पिंपरी किस्से निवडणुकीचे

पिंपरी किस्से निवडणुकीचे

किस्से निवडणुकीचे
--
ये, गप्प बसा! तुम्हाला,
पाचशे देऊन आणलेत

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारसभा, वाहनफेरी, पदयात्रा सुरू होत्या. सभांसाठी वेगवेगळ्या भागातून कार्यकर्त्यांना आणण्यासाठी वाहनव्यवस्था होती. एका उमेदवाराने कार्यकर्त्यांना सभास्थळी आणण्यासाठी लक्झरी बसगाड्यांची व्यवस्था केली होती. प्रत्येक बससाठी एक महिला समन्वयक कार्यकर्ता होती. त्यांच्या परिसरातील महिलांना सभास्थळी घेऊन येण्याची आणि त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी कदाचित त्यांच्यावर असावी. त्‍यामुळे बस आली, महिला उतरल्या की झुंडीने सभास्थळी पोहोचत होत्या. स्थानिक नेत्यांची भाषणे सुरू होती. बघता बघता मैदान भरले. खुर्च्याही संपल्या. काही महिलांनी दोन-दोन खुर्च्या सांभाळल्या होत्या. काही एकावर एक खुर्ची ठेवून बसल्या होत्या. काही समोर खुर्ची ठेवून पाय पसरून बसल्या होत्या. काहींनी शेजारच्या खुर्चीवर हात ठेवला होता, त्यावर अन्य महिलांना त्या बसू देत नव्हत्या. काहींनी लहान मुलांनाही खुर्चीवर बसवले होते. हे प्रकार बसायला खुर्ची न मिळालेल्या व त्यांना घेऊन आलेल्या महिलांच्याही लक्षात आले. ‘लिडर’ महिलांनी ‘त्या’ महिलांकडून जबरदस्तीने (जवळपास हिसकावून) घेत, त्यांनी आणलेल्या महिलांना देत होत्या. त्यांस विरोध करणाऱ्या महिलांसोबत बाचाबाचीही होत होती. एका लिडरने थेट बॉउन्सर महिलेलाच बोलावून आणले आणि खुर्च्या मिळवल्या. एका महिलेने मी जेवतेय, असे हाताने खूण करून सांगितले. त्यावर ‘हातात डबा घेऊन खा’ असे बाउंसरने सुनावले व खुर्ची अन्य महिलेल्या मिळवून दिली. एका लिडरने साधारण तीन वर्षांच्या बाळाला खुर्चीवरून उचलले आणि त्याच्या आईच्या मांडीवर रागातच ठेवले. त्यावरून त्यांच्यात अरे-तुरेचा सामना रंगून बाचाबाची झाली. ते पाहून शेजारच्या कट्ट्यावर बसलेली एक व्यक्ती म्हणाली, ‘ये, गप्प बसा!, खुर्चीसाठी काय भांडताय, तुम्हालापण पाच-पाचशे देऊनच आणलंय!’ त्यावर त्या बाळाची आई पुटपुटली, ‘या, बेवड्याला काय जातंय बोलायला.’ कदाचित तोही त्यांच्यासोबत आलेला असावा. त्याच्या हातात हातरुमालात गुंढाळलेली पाण्याची बाटली होती. तो पाणी प्यायला. तिचे झाकण लावत, सुस्कारा सोडला आणि उग्र वास आला. तेव्हा कळले, तो, पाणी नाही, मद्य पित होता. महिलांची खुर्च्यांची उचलाउचली सुरूच होती! व्यासपीठावर प्रमुख वक्त्याचे आगमन होऊन भाषणही सुरू झालेले होते...!
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com