पिंपरी जीवघेणे होर्डींग

पिंपरी जीवघेणे होर्डींग

जीवघेणे होर्डिंग्ज ः लोगो
--
नियमबाह्य होर्डिंग्ज ठरताहेत ‘काळ’

शहरातील स्थिती; प्रमाणापेक्षा अधिक उंची ठरतेय धोकादायक

पिंपरी, ता. १५ ः मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १४ जणांचा बळी गेला आणि गेल्यावर्षी किवळेत घडलेल्या घटनेच्या कटू आठवणी जाग्या झाल्या. नियमबाह्य पद्धतीने उभारलेले होर्डिंग्ज जीवघेणे ठरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातही मोक्याच्या ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज उभे आहेत. त्यांचा आकार, उंची, ठिकाणे याबाबतचे सर्व नियम पायदळी तुळवले गेले आहेत. सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने व पावसाळाही तोंडावर असल्याने आणखी बळी जाण्याची वाट प्रशासन पाहतेय का? असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गालगत (मुंबई-बंगळूर महामार्ग) किवळे येथील होर्डिंग गेल्या वर्षी १७ एप्रिल रोजी वादळी पावसामुळे कोसळले होते. त्याखाली थांबलेल्या पाच जणांचा बळी गेला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक होर्डिंग्जची शोध मोहीम सुरू केली. १९१ होर्डिंग्ज काढून टाकले. होर्डिंग्जच्या ढाच्यांचे स्ट्रक्चरल ऑडीटही केले होते. मात्र, शहरातील प्रत्येक रस्त्यावर अद्यापही धोकादायक व अनधिकृत होर्डिंग्ज दिसत आहेत.

जाधववाडीत पुन्हा उभारले होर्डिंग
महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्जवर गेल्या वर्षी कारवाई केली होती. त्यात जाधववाडीतील राजा शिवछत्रपती चौकालगतच्या होर्डींग्जचाही समावेश होतो. त्याच्या सांगड्याचा एक खांब प्राधिकरणाच्या जागेत व दुसरा खांब महापालिकेच्या जागेत पदपथावर होता. ते होर्डिंग्ज एका माजी महापौराने उभारून भाडेही तेच घेत होते. त्यावर कारवाई करणाऱ्या पथकाला दमदाटीही केली होती. पोलिस बंदोबस्तात होर्डिंग काढले होते. आता त्या जागेवर अर्थात पदपथावर पुन्हा होर्डिंग उभे असून, दोन खांबांऐवजी ते एकाच खांबावर असल्याने धोकादायक आहे.

घाटकोपर घटनेनंतर प्रशासनाला जाग
मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १४ जणांना बळी केल्यानंतर राज्य सरकारसह जिल्हा व महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अवैध व धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई करण्याचा आदेश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रभाग संचालक लहू माळी यांनी दिला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी महापालिकेला आदेश देऊन धोकादायक होर्डींग्जबाबत कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने बुधवारपासून (ता. १५) शहरातील होर्डींगचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

असे आहेत होर्डिंग्ज
- मुंबई-पुणे महामार्गावर निगडी-दापोडी दरम्यान ३५ मोठमोठे होर्डिंग्ज
- सरकारी जागेवर खासगी व्यक्तींनी अनधिकृतपणे उभारलेले
- विनापरवाना घरांचे छत, पदपथ, बागेत, चौकांत, इमारतींच्या संरक्षक भिंतींवर
- होर्डिंग्ज उभारणीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आपापल्या सोयीनुसार
- परवाना एक, होर्डिंग्ज अनेक; परवान्यावर नमूद व प्रत्यक्षातील आकारात फरक

जिल्हा प्रशासनाच्या सूचना
- शहरातील व महामार्गावर लावलेल्या होर्डिंग्जची रचनात्मक तपासणी करावी
- तपासणीत आढळलेले अनधिकृत होर्डिंग्ज काढून संबंधितांवर कारवाई करावी
- दुर्घटना टाळण्यासाठी होर्डिंग्जच्या परिसरात न थांबण्याच्या नागरिकांना सूचना द्यावी
- सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा दाखला १५ दिवसांत सादर करावा
- स्ट्रक्चरल ऑडिटने केलेले होर्डिंग्ज अनधिकृत समजून काढून टाकावेत

शहरातील अधिकृत होर्डिंग्ज ः ११३६
गेल्या वर्षी कारवाई केलेले ः १९१
सुमारे अनधिकृत होर्डिंग्ज ः ४०००

चिंचवड येथील हुतात्मा क्रांतिवीर चापेकर स्मारकाच्या आवारातही एकाच खांबावर उंच होडिंग्ज उभारले आहे. रस्त्याच्या कडेला हे ठिकाण असून स्मारकाच्या आवारात ग्रंथालय असून अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी येत असतात. स्मारकाला अनेक नागरिक भेट देत असतात. शिवाय, त्यालगत मॉल व पीएमपीचे बसस्थानक आहे. त्यामुळे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. होर्डिंग अनधिकृत असून ते कोसळण्यास जीवित हानी होऊ शकते. त्यावर कारवाई करावी.
- राजाभाऊ गोलांडे, अध्यक्ष, गांधीपेठ तालीम मित्रमंडळ, चिंचवड

शहरात एक हजार १३६ अधिकृत होर्डिंग्ज आहेत. गेल्या वर्षी १९१ अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली होती. बुधवारपासून परवाना निरीक्षकांच्या सात पथकांद्वारे सर्वेक्षण सुरू केले आहे. परवाना आहे की नाही, उंची किती आहे, आकार किती आहे, जागा कोणाची आहे यानुसार सर्वेक्षण करून अनधिकृत होर्डिंग्ज काढले जाणार आहे. गेल्या वर्षी न्यायालयात गेलेले होर्डिंग्ज धारकांना शुल्क भरून अनधिकृत करून घेण्याची व स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची कार्यवाही सुरू आहे.
- संदीप खोत, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com