बोलीभाषांमुळे मराठी रंगभूमी समृद्ध 
मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन ः चिंचवडमध्ये शंभराव्या नाट्य संमेलनाचे उद्‍घाटन

बोलीभाषांमुळे मराठी रंगभूमी समृद्ध मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन ः चिंचवडमध्ये शंभराव्या नाट्य संमेलनाचे उद्‍घाटन

पिंपरी, ता. ६ ः ‘‘विविध कला, संस्कृती व बोलीभाषांच्या समावेशातून मराठी रंगभूमी समृद्ध झाली आहे. गेल्या शंभर वर्षात नाट्यसृष्टीने अनेक चढउतार पाहिले. त्यात तावून सुलाखून तिची वाटचाल सुरू आहे. हे चढउतारच रंगभूमीच्या गतिमानतेचे लक्षण आहे,’’ असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुलात उभारलेल्या सूर्यमाला व्यासपीठावर शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. स्वागताध्यक्ष शरद पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, शंभराव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कृष्णकुमार गोयल, सुरेशकुमार साकला, अभिनेते मोहन जोशी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, अश्‍विनी जगताप, उमा खापरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.
गज्वी यांनी जब्बार पटेल यांच्याकडे संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. नाट्यसंमेलनाची स्मरणिका ‘नांदी’, गज्वी यांचे आत्मकथन ‘रंगनिरंग’ यांचे यावेळी प्रकाशन झाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘कलेच्या क्षेत्रात एखादा उपक्रम शंभर वर्ष करणे, केवळ मराठी माणसांच्या रंगभूमीवरील निखळ प्रेमामुळेच शक्य झाले. ओटीटी व सोशल मीडियाच्या जमान्यात प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीलाही बहर आलेला आहे. मराठी रंगभूमीला आशय, विषय, नेपथ्य, सादरीकरण अशा माध्यमातून अनेक कलावंतांनी समृद्ध केले आहे. यासाठी वेगवेगळे प्रयोग होत गेले. त्यामुळे मराठी रंगभूमी ताजीतवानी राहिली आहे.’’ अजित भुरे यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सतीश लोटके यांनी आभार मानले.

‘सकाळ’मधील उताऱ्याचे वाचन
‘सकाळ’ने शनिवारी (ता. ६) ‘शतकमहोत्सवी नाट्यसंमेलन’ विशेष पुरवणी प्रकाशित केली. त्यातील प्रशांत दामले यांच्या ‘प्रेक्षकच आमचे मायबाप’ या लेखाचा संदर्भ देत मुख्यमंत्री शिंदे यांनी उताऱ्याचे वाचन केले. ते म्हणाले, ‘‘मनावर उपचार करणारे औषध म्हणजे नाटक आहे. त्याची तुलना चित्रपटांशी करणे म्हणजे जिलेबीची तुलना तिच्या चित्राशी करण्यासारखे होईल. नाटकाच्या तिकिटाबाबत प्रेक्षकांनी हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तिकीट काढणे म्हणजे कलावंतांचे कौतुक करणे आहे. त्याचवेळी कौतुकाला कलावंतांनी पात्र ठरले पाहिजे.’’

मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
- कलावंतांप्रमाणे आम्हीही परफॉर्मन्स करतो. पण, तुम्हाला लोकं टाळ्या वाजवून प्रतिसाद देतात. आम्हाला मतपेटीतून प्रतिसाद देतात.
- अभिनयातून कलावंत रसिकांच्या चेहऱ्यावर हसू आणतात. आम्ही सरकारच्या माध्यमातून अडचणीतील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करत असतो.
- गेल्या दीड वर्षापूर्वी सत्तांतराचा पहिला अंक पार पडला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा दुसरा अंक सुरू आहे. निवडणुकीनंतर विजयाचा तिसरा अंक पार पडेल.
- शंभरावे नाट्य संमेलन २०२० मध्ये होणे अपेक्षित होते, पण, कोविडमुळे होऊ शकले नाही. त्यासाठी २०२४ उजाडले. कदाचित नियतीच्या मनात असेल की, या संमेलनाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभावी.
- जब्बार पटेल यांनी नाटकांमध्ये विविध धाडसी प्रयोग केले आहेत. तसा एक धाडसी प्रयोग आम्ही दीड वर्षांपूर्वी केला. पटेलांसाठी हे चांगले कथानक आहे. याचा नक्कीच त्यांनी विचार करावा.

मुख्यमंत्री म्हणाले...
- नाट्यसृष्टीच्या मागे सरकार उभे राहील
- पिंपरी-चिंचवडमधील नाट्यगृहांची भाडेआकारणी पूर्वीप्रमाणेच ठेवण्यास आयुक्तांना सांगितले आहे
- दरवेळी ५० लाख नाट्यसंमेलनाला देत होते. आता एक कोटी ८३ लाख रुपये दिलेत.
- ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ केली जाईल
- कलाकारांची घरे व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी निधी दिला जाईल
- नाट्य परिषदेसाठी मुंबईतील भूखंड दिला जाईल
-----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com