निवडणूक प्रचाराची मुसळधार पावसाने सांगता

निवडणूक प्रचाराची मुसळधार पावसाने सांगता

पिंपरी, ता.११ ः शहर, उपनगरासह मावळात शनिवारी (ता.११) सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जोरदार बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. शहरातील निम्मा भाग अंधारात राहिला. मावळातही अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. निवडणूक प्रचाराच्या सांगतेलाच पाऊस झाल्याने पुढाऱ्यांसह कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. यामधून लग्नसोहळ्याची वऱ्हाडी मंडळीही सुटली नाहीत.
पिंपरी-चिंचवड शहराला शुक्रवारी पावसाने झोडपले होते. त्यानंतर, दिवसभर आभाळ निरभ्र होते. शनिवारीही चांगले ऊन पडल्याने एक दिवस येऊन पाऊस नाहीसा झाल्याचे दिसत होते. पण, सायंकाळी पाचनंतर काळे ढग दाटून आले आणि अर्ध्या तासानंतर मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. या दमदार पावसाचे पाणी सखल भागांतील लोकांच्या घरांपर्यंत पोहोचले. रस्त्यावर सुद्धा पाणी साचल्याने दुचाकीचालकांना आणि पादचाऱ्यांना मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागत होती.

देहूतही हजेरी, वीजपुरवठा खंडीत
देहू : देहू परिसरात शनिवारी (ता.११) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावली. वीज पुरवठा ठप्प झाला. गेले दोन दिवस पावसाने हुलकावणी दिली होती. मात्र, शनिवारी पाऊस झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला. सुमारे अर्धा तास पाऊस पडत होता.

वऱ्हाडी मंडळींची धांदल; वीज गायब
तळेगाव दाभाडे ः मावळ तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाल्याने लग्न समारंभातील वऱ्हाडी मंडळीची मोठी धांदल उडाली. त्यातच अनेक भागांतील वीज पुरवठा खंडीत झाला.
सायंकाळी सात वाजता तळेगाव, वडगाव, कामशेतसह इतर ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला. अनेक ठिकाणी लग्न समारंभ सुरू होते. परंतु, अचानक सुरू झालेल्या पावसामुळे वऱ्हाडी मंडळीची पळापळ झाली.

अधिकारी, कर्मचाऱ्यांना पावसाचा फटका
लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. निवडणुकीसंदर्भातील सूचना घेतल्यावर निवासस्थानाकडे जाण्याच्या तयारीत असताना विजेच्या कडकडाटासह एक तासा पेक्षा जास्त पाऊस सुरू राहिला. त्याचा मोठा फटका बसला.

मुसळधार पावसात प्रचाराची सांगता
निवडणुकीच्या प्रचाराचा शनिवारी शेवटचा दिवस होता. कार्यकर्ते गावोगावी फेरी, काढून प्रचार करत होते. मात्र, अचानक पाऊस सुरू झाल्याने पुढाऱ्यांसह कार्यकर्ते, निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.


TDB24B00620

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com