गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

प्लंबिंग करताना कामगाराचा मृत्यू

थेरगाव : इमारतीच्या सातव्या मजल्यावर रस्सीच्या झुल्यावर बसून प्लंबिंगचे काम करीत असताना रस्सी तुटल्याने खाली पडून भानुप्रताप रमेशचंद्र सिंग (वय २६, रा.विशालनगर, पिंपळे निलख) या कामगाराचा मृत्यू झाला.
आवश्यक सुरक्षा उपाययोजना न राबविल्याने ठेकेदार गौरव नवनाथ चव्हाण (वय ३०, रा. विशालनगर, पिंपळे निलख) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ठेकेदार चव्हाण याला थेरगाव येथील १९ ग्रँड वेस्ट सोसायटीने प्लंबिंगच्या मेंटेनन्सचे काम दिले होते. हे काम वरील दुर्घटना घडली.

जुन्या भांडणावरून दोघांना मारहाण
डुडुळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना डुडुळगाव येथील जुना जकात नाका परिसरात घडली.
अमोल विलास शिंगाडे (रा. गायकवाड वस्ती, कुरुळी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश चव्हाण, चैतन्य व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी हे मित्रांसोबत थांबले होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी व त्यांचा मित्र नागेश जाधव यांना आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. फिर्यादीला धारदार शस्त्राने गंभीर जखमी केले.

कंटेनरच्या धडक; चालकाचा मृत्यू
पिंपरी : कंटेनरने समोरच्या कंटेनरला धडकल्याने नीलेश बाबासाहेब सपकाळ (वय ३५, रा. करंजखोप, ता. कोरेगाव, जि. सातारा) या चालकाचा मृत्यू झाला.
ओझर्डे गावच्या हद्दीतील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेने सपकाळ हे कंटेनर घेऊन जात असताना समोरील कंटेनरला जोरात धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

अवैध गॅस रिफिलिंग; एकावर गुन्हा

पिंपरी : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून धोकादायकरित्या गॅस काढून इतर सिलिंडरमध्ये भरणाऱ्या मारुती बाबुराव फुले (वय ४५, रा. मोहननगर, पिंपरी, मूळ- आंबेगाव, ता. देवणी, जि. लातूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपीने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून रिफिलिंग सर्किटच्या सहाय्याने घरगुती वापराचा गॅस बेकायदेशीररीत्या व धोकादायक पद्धतीने इतर छोट्या सिलेंडरमध्ये काढला. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केलेल्या या कारवाईत तेरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

ज्येष्ठ नागरिकाची रोकड लंपास
पिंपरी : पीएमपी बसने प्रवास करीत असताना बसवराज गुंडप्पा मुरूमकर (वय ६७, रा. सुखवानी कॅम्पस, वल्लभनगर, पिंपरी) या प्रवाशाचा खिसा कापून चोरट्याने दीड लाखांची रोकड लंपास केली. मुरूमकर हे खराळवाडी बसथांबा ते चिंचवड स्टेशन येथील महावीर चौक असा प्रवास करीत असताना हा प्रकार घडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com