मनीषा बाठे लेख
गुजरातमधील ‘विठ्ठल’
तेराव्या शतकात महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायिकांचे संतशिरोमणी ज्ञानेश्र्वर माऊली व संत नामदेव महाराज यांनी काही वैष्णवांच्या सांगाती भारताच्या सप्तमोक्षपुरींचे तीर्थाटन केल्याची नोंद स्वत: नामदेव महाराजांनी ‘तीर्थावळी’ या त्यांच्या साहित्यात केली आहे. पंढरपूर सोडल्यावर या तीर्थाटनाचा आरंभ हा अर्थातच विठ्ठलाच्या मूळरुपाच्या दर्शनाने क्षेत्र द्वारका येथून झाला होता.
- मनीषा बाठे, संत वाङ्मय अभ्यासिका
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी पश्चात संत नामदेव महाराज हे उत्तरभारतातील लोकभाषांत अर्थात ब्रजी, राजस्थानी, अवधी, हरियाणवी व पंजाबीतून रचना करीत, प्रवचन-कीर्तनांतून समाज-शिक्षणाचे व्रत आजन्म जगले. नामदेवरायांच्या विलक्षण काव्यशक्तीला त्या काळी प्रांतोप्रांतीच्या स्थानिक भाषिकांनी, आख्यानकारांनी हस्तलिखित-टिपणांतून त्यांच्या रचना, कथा-आख्यायिका, उपदेश हा पिढ्यान्पिढ्या अभ्यासला व पुढील पिढ्यांमध्ये गेय...स्वरूपातच रुजविला. त्यातील अगदी अस्सल गुर्जरी रचना म्हणजे...
ज्यो रे माधवजी। ज्यो रे माधवजी ।
मैं शरण थैई । तनका काकैपी।
बाप दयाळु तुहीं। मारी साडी अपों हातणी ले कंकणी।।
(गुजराती शब्दार्थ- ज्यो=पहा, थैई=झाले/आले, अपों=द्यावी, कंकणी=बांगडी)
भावार्थ- पहा हो पहा माधवजी, मी शरण आले, तन थरथरू लागे. तू दयाळू बाप अमुचा, माझी साडी द्यावी हो, हवे तर हातीचे कांकण वाबांगडी घ्या हो.
संत नामदेवांच्या अशा अनेक रचना आपल्याला आजही पोरबंदर विद्यापीठ, बडोदा हस्तलिखित विभाग अशा अगदी शासकीय हस्तलिखित संग्रहांमध्येही अभ्यासायला मिळतात. नामदेवांपश्चात साधारणत: शंभर वर्षांनी म्हणजे पंधराव्या शतकात नरसी महेता (इ. स. १४१४-१४८०) हे गुजरातमधील संतकवी होऊन गेले. त्यांच्या रचनांमधील कृष्णभक्तिपर रचनांमध्ये कृष्ण, गोविंद, वल्लभ, वासुदेव या उल्लेखांसह विठ्ठल या महाराष्ट्रीय आराध्य दैवताच्या विशेष उल्लेखांच्या अनेक रचना आढळून येतात. त्याबद्दल गुजराती ज्येष्ठ अभ्यासक नरसिंहराव दिवेटिया लिहितात की, ‘नरसी महेतांच्या काव्यातून नामदेवांचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव रुजल्याचे दिसते. कारण संत नामदेवांचा सौराष्ट्र प्रांतामधील प्रवास व बराच मोठा काळ तेथील मुक्काम. नामदेवांचे मराठी भक्त-कुळीचे कवित्व व मराठी भाषिकांच्या रक्तामधील दैवत ‘विठ्ठल-रुक्मिणी’, मराठी व्याकरणातील षष्ठी विभक्तीतील ‘चा’ प्रत्यय आणि मराठी भाषेचे शब्द अशी अनेक लक्षणे आपल्याला नरसी महेतांच्या काव्यात सहज पाहायला मिळतात.
संतकवी नरसिंह तथा नरसी महेताकृत रचनांमधील ‘दैवत विठ्ठलाचा उल्लेख’ हा ‘संत नामदेवांच्या विठ्ठलभक्तीच्या दाखल्यांसह आला आहे. त्यामुळे एकूणच त्या प्रांतातील वाङ्मयात तो संत नामदेवांमुळेच पोहोचला, असा दावा गुजरातमधील ज्येष्ठ अभ्यासक के. का. शास्त्रींनीदेखील केलेला दिसतो.
संत नामदेवरायांचा उत्तर भारतात प्रभाव रुजल्याचा एक पुरावा म्हणजे नामदेवरायांच्या सोरठ अर्थात सौराष्ट्रात झालेल्या दोन-अडीच वर्षांच्या मुक्कामाच्या नोंदी व त्यातून रुजलेला प्रभाव हा प्राचीन गुर्जरी हस्तलिखित दफ्तरांमध्ये आजही विद्यमान आहे.
नरसी महेता त्यांच्या साहित्यात वारंवार पंढरपूरचा विठ्ठल अर्थात हा द्वारकेतील रुक्मिणीवर असा उल्लेख जेव्हा गुजराती वाङ्मयात रुजवितात, तेव्हा वारकरी संतांसाठी हा ‘कान्हा-विठ्ठलवर’ कसा-कसा पावला आहे, याचे वर्णन मोठ्या उत्कटतेने ते करतात. किंबहुना बहुतांश रचनांमध्ये - ‘वहारे विठ्ठलजी धाय रे’ (प्रिय विठ्ठला धाव रे) किंवा कधी लडिवाळपणे ‘म्हारा विठ्ठलमुं जाईश वली रे’ (माझ्या विठ्ठलासी समर्पित होई मी रे) अशा संबोधनाने त्याला आळविताना दिसतात.
गुजरातच्या स्थानिक मान्यतेप्रमाणे विचार केला तर भागवत धर्म हा गुजरातमध्ये द्वारकेच्या स्थापनेपासून आहे. परंतु तेथील प्राचीन मंदिरांचा, स्थानिक वैष्णव संप्रदायांचा विचार केला, तर आजही तेथे स्वतंत्र विठ्ठलाचे मंदिर हे वैष्णव संप्रदायाच्या बैठका सोडल्या तर द्वारका, जुनागढ, मांगरोळ, सोमनाथ, वडोदरा या शहरांच्या नागर भागांमध्ये आढळले नाही वा तसे वाचनातही आले नाही. त्यामुळे येथील स्थानिक वैष्णव-मंडळांच्या भजनातील - ‘श्रीविठ्ठल, नामदेव महाराज, पंढरपूर'' या संज्ञा निश्चितच वेगळा अज्ञात इतिहास पुटपुटत राहतात.
उदाहरणार्थ, एका भजनातील काही अंश -
कानो रमतो रे, आव्यो गोकुळीयानी मांय, रमतो भमतो रे, ...
कानो रमतो रे, आव्यो पंढरपूरनी मांय,
अली शकुबाईनी सासु, तु तो सूती होय तो जाग ...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.