स्पाइन रस्ता होणार ‘सिग्नल फ्री’

स्पाइन रस्ता होणार ‘सिग्नल फ्री’

पिंपरी, ता. १० ः पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी-भोसरी प्राधिकरणातील राजा शिवछत्रपती चौक (वखार महामंडळ गोदाम) ते निगडीतील मुंबई-पुणे महामार्गावरील भक्ती-शक्ती या दरम्यान प्रशस्त असा स्पाइन रस्ता आहे. तो सिग्नलमुक्त करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. हाच रस्ता निगडीतून पुढे किवळे बीआरटी मार्गाने मुंबई-बंगळूर महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला जोडला जाणार असून तो शहराचा पूर्व-पश्चिम भाग जोडणारा एकमेव ‘कॉरिडोर’ ठरणार आहे. त्यामुळे, पुण्यासह पिंपरी-चिंचवडच्या अन्य भागातील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने (पीसीएनटीडीए) वीस वर्षांपूर्वी स्पाइन रस्त्याची निर्मिती केली आहे. त्याचा त्रिवेणीनगर येथील काही भाग महापालिकेच्या कार्यकक्षेत येतो. तेथील काही बांधकामे हटवून बाधित नागरिकांना अन्य ठिकाणी जागा देऊन पुनर्वसन करणे आवश्यक होते. त्यामुळे, या भागातील रस्त्याचे काम अद्याप रखडले आहे. रस्त्यामुळे बाधित होणारे एकूण भूक्षेत्र १४ हजार ७८४ चौरस मीटर असून कुटुंबांची संख्या १३२ आहे. त्यांच्या पुनर्सनासाठी प्राधिकरणातील (आताचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए आणि निवासी भाग महापालिकेकडे) सेक्टर ११ मधील भूखंड निश्चित केला आहे. त्यामुळे, सलग स्पाइन रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तो झाल्यानंतर, संपूर्ण मार्ग ‘सिग्नल फ्री’ करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

सद्यस्थिती....
- संतनगर, स्पाइन सिटी चौक, सेक्टर नऊ चौक, जाधव सरकार चौक, घरकुल चौक, कृष्णानगर चौक, म्हेत्रे वस्ती चौक आदी ठिकाणी सिग्नल आहेत.
- टाटा मोटर्स मटेरियल गेट कॉर्नर येथे उड्डाणपूल, पूर्णानगर-कुदळवाडी कॉर्नर येथे भुयारी मार्ग, शरदनगर येथे पादचारी मार्गावर पूल असल्यामुळे तीनही चौक ‘सिग्नल फ्री’ आहेत.
- त्रिवेणीनगर येथे रस्त्याचे काम रखडले असून याच ठिकाणी मिळणाऱ्या निगडी दुर्गानगर-तळवडे आणि निगडी भक्ती-शक्ती दुर्गानगर मार्गावर सिग्नल आहे.
- निगडीतील भक्ती-शक्ती चौकात पुणे-मुंबई महामार्गावर दुमजली उड्डाणपूल, स्पाइन रस्ता व किवळे बीआरटी मार्ग जोडणाऱ्या मार्गावर ग्रेडसेपरेटर असल्याने ‘सिग्नल फ्री’ आहे.
- भक्ती-शक्ती चौक ते किवळे मुकाई चौक बीआरटी मार्गावर प्राधिकरण सेक्टर २३ व शिंदे वस्ती रावेत या दरम्यान लोहमार्गावरील उड्डाणपूल गेल्या महिन्यात वाहतुकीस खुला झाला आहे.
- मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-बंगळुरू महामार्गावरील किवळे, मुकाई चौकातून भक्ती-शक्ती चौक मार्गे स्पाइन रस्त्याने मोशी-भोसरी प्राधिकरण व नाशिक महामार्ग जोडला जाणार.

भविष्यात....
- पुणे-नगर रस्त्यावरील वाघोलीपासून चऱ्होलीपर्यंत पीएमआरडीए व पुणे महापालिका लोहगाव हद्दीत ९० मीटर रुंद रस्त्याचे नियोजन आहे.
- चऱ्होली हद्दीपासून पुणे-नाशिक महामार्गावरील वखार महामंडळ चौकापर्यंत नियोजित ९० पैकी ३० मीटर रुंद रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिका विकसित करणार आहे.
- पीएमआरडीए, लोहगाव व चऱ्होली हद्दीतील रस्ता पूर्ण झाल्यास तो स्पाइन रस्त्याला जोडला जाणार असल्याने किवळे ते वाघोली चऱ्होलीमार्गे जोडले जाणार.
- नियोजित ९० मीटर रस्त्याचे काम चऱ्होली हद्दीत ९० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम सुरू आहे. दोन-तीन ठिकाणची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे.
- पुणे-नाशिक महामार्ग कासारवाडीपासून राजगुरूनगरपर्यंत उन्नत (एलिव्हेटेड) होणार असल्याने वखार महामंडळ चौक ‘सिग्नल फ्री’ होऊ शकतो.
- संपूर्ण स्पाइन रस्ता ‘सिग्नल फ्री’ करण्यासाठी सध्याच्या चौकांमध्ये उड्डाणपूल किंवा ग्रेडसेपरेटर तयार करावे लागतील.

चऱ्होलीतील पठारे वस्ती ते नाशिक महामार्ग यांना जोडण्यासाठी ९० मीटर रुंद रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे, स्पाइन रस्ता जोडला जाईल. निगडीतून किवळेतील मुकाई चौकातून द्रुतगती मार्गाला ‘कनेक्ट’ होईल. त्रिवेणीनगर येथे स्पाइन रस्त्याचे आणि ९० मीटर रुंद रस्त्याचे रखडलेले काम यावर्षी पूर्ण होईल. त्यामुळे, रहदारी वाढणार असल्याने संपूर्ण स्पाइन रस्ता ‘सिग्नल फ्री’ करण्याचे
नियोजन आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com