

थेरगाव : दुसऱ्यांच्या घरात नेहमी डोकावून का बघत असतोस, असे विचारल्याने मुलाने आईला शिवीगाळ करीत सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना पवारनगर, थेरगाव येथे घडली. सतीश बबन वडमारे (वय २१, रा. पवार नगर, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सतीश याच्या आईने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा सतीश वडमारे याला दुसऱ्या लोकांच्या घरामध्ये का नेहमी डोकावून बघत असतोस? असे फिर्यादी यांनी विचारले. त्याचा राग आल्याने सतीश याने फिर्यादीस शिवीगाळ करून सिमेंटच्या गट्टूने पायावर मारले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाल्या. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जखमी
चिंचवड : भरधाव जाणाऱ्या रिक्षाने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना महावीर चौक चिंचवड येथे घडली. याप्रकरणी जखमी महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिला त्यांच्या मुलीला क्लासवरून नेण्यासाठी आल्या होत्या. मुलीला दुचाकीवरून घरी घेऊन जात असताना महावीर चौक चिंचवड येथे भरधाव रिक्षाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात फिर्यादी महिला यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर आरोपी रिक्षाचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला.
भरदिवसा उघड्या दरवाजावाटे ऐवज चोरीला
पिंपरी : घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात शिरलेल्या चोरट्यांनी एक लाख १५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार नवी सांगवी येथे सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. याप्रकरणी अतुल अरुण कळसाईत (रा. स्वामी विवेकानंद नगर, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. दरम्यान, उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरटा घरात शिरला. घरातून ५५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, ४५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी आणि पंधरा हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकूण एक लाख १५ हजारांचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सोमाटणे फाटा येथे पाच किलो गांजा जप्त
पिंपरी : सोमाटणे फाटा येथे तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकाकडून पाच किलो गांजा जप्त केला. अश्फाकअली सज्जादअली शेख (वय ४०, रा. गौतम नगर, गोवंडी वेस्ट) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सोमाटणे फाट्याकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आदित्य हॉटेलसमोर एकजण गांजा घेऊन आल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अश्फाकअली शेख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अडीच लाख रुपये किमतीचा पाच किलो गांजा सापडला. पोलिसांनी गांजा जप्त करून अश्फाकअली याला ताब्यात घेतले.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.