मावळात कमी टक्केवारीचा फायदा कोणाला?

मावळात कमी टक्केवारीचा फायदा कोणाला?

मावळ लोकसभा मतदारसंघात सुरवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक अंतिम टप्प्यात रंगतदार झाली. महायुतीतर्फे शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे व महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे व वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी, बसपचे राजाराम पाटील यांच्यासह ३३ जण रिंगणात होते. मावळात २५ लाख ८५ हजार १८ मतदानापैकी १४ लाख १८ हजार ४३९ मतदारांनी मतदान केले.
मागील वेळी २०१९ मध्ये ५९.४५ टक्के मतदान झाले होते. तर; यावेळी २०२४ मध्ये ५४.८७ टक्के मतदान झाले आहे. हा घसरलेला ५.४२ टक्क्यांचा परिणाम कोणावर होणार ? याबाबत उत्सुकता आहे. मागील वेळच्या तुलनेत ५२ हजार ५७८ मतदान जादा झाले आहे. बारणे हे चिंचवड मतदारसंघात रहिवासी आहेत; तर वाघेरे ही पिंपरीतील रहिवासी आहेत. भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या व सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या अनुक्रमे चिंचवड व पनवेल मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ५२.२० व ५०.०५ टक्के झाले आहे. या ठिकाणी अनुक्रमे मागील वेळेच्या तुलनेत ४.०९ व ५.२७ टक्के मतदान कमी झाले. पनवेल व उरणला दुपारी तीन ते पावणेसहाच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला; तर उरणला वादळी वारे होते. घाटावर पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा मतदारसंघात उन्हाचा तडाखा जास्त होता. या वातावरणाचाही परिणाम मतदानावर झालेला आहे.
बारणे यांच्या प्रचारासाठी अर्ज भरण्यापासून ते प्रचाराच्या सांगतेला रोड शो घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरपूर ताकद देण्याचा प्रयत्न केला. तर; महायुतीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री उदय सामंत यांनी सभा घेतल्या. तर; महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आपचे खासदार संजय सिंह यांनी सभा घेतल्या.
केंद्र शासनाकडून रेल्वे चौपदरीकरणासह आदी न झालेली कामे, वाढती महागाई, बेरोजगारी व बारणे यांच्या बाबतच्या नाराजीचा फायदा होऊन विजयी होण्याचा विश्‍वास महाविकास आघाडीला आहे; तर नियोजनबद्ध प्रचार व महायुतीच्या वाढलेल्या ताकदीमुळे महायुतीला विजयाची खात्री आहे. प्रत्यक्षात घटलेला मतदानाचा टक्का व झालेले मतदान कोणाला फायद्याचे तसेच तोट्याचे ? यावरच मावळचा निकाल ठरणार आहे.

मतदान २०२४ - ५४.८७ टक्के, २०१९ - ५९.४५ टक्के
---------------
विधानसभा निहाय मतदानाची टक्केवारी
मतदारसंघ --------- २०२४ -------- २०१९
- पिंपरी ------------ ५०.५५--------५४.४९
- चिंचवड-----------५२.२०---------५६.२९
- मावळ ------------५५.४२---------६२.२९
- उरण --------------६७.०७--------६७.२१
- कर्जत--------------६१.४०--------६७.७६
- पनवेल-------------५०.०५--------५५.३२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com