात आली तिथे रस्ते केले जात आहेत. त्यात नवीन रस्त्यांसह जुने रस्ते रुंदीकरणाचा समावेश आहे.
कोविडमुळे विलंब
महापालिकेत समाविष्ट गावांत विकास आराखड्यानुसार कामे सुरू होती. मात्र, कोविड काळ, राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती, योग्य मोबदल्यासाठी काही जागा मालकांचा विरोध, निधीचा अभाव आदी अनेक अडथळ्यांमुळे कामे खोळंबली होती. आता बहुतांश अडथळे दूर झाले असून रस्त्यांसह सर्वच कामे सुरू झाली आहेत.
रस्त्यांना प्राधान्य
पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी ते चऱ्होली आणि तेथून पुढे नगर रस्त्यापर्यंत ९० मीटर रुंद रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच, चऱ्होली, मोशी, चोविसावाडी, वडमुखवाडी, तळवडे, चिखली, डुडुळगाव, बोऱ्हाडेवाडीतील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत छोट्या नवीन रस्त्यांची निर्मिती केली जात आहे. जुने रस्ते रुंद व पक्के केले जात आहेत.
‘‘महापालिकेत १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांसाठी विकास आराखडा मंजूर होता. त्यानुसार विविध कामे आता सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने जुने रस्ते रुंद करणे, नवीन रस्त्यांची निर्मिती, डांबरीकरण, पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्या टाकणे, सांडपाणी वाहिन्या टाकणे अशी कामे सुरू आहेत. उद्याने व मैदाने विकसित केली जात आहेत.
- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका
‘‘समाविष्ट गावांत विविध विकास कामे सुरू आहेत. मंजूर विकास आराखड्यातील रस्ता रुंदीकरण, नवीन रस्त्यांची निर्मिती, पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या टाकल्या जात आहेत. पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. आरक्षणे विकसित केली जात आहेत. महापालिकेच्या माध्यमातून अनेक सोयी-सुविधा निर्माण केल्या जात आहेत.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

