जिवंत कलाकृतींमुळे मिळणाऱ्या श्रीमंतीला तोड नाही
सकाळ नाट्य महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचे मत

जिवंत कलाकृतींमुळे मिळणाऱ्या श्रीमंतीला तोड नाही सकाळ नाट्य महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचे मत

पिंपरी,ता. १० ः ‘जिवंत कलाकृतींमुळे जी श्रीमंती मिळते, त्याला तोड नाही. त्यामुळे नाटक करण्याचा आनंद काही वेगळाच असतो, असे मत ‘तू म्हणशील तसं!’ व ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ कलाकृतींमधील कलाकार लेखक व अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेत्री काजल काटे यांनी व्यक्त केले.
सकाळ नाट्य महोत्सवाला शुक्रवारपासून (ता. १०) सुरवात झाली. या अनुषंगाने या महोत्सवात आपली कला सादर करणाऱ्या संकर्षण कऱ्हाडे, स्पृहा जोशी व काजल काटे या कलाकारांनी पिंपरी चिंचवड येथील ‘सकाळ’च्या विभागीय कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी कविता, नाटक, अभिनय, मालिका या विषयांवर त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी ‘सकाळ’चे पिंपरी चिंचवड आवृत्तीचे सहयोगी संपादक जयंत जाधव व महोत्सवाचे सहप्रायोजक असणाऱ्या ऑक्सिकेअर हॉस्पिटलच्या डॉ. तृप्ती खाडे आदी उपस्थित होते.
स्पृहा जोशी यांनी ‘सगळं काही संपलं तरी प्रेम राहतंच नाही रे शिल्लक’ ही कविताही यावेळी सादर केली.

नाटकाने प्रेम दिलं ः काजल काटे
रेशीमगाठ मालिकेमध्ये काम केल्यानंतर ‘तू म्हणशील तसं’ हे नाटक सुरू झालं. या मालिकेच्या माध्यमातून शेफाली घराघरांत पोचली होती. त्यामुळे नाटकाला येणारे प्रेक्षक हे आवर्जून भेटायला येत होते. एवढंच नाही तर या नाटकातील भूमिकेसोबत मालिकेतील शेफालीचंही कौतुक करत होते, असे नाट्य कलाकार काजल काटे यांनी सांगितलं. लग्न होऊन दीड वर्ष झालेल्या जोडप्याच्या आयुष्यावर ‘तू म्हणशील तसं !’ हे नाटक बेतलेले आहे. घराघरांतील नवरा बायकोमध्ये होणारे ताण तणाव, किस्से हे सर्व या नाटकांतून अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे नवीन लग्न झालेल्या, लग्न ठरलेल्या सर्व जोडप्यांनी हे नाटक पहावे, असेही काजल यांनी सांगितले.

पुन्हा संहितेच्या प्रतिक्षेत ः स्पृहा जोशी
नाटक व नाटकाचा प्रयोग हा आमच्यासाठी एक कलाकृती असते. मात्र, काही प्रेक्षकांना मात्र आमचे नाटक हे त्यांच्या आयुष्याचे प्रतिबिंब वाटते. अनेकदा नाटकाच्या प्रयोगानंतर लोक भेटायला येतात, तेव्हा आमच्याही आयुष्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया ते देतात. असे अभिनेत्री व कवयित्री स्पृहा जोशी हिने सांगितले. ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमात आम्ही धमाल करतो. मात्र, पुन्हा नाटक करण्यासाठी चांगल्या संहितेच्या प्रतिक्षेत आहे, असेही त्यांनी सांगितले. कोणतीही नवी कलाकृती प्रेक्षकांसमोर लगेचच येण्यामागे सोशल मिडीयाचा खूप मोठा हात आहे. अभिनय करण्यासाठीच आम्ही या क्षेत्रात आलो आहोत. त्यामुळे नाटक, कवितांचे सादरीकरण, सिनेमा, मालिका काहीही करत असलो तरी चांगली टीम असली की मजा येते. संकर्षणच्या कवितांची मांडणी ही कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आपली वाटते, हे त्याचे वैशिष्ट्य आहे, असेही मत स्पृहा यांनी मांडले.

स्पृहाला कविता ऐकवायचो ः संकर्षण
आम्ही दोघे एकमेकांना ओळखत होतो. मी एखादी कविता केली की मी स्पृहाला कविता ऐकवायचो. कोरोना काळापासून आम्ही ‘खजिना’ नावाच्या कार्यक्रमातून कविता सादर करायला सुरवात केली. तेव्हा एका भागात मी स्पृहाला म्हणालो होतो की आपण एखादा असा कवितांचा कार्यक्रम करू आणि आज आम्ही संकर्षण व्हाया स्पृहाचा ७१ वा प्रयोग करणार आहोत. असे संकर्षण यांनी सांगितलं.

ऑनलाइन बुकिंगची सुविधा...
या नाट्य महोत्सवासाठी ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. ‘बुक माय शो’ आणि ‘तिकिटालय’ यावर तिकिटे उपलब्ध आहेत. महोत्सवाचे सहप्रायोजक चिंचवड येथील ऑक्सिकेअर हॉस्पिटल आणि सोमाटणे फाटा येथील सुरभी सिटी हे आहेत तर बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड हे फायनान्स पार्टनर आहेत.

तिकिटांचे दर (प्रतिव्यक्ती)
प्रतिनाटक तिकीट (तळमजला) ः ४०० रुपये
प्रतिनाटक तिकीट (बाल्कनी) ः ३०० रुपये

महोत्सवाचे वेळापत्रक
शनिवार (ता. ११) रात्री ः ९.३० वा : तू म्हणशील तसं !
रविवार (ता. १२) सायंकाळी ६ वा : करून गेलो गाव

नाट्य बुकिंगसाठी...
ऑनलाइन बुकिंग ः https://in.bookmyshow.com; www.ticketalay.com/ticketalay app
फोन बुकिंग ः ८९७५२३७०४१
अधिक माहितीसाठी संपर्क ः सचिन ः ९७३०९५९६९९
फोटोः 18868, 18867, 18869, 18866

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com