पिंपरी मावळ लोकसभा अंतिम मतदान

पिंपरी मावळ लोकसभा अंतिम मतदान

‘मावळ’मध्ये विजय शिवसेनेचाच! पण, कोणत्या?

लोकसभा निवडणुकीनंतरचे चित्र; बारणे हॅटट्रिक साधणार की वाघेरे खेचून आणणार

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १४ ः मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. १३) झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी मंगळवारी (ता. १४) जाहीर केली. मंगळवारी सकाळपर्यंत सर्व मतमोजणीच्या ठिकाणी अर्थात बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पोहोच झाली. एकूण ५४.८७ टक्के अंतिम मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले. नाते-गोते आणि शिवसेनाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी झालेली ही लढत पंतप्रधान मोदींसाठी मत मागितलेल्या भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत सलग तीन वेळा शिवसेनाचाच उमेदवार विजयी झाला आहे. आता चौथ्यांदा शिवसेना लढत आहे. मात्र, प्रतिस्पर्धीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आहे. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. निवडणूक आयोग व न्यायालयीन लढाईनंतर ‘शिवसेना’ नाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे यांना मिळाले. त्यामुळे ठाकरे यांना नवीन नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष’ व ‘मशाल’ चिन्ह घ्यावे लागले. त्यांची कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी होती. मात्र, राष्ट्रवादीमध्येही फूट पडून अजित पवार शिंदे यांच्याप्रमाणेच भारतीय जनता पक्षासोबत आले. त्यांची महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना मावळ मतदारसंघात रंगला. त्यातही दोन्ही शिवसेना पक्षांनी या जागेवर दावा केला आणि त्यात दोन्हीही अर्थात शिंदे व ठाकरे यांना यश आले. शिंदे यांनी विद्यमान खासदार बारणे यांना पुन्हा संधी दिली. तर, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले व लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले संजोग वाघेरे पाटील यांना ठाकरे यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसेनाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असा सामना रंगला. त्यात विजयी कोणती शिवसेना होणार? याबाबत आता उत्सुकता आहे.

विधानसभानिहाय समिकरणे
- मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल व चिंचवड विधानसभा हे भाजपचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. मात्र, २०१९ च्या तुलनेत दोन्ही ठिकाणी कमी झालेले मतदान कोणाला फायद्याचे ठरणार? चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आणि पनवेलमधील माजी खासदार रामशेठ ठाकूर व प्रशांत ठाकूर हे भाजपची वोट बॅंक राखणार का? याची उत्सुकता आहे.
- २०१९ च्या विधानसभेपूर्वीपर्यंत भाजपचाच बालेकिल्ला अशी ओळख असलेला मावळ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने खेचून आणला होता. त्यासाठी भाजपमधीलच सुनील शेळके यांना उमेदवारी दिली होती. आता तीच अजित पवार यांची राष्ट्रवादी व आमदार सुनील शेळके भाजपसोबत आहेत. शिवाय, पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादीचेच पर्यायाने अजित पवारांचे प्राबल्य आहे. त्यांचे समर्थक आमदार अण्णा बनसोडे आहेत. त्यामुळे मावळ व पिंपरीतील राष्ट्रवादीने शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंसाठी किती निष्ठेने काम केले हे निकालानंतरच कळणार आहे.
- कर्जत व उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. शेकाप महाविकास आघाडीत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे उमेदवार आहेत. त्यांना दोन्ही ठिकाणांहून मताधिक्य मिळणार की पुन्हा बारणेंच्या पारड्यात मतदान झाले, हे चार जूनलाच स्पष्ट होणार आहे.

मावळचा राजकीय इतिहास
- मावळ मतदारसंघ २००८ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर २००९ मध्ये पहिली निवडणूक झाली. भाजप-शिवसेना युतीतील शिवसेनेचे गजानन बाबर पहिल्यांदा खासदार झाले. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतील राष्ट्रवादीचे आझम पानसरे पराभूत झाले
- २०१४ च्या निवडणुकीत भाजप-शिवनेना युतीतील शिवसेनेने बाबर यांच्याऐवजी श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली. शेकापतर्फे लक्ष्मण जगताप लढले. आघाडीकडून राष्ट्रवादीने राहुल नार्वेकर यांनी निवडणूक लढविली होती. बारणे विजयी झाले
- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या निवडणुकीत युतीतील शिवसेनेने बारणेंना उमेदवारी दिली. त्यावेळी जगताप व बारणे एकत्र आले. आघाडीतील राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचा पराभव झाला
- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीची महाविकास आघाडी झाली. काही महिन्यातच शिवसेना व पाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. अनुक्रमे एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी भाजपला साथ देत महायुतीत सामिल झाले
- २०२४ च्या निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे व महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे राहिला. त्यांनी अनुक्रमे बारणे व संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली.
- महायुतीतील भाजपचे दोन व पाठिंबा दिलेला अपक्ष एक, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचा एक असे सहा आमदार, माजी मंत्री बाळा भेगडे व स्वतः विद्यमान खासदार या बारणे यांच्या जमेच्या बाजू आहेत.
- वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे केंद्र शासनाच्याबाबतची नाराजी वाघेरे यांचे नाते-गोते व राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीची शरद पवार व उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती या जमेच्या बाजू.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com