सकाळी रांगा, दुपारी वर्दळ कमी 
मावळ मतदारसंघ ः ऊन आणि पावसाचा मतदानावर परिणाम

सकाळी रांगा, दुपारी वर्दळ कमी मावळ मतदारसंघ ः ऊन आणि पावसाचा मतदानावर परिणाम

पिंपरी, ता. १३ : मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत मोठ्या प्रमाणात मतदान झाले. मात्र, दुपारी उन्हाच्‍या तडाख्यामुळे नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरविल्‍याने एकूण मतदानाच्‍या टक्‍केवारीत घट झाली. दुपारी साडेतीनपर्यंत एकूण ३७ टक्‍के मतदान झाले होते. पाचपर्यंत मावळ मतदारसंघात केवळ ४६.३ टक्‍के मतदान झाले होते तर शिरूर लोकसभा मतदारसंघात ४३.८९ टक्‍के मतदान पार पडले.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सकाळच्‍या आणि संध्याकाळच्‍या टप्‍प्‍यात मतदानासाठी गर्दी झाली. उन्‍हाच्‍या तडाख्यात न जाता सकाळीच मतदान उरकून घेण्याकडे अनेकांचा कल होता. निगडीत मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्‍याने या ठिकाणी उशिरा मतदान सुरू झाले. मतदानासाठी आलेल्‍या मतदारांकडे मोबाईल असेल तर पोलिसांकडून मज्‍जाव केला जात होता. त्‍यामुळे पोलिस आणि नागरिकांच्‍या वादावादीचा प्रसंगदेखील उद्धभवत होता. दुपारी उन्‍हाचा तडाखा वाढल्‍याने मतदानाला मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला. रावेत येथील सिटी प्राईड, निगडीतील पवळे हायस्‍कूल, पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय, पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर विद्यालयासह काही ठिकाणी तुरळक गर्दी पहायला मिळाली. तर; चिंचवड येथील कमलनयन बजाज हायस्‍कूल, पिंपळे गुरव येथील महापालिका शाळा या ठिकाणी मतदारांच्‍या रांगा पहायला मिळाल्या.

शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांनी थेरगावमधील नागुजी बारणे शाळेतील मतदान केंद्रावर मशिन उलट्या का लावल्‍या, या बाबत जाब विचारत गोंधळ घातला. याप्रकरणी त्‍यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला. ही घटना वगळता उर्वरित ठिकाणी मतदान सुरळीत पार पडले.


जाचक नियमांचा अडसर
यंदाच्‍या लोकसभा निवडणुकीत जाचक नियमांचा मतदारांना त्रास सहन करावा लागल्‍याचे पहायला मिळाले. मोबाईल बंदी असल्‍याने अनेकांची गैरसोय झाल्‍याचे पहायला मिळाले. मोबाईल ठेवायचा कुठे, मतदानाची स्लीप कशी काढायची अशा समस्‍या मतदारांना भेडसावत होती. तसेच या अटींमुळे अनेकांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती. त्‍यामुळे देखील मतदानाच्‍या टक्‍केवारीत घट झाली.

पावसामुळे घाटाखाली मतदानात घट
घाटाखालील पनवेल व कर्जत या भागात दुपारी तीननंतर जोरदार पाऊस झाल्याने मतदानावर त्याचा परिणाम होऊन कमी मतदान झाले. उरणला थोडा पाऊस झाला व वादळी वारे होते. काही मतदान केंद्रावर वीज नसल्याने मोबाईलच्या बॅटरीवर मतदान करण्याची वेळ आली. घाटाखालीही मतदानात फारसा उत्साह नसल्याने मतदान कमी झाले. पाऊस कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

क्षणचित्रे -

- सकाळच्‍या टप्‍प्‍यात उत्‍स्‍फूर्त मतदान
- दुपारी तीनपर्यंत ३७ टक्‍के मतदान
- मोबाईल वापरण्यास बंदी
- आचारसंहितेच्‍या उल्‍लंघनप्रकरणी लोकप्रतिनिधींवर गुन्‍हे
- व्‍हीव्‍हीपॅट मशिनमधील तांत्रिक बिघाडाच्‍या घटना
--------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com