लोकशाहीच्या उत्सवात कलाकारांचा ‘शो’

लोकशाहीच्या उत्सवात कलाकारांचा ‘शो’

पिंपरी, ता. १३ ः मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. १३) मतदान झाले. या वेळी शहरात मतदान असणाऱ्या कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. सौरभ गोखले यांनी अजमेरा कॉलनी येथे मतदान केले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने निगडीतील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेमध्ये तर पुष्कराज चिरपुटकर याने यमुनानगर येथील शिवभूमी विद्यालय येथे मतदानाचा हक्क बजावला.

‘केंद्र सरकारमध्ये कोण असावे, यासाठी हे मतदान आपण करत आहोत. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोण आहे, हा विचार न करता देशाचा विचार करून मतदान करा. मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वांनी तो बजवावा असा माझा आग्रह आहे.
- सौरभ गोखले, अभिनेता

प्रशासनाने मतदानासाठी अगदी चांगली सोय केलेली आहे. सर्वांना सुटीही दिलेली आहे. मतदान करणे ही अगदी साधी सोपी प्रक्रिया आहे. आपल्‍या चांगल्या भविष्यासाठी त्यामुळे प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहिजे.
- पुष्कराज चिरपुटकर, अभिनेता

आपण जर पाच वर्ष सरकारला जाब विचारत असून, तर आपण मतदान केले पाहिजे. कर्नाटकमध्ये शूट करत होते. येथून मी खास मतदानासाठी पिंपरी-चिंचवडला आलो आहे. नेता निवडण्याची संधी आपल्याला मिळत आहे. ती गमावली नाही पाहिजे. भारत देश घडवायचा असेल तर चांगल्या व्यक्तींना निवडून दिले पाहिजे. तर आपल्याला पुढे जाऊन चांगल्या सोयी सुविधा मिळतील.
- डॉ. उत्कर्ष शिंदे, गायक व अभिनेता

अपेक्षा घेऊनच आपण मतदानासाठी बाहेर पडतो. आजचाच दिवस आहे. जेव्हा आपल्याला महत्त्व असते. हा महत्त्वाचा दिवस जर आपण वाया घालवला, तर पुढील पाच वर्षे आपल्याला काहीच बोलण्याचा अधिकार राहणार नाही. राजकारणावर अनेकजण घरात बसून डिबेट करतात. मात्र, जोपर्यंत आपले कर्तव्य बजावत नाही तोपर्यंत याला काही अर्थ नाही. मतदानातून बदल घडेल ही अपेक्षा.
- सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

सावनी रवींद्र मात्र वंचित
अनेक मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. याचा फटका गायिका सावनी रवींद्र यांनाही बसला. गेल्या तीन दिवसांपासून मी आपले नाव मतदारयादीत शोधत होते. विविध ऑनलाइन पोर्टलवर अनेकदा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. त्यामुळे थेट माटे प्रशाला येथील मतदान केंद्रावर जायचा निर्णय घेतला. तिथे माझ्या पूर्ण कुटुंबाचे नाव होते. मात्र, केवळ माझेच नाव यादीतून वगळण्यात आले होते, असे गायिका सावनी रवींद्र यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावरही त्यांनी केलेली पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमध्ये त्यांनी मतदान केंद्रावरील सेल्फी व शाई न लावलेल्या बोटाचा फोटो टाकून आपल्याला मतदान न करता आल्याची खंत व्यक्त केली आहे.

‘‘मतदारयादीत नाव सापडत नसल्याने केंद्रावर जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडले नाही. ज्या केंद्रावर मी अनेक वर्षे मतदान करते तिथे आमच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांची नावे होती, माझे नव्हते. याबाबत मी स्वतः वोटिंग ऑफिसरची भेट घेऊन एईडी पद्धतीने मतदान करू शकते का? याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी नकार दिल्याने मत न देताच घरी यावे लागले. हे अत्यंत खेदजनक आहे.
- सावनी रवींद्र, गायिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com