उद्योगनगरीत आणखी एक ‘आयटी पार्क’ चऱ्होली बुद्रुकमध्ये भूमिपूजन ः परिसराच्या विकासाला मिळणार चालना
पिंपरी, ता. २२ ः उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडला हिंजवडी येथे विकसित झालेल्या ‘आयटी पार्क’मुळे आयटी हब अशी नवी ओळख मिळाली. बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये या भागात आल्याने हजारो अभियंत्यांना रोजगार मिळाला. हिंजवडीनंतर आता चऱ्होली बुद्रूक येथे देखील आयटी पार्क विकसित केले जाणार आहे. यामुळे चिखली-मोशी-चऱ्होली परिसरातील विकासात भर पडणार आहे.
पन्नास हजार रोजगार उपलब्ध होणार
राज्य सरकारच्या नवीन आयटी धोरणानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १९९७ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये नवीन ‘आयटी पार्क’ विकसित होणार आहे. त्यामुळे जवळपास पन्नास हजार नोकरीच्या संधी या ठिकाणी निर्माण होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. चऱ्होली बुद्रूक येथील प्राइड वर्ल्ड सिटीच्या माध्यमातून तब्बल ३ दशलक्ष चौरस फूट परिसरात हा आयटी पार्क विकसित होणार आहे. याचे भूमिपूजन नुकतेच आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व ‘क्रेडाई’चे प्रमुख पदाधिकारी अरविंद जैन आणि बांधकाम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विकासाला चालना मिळणार
पुणे व पिंपरी चिंचवड भागात हिंजवडी आणि खराडी या भागात आयटी पार्क उभारण्यात आली आहेत. चऱ्होली येथे उभारण्यात आलेले आयटी पार्क हे तिसरे आयटी पार्क ठरणार असून, यामुळे मोशी- चऱ्होली- डुडुळगाव या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. या भागात रस्त्यांचे जाळे उभारण्याची ग्वाही यापूर्वीच महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली होती. त्यातील बहुतांश विकासकामे ही पूर्णत्वास येत आहेत. आता येणाऱ्या ‘आयटी पार्क’ मुळे येथे रोजगाराच्या संधीबरोबरच शाळा, हॉस्पिटल, हॉटेल, मॉल, रहिवासी सोसायट्या विकसित होण्यात मदत होणार आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रालाही चालना मिळेल, असे विकसकांनी सांगितले.
‘‘या आयटी पार्कसाठी आवश्यक आयटी इनक्युबेशन सेंटरचे काम सध्या सुरु करण्यात आले आहे. दोन लाख चौरस फूट परिसरात उभारण्यात येणारे हे सेंटर ऑगस्ट २०२५ पर्यंत तयार होईल. याचबरोबर प्रत्यक्ष आयटी पार्कचे काम देखील येत्या सहा महिन्यात सुरु होईल. या भागातील बहुतांश विकासकामे ९० टक्के पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे या परिसरात आयटी पार्कसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. उर्वरित कामे लवकर झाल्यास आयटी पार्कच्या उभारणीसाठी अधिक फायदेशीर ठरेल.
- अरविंद जैन, व्यवस्थापकीय संचालक, प्राइड ग्रुप
‘राज्याच्या नवीन आयटी- २०२३ धोरणाची पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त प्रशासक शेखर सिंह व बांधकाम व्यावसायिक अरविंद जैन यांच्यासोबत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बैठक झाली होती. या प्रस्तावित प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आहे. राज्यात माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे समाविष्ट गावांमध्ये उद्योग, बांधकाम आणि सेवा क्षेत्रातील सर्व घटकांची प्रगती होऊ शकते.
- महेश लांडगे, आमदार, भाजप, भोसरी विधानसभा
‘सकाळ’चे वृत्त खरे ठरले
मोशी- चऱ्होली- डुडुळगाव परिसरातील बांधकाम व्यावसायिक व महापालिका यांच्यात संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने ‘सकाळ’ने ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमार्तंगत बांधकाम व्यावसायिक व महापालिका आयुक्त यांच्यातील बैठकीचे आयोजन केले होते. ४ मार्च २०२४ रोजी ‘सकाळ’च्या पिंपरी चिंचवड येथील कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत चऱ्होली येथे येणाऱ्या आयटी
पार्क बाबत बांधकाम व्यावसायिक अरविंद जैन यांनी सूतोवाच केले होते. तसे वृत्तही ‘सकाळ’ने दिले होते. नुकत्याच झालेल्या आयटी पार्कच्या भूमिपूजनामुळे हे वृत्त खरे ठरले आहे.
फोटोः 33767
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.