पिंपरी कॉलेज कट्टा

पिंपरी कॉलेज कट्टा

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
ऋतुजा लोहार/अश्विनी डफळ (मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी फॉर लेडीज, मोशी)
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मोशीतील पीईएस मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी (फॉर लेडीज) येथे विविध कार्यक्रम झाले. सर्व शिक्षिका आणि विद्यार्थिनींचा सहभाग होता. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी (फार्म.डी) संयोजन केले. प्राध्यापिकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. उपप्राचार्य डॉ.वृषाली तांबे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. ‘महिलांच्या आरोग्य समस्या आणि विविध क्षेत्रांतील त्यांची बलस्थाने’ या विषयावर भाषणे झाली. नृत्य प्रदर्शन आणि प्राध्यापिका, सदस्यांसाठी विविध खेळांचा देखील समावेश होता. आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व महिलांचे आभार मानले आणि एकमेकांना आधार देऊन समाजात पुढे जाण्याचा संदेश देण्यात आला.
(07116)

अंतरंग २०२४ मधून कलागुण प्रदर्शन
हर्षदा त्रिभुवन / सुषमा पवार (डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल)
डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च कॉलेजने डीपीयूमध्ये शिकत असलेल्या (डी.फार्म, बी.फार्म, फार्म.डी) विद्यार्थ्यांसाठी अंतरंग २०२४ चे आयोजन आचार्य अत्रे नाट्यगृहात केले होते. त्यात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे नृत्य, संगीत, नाटकांद्वारे कला सादर करण्याची संधी मिळाली. प्राचार्य डॉ. सोहन चितलांगे, उपप्राचार्य डॉ. संतोष भुजबळ, विभाग प्रमुख डॉ. मारुती शेलार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाची डिस्को थीम होती. ऑर्केस्ट्रा होता. सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाटक सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

विद्यार्थ्यांचा पोलिओ अभियानात सहभाग
अर्जुन हिंगे (राजमाता जिजाऊ फार्मसी पदविका महाविद्यालय)
महापालिका व मोशी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यातर्फे राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानात राजमाता जिजाऊ फार्मसी पदविका महाविद्यालयाच्या ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महापालिका प्रभाग तीन व चारमधील सहकारी गृहरचना संस्था, बाजार पेठा, वस्त्या, गल्ली, चाळी आदी भागांतील ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना लस देण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महाविद्यालयातील स्वयंसेवकांना लसीकरणाविषयी प्रशिक्षण दिले. प्रत्येकी तीन स्वयंसेवकांचे गट करून नियोजित केंद्रांवर थांबून लसीकरण केले. तसेच लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा घरोघरी शोध घेऊन लसीकरणाचे काम पूर्ण केले. प्राचार्य डॉ. रवींद्र चिंतामणी यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील काळे यांनी संयोजन केले. संस्थेचे संस्थापक विलास लांडे, सचिव सुधीर मुंगसे, खजिनदार अजित गव्हाणे, विश्वस्त विक्रांत लांडे, सुमीत मुंगसे यांनी अभिनंदन केले.

‘फार्माथॉन’मध्ये विद्यार्थ्यांचे यश
इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनतर्फे आयोजित ‘फार्माथॉन’ स्पर्धा झाली. फार्मसी क्षेत्र हे समाजाचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी अविरत सेवा देत असून समाजामध्ये त्याच्या कामाची नोंद व्हावी, या संकल्पनेतून बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. त्यामध्ये, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. २१, १० आणि पाच किलोमीटर धावणे अशी तीन टप्प्यांत स्पर्धा झाली. त्यात राजमाता महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी लिप्टे हिने २१ किलोमीटर गटात तिसरा क्रमांक मिळवला. तिला चषक, प्रशस्तिपत्र व सहा हजार रुपये रोख रक्कम देऊन गौरविले. प्राचार्य डॉ. रवींद्र चिंतामणी व संस्थेचे संस्थापक विलास लांडे यांनी मयुरीचे अभिनंदन केले. प्रा. पल्लवी गायकवाड यांनी संयोजन केले.

