उन्हाळी सुट्यांमुळे लालपरीची ‘लगीनघाई’

उन्हाळी सुट्यांमुळे लालपरीची ‘लगीनघाई’

पिंपरी, ता.२९ ः सध्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या लागल्या असून सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरू आहे. त्यामुळे, कुणी मामाच्या गावाला; तर कुणी लग्नसमारंभाला जात असल्याने लालपरीची देखील (एसटी बस) ‘लगीनघाई’ सुरु झाली आहे. रणरणत्या उन्हातही वल्लभनगर आगारातील एसटी बस रोजच प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरून जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लांबपल्ल्याच्या मार्गावर एसटी बसची संख्या कमी असल्याने या मार्गावरील बसची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
दररोज वल्लभनगर येथून सकाळी साडेसात वाजता सुटणाऱ्या सोलापूर, पंढरपूर आणि कोकण कडे जाणाऱ्या बस व लोकल बसदेखील दररोज प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरून धावत आहेत. कोल्हापूरला जाणारी एकच बस असल्याने प्रवाशांची तिथे गर्दी उसळत आहे. अर्धे अधिक प्रवासी खालीच राहून जाताहेत. त्यामुळे, या मार्गावर दुसरी बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. एसटीच्या प्रवासात महिलांना अर्धे तिकीट असल्याने महिला प्रवासी बसमधून प्रवास करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे, देखील बस महिला प्रवासी संख्येमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
कोल्हापूर, अहिल्यादेवीनगर (अहमदनगर), सांगलीकडे आगारातील जाणाऱ्या बसची संख्या कमी असल्याने व त्या तुलनेत प्रवाशांची संख्या वाढल्याने नाइलाजाने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या कमाल तापमान ३६ ते ४२ अंश सेल्सियसपर्यंत जात आहे. मात्र, उन्हाचा त्रास सहन करुन वऱ्हाडी मंडळींना लग्न समारंभाला हजेरी लावत आहेत.

‘‘कोल्हापूरला जाणारी एकच बस असल्याने प्रवाशांची गर्दी असते. उन्हाळी सुट्या, लग्‍न समारंभामुळे गावाकडे जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. जादा बस सुरू करणे आवश्‍यक आहे.’’
- दिलीप गोसावी, प्रवासी

‘‘सध्या उन्हाळी सुट्यांमुळे स्थानकावर प्रवाशांची संख्या खूप आहे. सोलापूर, पंढरपूर आणि कोकणाकडे जाणाऱ्यांसाठी बसची संख्या पुष्कळ आहे. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला लाभत आहे.’’
- संजय वाळवे, आगार प्रमुख, वल्लभनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com