नवमतदारांचा उत्साह, आपलं मत महत्त्वाचं

नवमतदारांचा उत्साह, आपलं मत महत्त्वाचं

पिंपरी, ता. १३ ः सकाळी लवकर मतदानासाठी बाहेर पडलेले नवमतदार, यादीत नाव शोधण्याची लगबग, दुसऱ्या केंद्रावर मतदान असल्याने आपले मतदान झाल्यावर मुलांना मतदानासाठी घेऊन आलेले पालक, मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात आलेले तरुण, त्यांच्यातील मतदान करण्याची उत्सुकता व पहिल्यांदा मतदान केल्याचा आनंद, असे चित्र सोमवारी (ता. १३) शहरातील मतदान केंद्रावरील नवमतदारांमध्ये दिसत होते.

‘‘एक जागरूक नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी मत दिले पाहिजे. सध्या देशात बदल होण्याची गरज आहे. आणि बदल हवा असेल तर तरुण पिढीने घराबाहेर पडून मतदान केले पाहिजे.’’
- वैष्णवी डुंबरे, चिंचवड

‘‘मी आतापर्यंत मतदान केले नव्हते. आज पहिल्यांदा मतदान केले आहे. आपल्या एका मतामुळे कोणीतरी निवडून येणार आहे. त्यामुळे आपले मत महत्त्वाचे आहे. ही भावना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देते. महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी मतदान करा.’’
- मोनिका शेरखाने, बिजलीनगर

‘‘आज मतदान केल्यावर देशासाठी काहीतरी करतोय याबाबत अभिमान वाटतोय. काही लोकांमध्ये अद्यापही तेवढी जागृती नाही. मात्र, आपल्याला मतदानाचे महत्त्व कळालं पाहिजे.’
- मृणाल जोशी, रस्टन कॉलनी

‘‘आपल्याला आपला नेता ठरविण्याचा अधिकार आहे. मात्र, अनेकदा नागरिक घराबाहेर पडून मतदान करत नाहीत. पण जर मतदान केले नाही तर, पुढील पाच वर्षे आपल्याला कोणालाच बोलण्याचा अधिकार राहणार नाही. त्यामुळे मतदानाचे कर्तव्य जरूर करावेत.’’
- सायली जोशी, रावेत

‘‘पहिल्यांदाच मतदान करत होते, त्यामुळे उत्सुकता होती. थोडीशी भीती पण वाटत होती. मात्र आपण आपले कर्तव्य केले याचे समाधान आहे. मतदान इतके महत्त्वाचे असते, याचा प्रत्यय मतदान केल्यावर आला.’’
- स्नेहाली काळे, चिंचवड

‘‘पहिल्यांदाच मी मत दिलं, त्यामुळे मतदान प्रक्रियेची उत्सुकता होती. ज्याला निवडून द्यायचे आहे त्याला मत दिल्याचेही मला समाधान आहे. आमच्या घरात तीन नवमतदार होते. तिघांनीही मतदान केले आहे.’’
- रोहन कुदळे, कुदळे कॉलनी

‘‘या लोकसभेला पहिल्यांदा मतदान होणार होते म्हणून आम्ही नावनोंदणी केली होती. मतदारयादीत नाव येईल की नाही? मतदानासाठी काही अडचण येईल का? याबाबत साशंकता होती. मात्र, पहिले मतदान व्यवस्थित करता आले.’’
- आयुष कुदळे, कुदळे कॉलनी

‘‘पहिल्यांदाच मतदान केल्याचा आनंद आहे. मात्र, वोटर स्लीप घरी नीट न पोचल्याने मतदान केंद्रावर जाईपर्यंत थोडासा गोंधळ झाला. मात्र, आपण आपले कर्तव्य केल्याचे समाधान आहे.’’
- ओंकार कुदळे, कुदळे कॉलनी

मतदानासाठी अमेरिकेतून तिने गाठली पिंपरी
आपले पहिले मतदान करण्यासाठी परदेशात शिकणाऱ्या तरुणीने अमेरिकेहून थेट आपले शहर गाठले. समृद्धी कुलवडे ही टेक्सास येथे संगणक शास्त्राची पदवी घेत आहे. सुट्टीसाठी ती पुण्याला येणार होती. निवडणुकांच्या तारखा समजल्यानंतर तिने याच दरम्यान भारतात येण्याचे नियोजन केले. यमुनानगर येथे राहणाऱ्या समृद्धीने शिवभूमी येथे मतदानाचा हक्क बजावला.

‘‘येथील निवडणुकांच्या तारखा माहिती होत्या. त्यानुसार मी येण्याचे नियोजन केले. पहिलेच मतदान होते त्यामुळे मी अस्वस्थ होते. आधी
असं वाटायचं की मत द्यायला यायलाच हवं का? असा काय फरक पडणार आहे. मात्र, आता असे वाटते की प्रत्येक मत मोजले जाते. त्यामुळे एका मताने नक्कीच फरक पडू शकतो.’’
- समृद्धी कुलवडे, यमुनानगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com