

पिंपरी, ता. ३ ः शहरात सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी महापालिकेने सीसीटीव्ही सर्वेलेन्स प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत पाच हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे विविध भागात बसविण्यात येत आहेत. त्यातील बहुतांश कॅमेरे कार्यान्वित झाले असून, काही कार्यान्वित व्हायचे आहेत. मोठ्या रस्त्यांवरील चौकांसह वाहतूक नियंत्रणात ठेवण्यासाठी स्पीड नियंत्रण फलकांसह कॅमेरे बसविले आहेत. गेल्या आठवड्यात दोन गुन्ह्यांचा उकल करण्यास अशा कॅमेऱ्यांची पोलिसांना मदत झाली आहे.
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे करसंकलन विभागाच्या स्थानिक कार्यालयांत जोडले आहेत. असे सतरा कार्यालये शहरात आहेत. या कार्यालयांतून निगडी येथील कमांड कंट्रोल सेंटरला (सीसीसी) हे कॅमेरे जोडले आहेत. या सीसी सेंटरमध्ये एक पोलिस अधिकारी व तीन कर्मचारी २४ तास नियुक्तीस आहेत. वाहतूक पोलिसांकडून याच कॅमेऱ्यांचा वापर करून वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करीत आहेत.
एका मोटारचालकाने सीटबेल्ट लावलेला नव्हता. प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर चौकातील (भेळ चौक) सिग्नलवर थांबलेला असताना वाहनांच्या क्रमांकासह चालकाचे छायाचित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे घेतले होते. तो वाहनचालक पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर चौकात (मोरवाडी चौक) येईपर्यंत दोन हजार रुपये दंड आकारल्याचा संदेश त्याच्या मोबाईलवर छायाचित्रासह प्राप्त झाला होता.
तपासासाठी महत्त्वाचे
स्मार्ट सिटीअंतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा उभारली जात आहे. काही कॅमेरे बंद असून काही सुरू आहेत. त्यांच्याही बॅटरी चोरीला जात असल्याने ते बंद पडत आहेत. सीसीटीव्हींमुळे गुन्ह्यांचा उकल होण्यास पोलिसांना मदत झाली आहे. मात्र, बंद कॅमेरे व बॅटरी चोरीमुळे तपासात अडथळे ठरत आहेत. सुरू असलेल्या कॅमेऱ्यामुळे वाहनांची काच फोडणारा व एका प्रकरणातील चोरटा हाती लागला आहे. म्हणजेच घटना घडल्यानंतर तपासासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग तपासले जाते. एका चौकांत मिळणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर प्रत्येकी किमान दोन अशा पद्धतीने साधारण आठ क्वचित ठिकाणी १० कॅमेरे बसविलेले आहेत.
कॅमेऱ्यांच्या बॅटरींची चोरी
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी बसवलेल्या बॅटरी चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, अशा प्रकारामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याने बॅटरींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. कॅमेरे व बॅटरीचे काम ठेकेदारामार्फत केले जात असून, त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारीही त्यांचीच आहे.
असे आहे कॅमेऱ्यांचे नियोजन
- शहरात विविध ठिकाणी पाच हजार ४१० कॅमेरे बसविण्यात येत आहेत
- बीआरटी मार्गांसह मोठ्या रस्त्यांवरील चौकांत कॅमेरे बसविण्याचे नियोजन
- पुणे-मुंबई महामार्गावर आळंदी-पुणे, टेल्को रस्ता, स्पाइन रस्ता, सांगवी-रावेत रस्त्यावर कॅमेरे
कॅमेरे कशासाठी
- सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेणे
- वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे
- वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगाची नोंद करणे
असा आहे सीसीटीव्ही सर्वेलेन्स
प्रकल्प एक
- एकूण सीसीटीव्ही कॅमेरे ः २,४९०
- स्पीड डिटेक्शन सिस्टीम ठिकाणे ः १६
- रेड लाईट व्होयोलेशन सिस्टिम ठिकाणे ः २३
- पब्लिक ॲड्रेस सिस्टिम ठिकाणे ः १०
- एकूण अपेक्षित खर्च रुपये कोटीत ः १७८
प्रकल्प दोन
- एकूण सीसीटीव्ही कॅमेरे ः २,९२०
- स्पीड डिटेक्शन सिस्टीम ठिकाणे ः १०
- एकूण अपेक्षित खर्च रुपये कोटीत ः १६९
‘‘महापालिकेमार्फत सीसीटीव्ही सर्वेलेन्स प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे. त्याचे काम दोन टप्प्यात सुरू असून, ३४७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, स्पीड डिटेक्शन सिस्टीम, रेड लाइट व्होयोलेशन सिस्टिम आणि पब्लिक ॲड्रेस सिस्टिम विविध ठिकाणी उभारण्यात येणार आहे. त्यांच्या सर्व्हर रूम इन्फ्रास्ट्रक्चर आणि चार वर्षांसाठी देखभाल-दुरुस्तीचाही समावेश आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.