माजी विद्यार्थी संवाद मालिका
वसीम शेख (राजमाता जिजाऊ कॉलेज ऑफ फार्मसी)
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी येथे ‘इंडिया फार्मसी टू द वर्ल्ड ः जेनेरिक फार्मास्युटिकल्ससाठी तपशीलवार विकासात्मक प्रक्रिया’ या विषयावर माजी विद्यार्थी संवाद मालिका झाली. माजी विद्यार्थी शुभम अवघड यांनी, जेनेरिक फार्मास्युटिकल्सच्या विकास प्रक्रियेच्या सर्वसमावेशक अंतर्दृष्टीने आणि जागतिक किफायतशीर औषधांचा पुरवठा करण्यात भारताची
भूमिका स्पष्ट केली. प्राचार्य डॉ. के. एस. जैन उपस्थित होते. प्रा.
नीलाक्षी नेरकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जीवन धुमाळ यांनी आभार मानले. प्रा. विप्रा वैद्य यांनी संयोजन केले.

विद्यार्थ्यांची ‘डिफेन्स एक्स्पो’ला हजेरी
वैष्णवी देसाई (प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड)
राज्य सरकार उद्योग विभागामार्फत संरक्षण साहित्य उत्पादक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ आयोजन केले होते. त्यात सारथी दूतचे प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड येथील स्वयंसेवकांनी प्रदर्शनास भेट देऊन निरीक्षण केले. तिन्ही दलांचे म्हणजे पायदळ, नौदल आणि वायुदल यांचे पथसंचालनही विद्यार्थ्यांनी अनुभवले. एरोस्पेस, शस्त्रास्त्रे, इलेक्ट्रॉनिक्स, दळणवळण आणि लॉजिस्टिक्स आदी संरक्षण संबंधित उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवांचा प्रदर्शनात समावेश होता. संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज, उपप्राचार्य डॉ. क्षितिजा गांधी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
(07118)

पोलिओ लसीकरणात उत्स्फूर्त सहभाग
वैष्णवी आटोळे / उद्धव वैराट (मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, निगडी)
सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, निगडी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातर्फे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम अंमलबजावणीसाठी विद्यार्थी प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांना लसीकरण केंद्र कार्यपद्धती, ‘आईपीपीआय’ (बुथवरील लसीकरणानंतर घरभेटीद्वारे लसीकरण) कार्यपद्धती, लसीकरण टॅली शीट व लस वाप अहवाल कसा भरावा, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. हरीश शेंडे (वैद्यकीय अधिकारी, पीसीएमसी) यांनी लसीकरण केंद्र कार्यपद्धतीबद्दल माहिती दिली. डॉ. सुप्रिया बिरादार (वैद्यकीय अधिकारी, पीसीएमसी) यांनी ‘आयपीपीआय’ बद्दल मार्गदर्शन केले. शैलेश मुळे (पीएचएन) यांनी लसीचा वापर कसा करावा ? व लस वापराचा अहवाल कसा भरावा ? याबद्दल मार्गदर्शन केले. अनुष्का तायडे (चतुर्थ वर्ष, फार्म डी.) या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले. शिबिराचे आयोजन डॉ. रजनी माळी, डॉ. अमित तापकीर, डॉ. सुनीता पवार, डॉ. संकेत हरीमकर यांनी केले. श्रुती मोहरकर (चतुर्थ वर्ष, फार्म डी.) या विद्यार्थिनीने आभार मानले. प्राचार्य डॉ. पी. डी. चौधरी, प्रो. ए. सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, शामकांत देशमुख (कार्यवाह), प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे (सहकार्यवाह) आणि प्रा. सुरेश तोडकर (सहकार्यवाह) यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
(07120)

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
आदेश पोखरकर (इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव)
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले. युनिक ॲकॅडमीचे केतन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक प्राचार्य डॉ. रूपेश पाटील, संयोजक प्रा. डॉ. सुरेश देवडे, बी.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे आदी उपस्थित होते. इंद्रायणी महाविद्यालय व युनिक ॲकॅडमी यांच्यातर्फे मार्गदर्शन सत्र झाले. केतन पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे स्वरूप आणि अभ्यासाबाबत घ्यावयाची काळजी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या पदांबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन केले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत चांगल्या समाजाची निर्मिती होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्राचार्य डॉ. मलघे यांनी केले. प्रा. सत्यजित खांडगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. सुरेश देवडे यांनी आभार मानले.
(07122)

