रामराव महाराज ढोक

रामराव महाराज ढोक

Published on

(फोटो ः सिंहासनाधीश श्रीराम)
--
आदर्श राजा ः श्रीराम

रामराव महाराज ढोक, नागपूर
प्रजेच्या दुःखाने दुःखी होणारा आणि प्रजेच्या सुखाने सुखी होणारा राजा म्हणजे आदर्श राजा.
राजा वेश्या यमश्चाग्निस्तस्करो बालयाचकौ ।
परदुःखं न जानन्ति अष्टमो ग्रामकण्टकः ॥...
असे चाणक्यनितीमध्ये सूत्र आहे. हे आठ लोक दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत नाहीत. त्यामध्ये राजाचा पहिला क्रमांक दिला आहे. राजा प्रजेच्या दुःखाने दुःखी होत नाही. प्रजेच्या दुःखाने दुःखी होणारा राजा देशाला मिळाला तर तो राजा नव्हे. साक्षात ईश्वराने राष्ट्राला दिलेली देणगी समजा, असा एकमेव राजा रामचंद्र जो प्रजेच्या दुःखाने दुःखी व्हायचा आणि तिच्या आनंदातच स्वतःचे सुख शोधणारा आदर्श राजा होता. प्रभू श्रीरामचंद्र. त्यामुळे, त्यांना चंद्र, सूर्य असेपर्यंत आदर्श राजा म्हणतात. कारण, राजाचे कर्तव्य आहे की, प्रजेच्या दुःखाला स्वतःचे दुःख समजून त्याचे निराकरण करणे.
रामचंद्र वनवासाला निघाले. तेव्हा, लक्ष्मणानेही त्यांच्यासोबत वनवासाला जाण्याचा हट्ट धरला. तर रामचंद्र म्हणाले, ‘लक्ष्मणा, मी वनवासाला चाललो, मला पित्याचे वचन संभाळायचे आहे.
‘मैं बन जाउँ तुम्हहि लेइ साथा।
होइ सबहि बिधि अवध अनाथा ॥
आपले दोघे बंधू मामाच्या घरी गेले आहेत. पिताश्री मूर्छित पडले आहेत. माझ्यासोबत तू ही वनवासाला आलास तर प्रजेचे काय होईल? यात पहिली प्रजेची काळजी दिसून येते. ‘तुला माहित आहे का रे लक्ष्मणा,
‘जासु राज प्रिय, प्रजा दुखारी ।
सो नृप अवसि नरक अधिकारी ।।’
ज्या राजाला राज्य प्रिय असते, प्रजा दुःखी असते. त्या राजाला नरकात जावे लागते, म्हणून मी पिताचे वचन संभाळतो आणि तू प्रजेचा संभाळ कर.’ यावरूनही प्रभू श्रीरामांचे प्रजेविषयीचे ममत्व दिसून येते.
कैकयीने सांगितले की, ‘रामा, तू जो अवतार घेतला आहेस ना, तो अयोध्येची गादी सुशोभित करण्यासाठी नव्हे, तुझे पहिले कर्तव्य आहे, दुर्जनाचा नायनाट, सज्जनाचे रक्षण आणि मग रामराज्य.’
श्रीरामाचा जन्म झाला आणि रामराज्य आले असे नाही. पहिला रामजन्म, त्यानंतर श्रीरामाने सज्जनांचे संघटन काय केले, त्यानंतर दुर्जनांचा नायनाट झाला, मग रामराज्य साकार झाले. त्यावेळेस, प्रभू श्रीरामांनी प्रतिसृष्टी निर्माता थोर ऋषी विश्वामित्र आणि ज्यांच्या चरणाशी राहून राम विद्येत पारंगत झाले, अशा महर्षी वशिष्ठ यांचा अधिकार सामान्य असेल का? पण, या दोन्ही महान तपस्वी महर्षींचे एकमेकांशी पटत नव्हते. त्या दोघांना एका व्यासपीठावर प्रभू श्रीरामांनी बसविले. त्यांच्यामुळेच, पिता दशरथ, जनक हे दोन सज्जन व्यक्ती व्याही झाले. म्हणजेच काय तर त्यांना एकत्र आणून त्यांनी सज्जनांचे संघटन केले. मग, रामांनी दुर्जनांचा नायनाट केला. दुर्जनांचा नायनाट केल्यावर रामराज्य अस्तित्वात आले.
‘रामराज्य’ याकडे केवळ संकुचित अर्थाने बघणे योग्य होणार नाही. त्याचा खूप व्यापक अर्थ आहे. त्याचा अर्थ आहे ‘धर्मराज्य’, धर्मराज्य म्हणजे आपण समजतो तसे नव्हे. त्याची देखील व्यापक व्याख्या केलेली आहे. माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणे अर्थात माणुसकी याचे नाव म्हणजे धर्म. त्याची सुरुवात घरापासून झाली पाहिजे; तर धर्म मंदिरापर्यंत टिकतो.
सुनयना माता ही सीतेची आई. तिने सांगितले की, ‘जन्मभर सासू आणि सासऱ्याची सेवा कर.’ ही धर्माची सुरुवात घरापासून झाली ना. आता, जर प्रत्येक घरातील सासूला वाटेल की, सून नाही तर माझी मुलगी आहे आणि सुनेला वाटेल की सासू नाही माझी आई आहे, असे घरात धर्माचे आचरण सुरू झाल्यावर काय होईल? एकही वयस्कर महिला वृद्धाश्रमात जाणार नाही. ज्या दिवशी सासूला वाटेल, सून नाही तर माझी मुलगी आहे. आमच्या देशात एकाही सुनेला आत्महत्या करावीशी वाटणार नाही. या धर्माची गरज आहे. त्याचे नाव म्हणजे ‘धर्मराज्य’ अर्थात ‘रामराज्य’ मग, भावाने भावासोबत, सुनेने सासूसोबत, पित्याने पुत्रासोबत असे धर्मकार्य त्याला जोडता येईल. त्यामुळे, धर्माचा प्रारंभ घरापासून झाला तर धर्म देवळापर्यंत टिकतो. ही रामराज्याची शिकवण आहे.
लोककल्याण हा धर्मराज्याच्या पुढचा शब्द येतो. त्याचे कारण, असे की जिथे धर्मराज्य आहे, तिथे सर्व अनुकूलता असते. म्हणून एक अभंग आहे. झाले
रामराज्य काय ऊणे आम्हासी ।।
धरणी धरी पिके गायी वोळील्या म्हैसी ।।
धर्मराज्य आल्याने जमीन पिकू लागली. झाडे फळांनी बहरली. गाई, म्हशी दूध देऊ लागल्या. मग, ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, त्या गोष्टीची अनुकूलता लोकांत असेल; तर यापेक्षा काय हवे? पाऊस भीत भीत का पडतो? तर धर्माचे वाटोळे झाल्याने. त्यामुळे, रामराज्यात जमीन पिकत होती. पाऊस वेळेवर पडत होता. गाई, म्हशी दूध देत होत्या. त्याने सगळ्या लोकांना ज्या गोष्टींची आवश्यकता होती. त्याची अनुकूलता होती. याचे नाव ‘लोककल्याण’ याचाच अर्थ असा की, जिथे धर्म आहे, तिथे अनुकूलता आहे. जिथे अधर्म आहे, तिथे प्रतिकूलता आहे. म्हणून ‘धर्मराज्य’, ‘माणुसकीचे राज्य’, ‘रामराज्य’ याने प्रजा सुखी झाली असे म्हणता येते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com