‘आरएमसी’मुळे 
पिकांचे नुकसान

‘आरएमसी’मुळे पिकांचे नुकसान

अश्‍विनी पवार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २९ : ‘पाच वर्षांपूर्वी येथे आरएमसी प्लॅंट सुरू झाला. त्याचा परिणाम आमच्या पिकांवर होऊ लागला. गेल्या चार-पाच वर्षांत हळूहळू शेतीतील उत्पन्न निम्म्यावर आले आहे. आम्ही आमच्या जमिनी या भागाच्या विकासासाठी रस्ते व्हावेत म्हणून दिल्या. मात्र, आता उरल्या सुरल्या जमिनीवर सुद्धा चांगले पीक येईनासे झाले आहे.’ ही व्यथा आहे ताजणेमळा, काळजेवाडी, वडमुखवाडी येथील शेतकऱ्यांची. चऱ्होलीजवळील ताजणेमळा या भागामध्ये असणारा रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लॅंट हा येथील शेतीसाठी हानिकारक ठरत आहे. हा प्लॅंट बंद व्हावा, यासाठी येथील शेतकऱ्यांनी व स्थानिक रहिवाशांनी सह्यांची मोहीम देखील राबविली. मात्र, महापालिका, पर्यावरण विभाग यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने येथील शेतकरी हतबल झाले आहेत.

शेती टिकविण्यासाठी धडपड
चऱ्होलीजवळच असणाऱ्या या परिसराचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले आहे. या भागातील रस्तेही प्रशस्त बांधण्यात आले आहेत. या सर्व विकासासाठी येथील भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या. उर्वरित जमिनीवर येथील शेतकरी शेती करीत आहेत. त्यामध्ये ज्वारी, टोमॅटो, वांगी, भाज्या अशी पिके घेतली जात आहेत. मात्र, आरएमसी प्लॅंटमधून उडणाऱ्या धुलीकणांमुळे पिकांचे नुकसान होत आहे. आजूबाजूच्या विहिरींमधील पाण्यातही सिमेंट मिसळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य राहिलेले नाही.


पाच वर्षांपासून प्लॅंटच्या प्रदूषणाचा त्रास
जिथे आरएमसी प्लॅंटला केवळ वर्षभरासाठी परवानगी दिली जाते. परंतु ताजणेमळा भागातील आरएमसी पाच वर्षांपासून सुरू आहे. शेतीच्या अगदी मधोमध असणारा आरएमसी इतके वर्ष सुरू ठेवण्यास महापालिका व पर्यावरण विभागाने परवानगी दिली कशी हा प्रश्‍नही येथील शेतकरी उपस्थित करीत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेले नियमांचे संबंधित प्लॅंटचालकाकडून उल्लंघन केले जात असून, येथील सिमेंटयुक्त पाणी हे सांडपाणी वाहिनीत सोडले जाते. महापालिकेकडे तक्रारी केल्यानंतर काही प्रमाणात बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. मात्र, तरीही प्लॅंटमधील सिमेंट थेट रस्त्यांवर येऊन येथील रस्त्यांवर सिमेंटचे थर जमा झालेले आहे.

वाहतुकीमुळे अपघाताचा धोका
या प्लॅंटमधून बांधकामासाठी लागणाऱ्या मालाची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. ही वाहतूक करताना कोणतीही काळजी न घेतली गेल्याने ट्रक व मिक्सरमधील सिमेंट, खडी, क्रश रस्त्यांवर सांडते. यामुळे चांगले रस्ते खराब होत आहेत. रस्त्यांवर पडलेल्या या राड्यारोड्यामुळे अपघातही होत आहे. ताजणेमळा, काळजेवाडी, वडमुखवाडी या परिसरात तीव्र चढ व उतार आहेत. त्यातच रस्त्यावर पडलेला राडारोडा अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.

नागरिकांची सह्यांची मोहीम
आरएमसीला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी व रहिवाशांनी या परिसरात सह्यांची मोहीम राबविली आहे. यामध्ये विलास विठ्ठल तापकीर, भाऊसाहेब ताजणे, भगवान ताजणे, बाळासाहेब काळजे, गुलाब तापकीर, धनंजय तापकीर, अशोक ताजणे, प्रकाश ताजणे या शेतकऱ्यांसह शंभर नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. मात्र, त्यानंतरही कारवाई करण्याबाबत प्रशासन उदासीन असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. या बाबत महापालिकेचा पर्यावरण विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संबंधित अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

‘हा प्लॅंट रात्री-बेरात्री सुरू असतो. प्लॅंटमधील कच्चा माल उचलून नेणाऱ्या गाड्यांची वर्दळही यावेळी सुरू असते. त्यामुळे होणाऱ्या आवाजाचा त्रास येथील रहिवाशांना होत आहे.’
- सूर्यकांत तापकीर, स्थानिक शेतकरी, वडमुखवाडी

‘या भागाच्या विकासासाठी आम्ही आमच्या जमिनी दिल्या आहेत.
उर्वरित जमिनीच्या तुकड्यांवर आम्ही शेती करत आहोत. जसा रहिवाशांना आरएमसीचा त्रास होतो. तसेच पिकांचेही यामुळे नुकसान होते. मात्र, परवानगी देताना ही बाब लक्षात का घेतली जात नाही. जर प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत, तर आम्हाला येथील रस्ते बंद करावे लागतील.’
- विलास तापकीर, शेतकरी, वडमुखवाडी

‘या प्लॅंटमधून कच्च्या मालाची धोकादायकरीत्या वाहतूक केली जाते. गाड्यांमधून रस्त्यावर सांडलेल्या राड्यारोड्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.’
- अशोक ताजणे, रहिवासी, ताजणे मळा

‘आम्ही हा आरएमसी प्लॅंट सुरू करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतलेली आहे. त्यांच्या सर्व नियमांचे पालन आमच्याकडून केले जात आहे.’
- आरएमसी प्लॅंट, चालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com