क्षितिज २०२४ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
प्रा. राहुल बाराथे (एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आळंदी)
विद्यार्थांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात आयोजित ‘क्षितिज - २०२४’ हे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व अयोध्येत राम मंदिराची निर्मिती झाल्यामु‌ळे विद्यार्थांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वराज्य निर्मितीतील प्रसंग व राज्याभिषेक सोहळ्याचे सादरीकरण केले. श्रीरामचरित्र व रामायणातील काही प्रसंगही सादर केले. गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. त्यांनी झेंडा व संत तुकाराम चित्रपटातील गाणे गाऊन मनोरंजन केले. निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी, विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान व नोकरीतील आव्हानांना कसे समोरे जायचे ? याबाबत सांगितले. स्नेहसंमेलनात उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार बीबीए विभागाला, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रा. संगीता बोरडे, उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार दीपाली जोगदंड यांना देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार मृणाली शिंदे आणि मुस्कान शर्मा यांना प्रदान करण्यात आला. समन्वयक डॉ. शरद कदम व सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा. अरविंद वागस्कर, प्रा. अमित ताले यांनी संयोजन केले. प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, उपप्राचार्य अक्षदा कुलकर्णी व डॉ. मानसी अतितकर, कुलसचिव संदीप रोहीनकर आदी उपस्थित होते.
(07125)

करियर मार्गदर्शन कार्यशाळा
प्रा. सुमीत गुणवंत (राजमाता जिजाऊ महाविद्यालय, भोसरी)
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लांडेवाडी भोसरी आणि द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांच्यातर्फे महाविद्यालयात वाणिज्य विभागांतर्गत करियर मार्गदर्शन कार्यशाळा झाली. सीए निखिल कुलकर्णी आणि सचिन ढेरंगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ढेरंगे यांनी स्वतःच्या जीवनातले अनुभव व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कुलकर्णी यांनी सीए कोर्सबाबत माहिती दिली आणि वित्त, लेखा परीक्षण, करआकरणी आणि विविध कायदेविषयक सल्ले या क्षेत्रात ‘सीए’ ला अतिशय महत्व असते, असे मत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष विलास लांडे, प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, रजिस्ट्रार अश्विनी चव्हाण-भोसले आदी उपस्थित होते. डॉ. सुग्रीव आडाल यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जयश्री अरमानी यांनी आभार मानले. समन्वयक मनीषा पालेकर, सीनियर असिस्टंट किरण सोनवणे, प्रा. सुनील दांडेकर, प्रा. सुनीता पांचारिया, प्रा. सपना बिराजदार, प्रा. प्रियांका शिंदे व प्रा. तेजस्विनी गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
(07126)

नवीन शैक्षणिक धोरणावर परिसंवाद
राष्ट्रपाल वाघमारे (एमएम पॉलिटेक्निक, थेरगाव)
थेरगाव येथील एमएम पॉलिटेक्निकमध्ये नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) आणि तंत्रशिक्षण विषयावर परिसंवाद झाला. शांताराम पोखरकर (सचिव, हेडमास्तर असोसिएशन, मुंबई) यांनी एनईपी आणि त्याची अंमलबजावणी यावर मार्गदर्शन केले. प्राचार्या जोशी यांनी एमईपी तांत्रिक शिक्षणाची भूमिका आणि आयसी मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमेशन आणि रोबोटिक्स सारख्या उदयोन्मुख डिप्लोमा अभियांत्रिकी शाखांमधील करिअरच्या संधी विशद केल्या. संस्थेचे अध्यक्ष बी. जी. जाधव यांनीही मार्गदर्शन करून मराठवाडा मित्रमंडळाच्या कार्याचा आढावा घेतला.
तेज निवळीकर (एमएम मंडळाचे कार्यकारी समिती सदस्य), गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेचे प्राचार्य डॉ. आर. के. पाटील आदी उपस्थित होते. त्यांनी उदयोन्मुख पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. प्रा. प्रसाद जाधव यांनी आभार मानले.

अमृत ​​काल विमर्श विकसित भारत-२०४७
शुभम जाधव / विद्या निकम (आयआयसीएमआर इन्स्टिट्यूट, निगडी)
निगडीतील आयआयसीएमआर इन्स्टिट्यूटमधील एमबीए प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांनी ‘विकसित भारतासाठी उद्योग संस्था सहयोगाचे महत्त्व’ विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. शिक्षण मंत्रालय आणि संस्थेच्या इनोव्हेशन कौन्सिलच्या सहकार्याने अमृत काल @२०४७ उपक्रमासाठी आयआयसीएमआर इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली. कुणाल घोडके (हेड बिझनेस एक्सलन्स इंडिया, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम अडविक हायटेक सोल्यूशन) उपस्थित होते. २०४७ पर्यंत ‘एक विकसित भारत’ साकार करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यावर्षी स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. स्त्री शक्ती, युवा शक्ती, कृषी शक्ती, गरीबांचे सक्षमीकरण आणि मध्यमवर्ग, निःसंशयपणे भारताला नवीन उंचीवर नेईल आणि एक विकसित राष्ट्र निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयआयसीएमआरचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी यांनी अमृत कालमधील नावीन्य, उद्योग आणि तरुणांचा सहभाग यांचा खरा अर्थ सांगून चर्चासत्राचा संदर्भ दिला होता. नवोन्मेष आणि प्रगती, सर्वसमावेशक वाढ, शाश्वत विकास, व्हिजनरी नेशन बिल्डिंग आणि ग्लोबल लीडरशिप - या विकास संवादामुळे निश्चितपणे कनेक्ट, समन्वय आणि संवाद कसा साधला जाईल, याबाबत मार्गदर्शन केले. ‘मजबूत संशोधन आणि विकास’, ‘इकोसिस्टमसाठी फाइव्ह बिल्डिंग ब्लॉक्स’, ‘लर्निंग टू बी ॲप्टिट्यूड- कौशल्यांबद्दलचे अंतर्निहित ज्ञान’, ‘सिच्युएशनल अवेअरनेसच्या दृश्यातील अप्लाइड लर्निंग’, ‘संशोधन व्यावसायीकरण’, ‘कल्चर ऑफ एक्सलन्स कार्यशाळा’, ‘प्रतिभा विकास आणि पाइपलाइन’ आदींबाबत घोडके यांनी मार्गदर्शन केले. एमबीएचे विद्यार्थी विद्या निकम आणि प्रथम कोनकर यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थिनी प्रणाली चव्हाणने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एमबीएच्या अनेक विद्यार्थ्यांनी अमृत काल @ २०४७ बाबत कुतूहल व्यक्त केले. आयआयटी, दिल्ली आणि सॅमसंग, आयआयटी मुंबई आणि टाटा स्टील, आयआयटी खरगपूर आणि गुगल इत्यादींच्या वास्तविक जीवनातील उदाहरणांवर चर्चा करून सेमिनार सकारात्मक पद्धतीने संपन्न झाला. आयआयसीएमआरचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी आणि विभागप्रमुख डॉ. मनीषा कुलकर्णी यांनी समन्वयक पूजा गवांदे, दिप्ती वाजपेयी यांचे अभिनंदन केले.

वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
सरस्वती बिरादार (डॉ. डी. वाय. पाटील महिला महाविद्यालय)
डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. प्रा. डॉ. सुरेश धरणे व भाग्यश्री मंठाळकर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. खेळण्याचे फायदे व प्रेरणादायी गोष्टी सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. महाविद्यालयाच्या विश्वस्त डॉ. रोहिणी पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. रणजित पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. क्रीडा प्रशिक्षक प्रा. जयश्री बागे यांनी संयोजन केले. खो-खो, कबड्डी, रस्सीखेच, बुद्धीबळ, कॅरम, डॉजबॉल, थ्रो बॉल आदी खेळ झाले. खो-खो, कबड्डी व रिले रेसमध्ये बीसीएच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. थ्रो बॉल, रस्सीखेचमध्ये बीए, डॉज बॉलमध्ये बीएससीच्या विद्यार्थ्यांनी अव्वलस्थान मिळविले.

उमंग वार्षिकोत्सवात विविध स्पर्धा
लीना कुमावत (रसिकलाल एम. धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल्स)
श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित चिंचवड येथील रसिकलाल एम. धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल्स एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालयात ‘उमंग’ वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात झाला. त्यात क्रिकेट, कॅरम, चेस, रस्सीखेच अशा क्रीडा स्पर्धा आणि फ्लोर डेकोरेशन, रांगोळी, मेहंदी, मेकअप, हेअरस्टाइल आदी कला स्पर्धा झाल्या. डॉ.अनिल खेडकर (डायरेक्टर ऑफ ऑक्सिजन लाइफ सायन्स लंडन), डॉ. सचिन फेगेड, (प्राचार्य, रसिकलाल एम. धरिवाल कॉलेज ऑफ फार्मसी), डॉ. अनिल थिटे ( प्राचार्य, पॉलिटेक्निक कॉलेज), डॉ. प्रविण कोठावदे (प्राचार्य, बी.इ.पी. कॉलेज), डॉ. विक्रम काळे (प्राचार्य, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा माध्यमिक विद्यालय) आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संजय वालोदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख मनीषा खैरे यांचे मार्गर्शन लाभले. मंडळाचे अध्यक्ष प्रकाशचंद धारिवाल, चेअरमन शांतिलाल लुंकड आणि ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड. राजेंद्रकुमार मुथा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com