शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरात अग्निशमन केंद्राची गरज

शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरात अग्निशमन केंद्राची गरज
Published on

शाहूनगर परिसरात हवे अग्निशमन केंद्र

नागरिकांची मागणी; जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी हवी उपाययोजना

पिंपरी, ता. २१ : दाट लोकवस्‍ती असलेल्‍या शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरात अग्निशमन केंद्र निर्माण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. या परिसरात सातत्‍याने आगीच्‍या घटना घडत असून, मोठी जीवित आणि वित्तहानीला सामोरे जावे लागत आहे. संत तुकारामनगर पिंपरीतील अग्निशामक केंद्रातून वाहन येईपर्यंत मोठे नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी या परिसरात अग्निशमन केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.

शहरात मागील काही महिन्यांत तळवडे, शाहूनगर, चिखली आदी ठिकाणी भीषण आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी झाली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील औद्योगिक क्षेत्रात आगीच्या घटनांमध्येसुद्धा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर या दाट लोकवस्तीच्या परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्राची गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी शाहूनगर येथील एका दुकानाला लागलेल्या आगीत दोन अल्पवयीन मुलांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. हा दुर्देवी प्रकार ३० ऑगस्ट २०२३ रोजी घडला होता. तळवडे येथील स्पार्कल फायर कॅण्डल बनविणार्‍या कंपनीस आग लागून १४ महिला कामगारांचा मृत्यू झाला होता. ती दुर्घटना ८ डिसेंबर २०२३ रोजी घडली होती. असे प्रकार परिसरात सतत घडत आहेत. आगीसारखी दुर्घटना घडल्यास तातडीने अग्निशमन विभागाची मदत मिळणे अपेक्षित आहे. त्‍यामुळे मोठी दुर्घटना टाळता येईल. यासाठी महापालिकेने त्‍वरीत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. या बाबत भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गारखे यांनी देखील महापालिका आयुक्‍त शेखर सिंह यांना पत्र दिले आहे.

अग्निशामक विभागाचे कर्मचारी पोचण्यात होतोय उशीर
शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरात सातत्‍याने आगीच्‍या घटना घडत आहेत. गेल्‍या काही महिन्‍यांपासून चार वेळा या परिसरात अशी दुर्घटना घडली आहे. आगीच्‍या घटनेची वर्दी मिळाल्‍यानंतर संत तुकारामनगर पिंपरी येथून अग्निशामक विभागाचे कर्मचारी रवाना होतात. मात्र हे अंतर लांब आहे. तक्रार मिळाल्‍यानंतर घटनास्‍थळी अग्निशामक विभागाचे वाहन पोहोचेपर्यंत सुमारे अर्धा तासांचा कालावधी जात आहे. परिणामी आगीच्‍या दुर्घटनेत मोठी हानी होत आहे. घरातील साहित्‍य जळून खाक होऊन आर्थिक नुकसान होत आहे. त्‍यामुळे या परिसरात अग्निशमन केंद्राची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

अनेक लोकांनी वाढीव बांधकाम केले आहे. त्‍यामुळे अग्निशामक विभागाचे वाहन देखील जाण्यास जागा नसते. त्‍यामुळे या परिसरात अग्निशामक केंद्र निर्माण होणे फायद्याचेच आहे. मात्र, याबरोबरच प्रत्‍येक सोसायटीत देखील स्‍वतंत्र अग्निशामक यंत्रणा उभारणे आवश्‍यक आहे. त्‍या बाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.
- राजेंद्र घावटे, नागरिक

आगीच्‍या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्‍या पार्श्वभूमीवर योग्य वेळेवर खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी या परिसरात अग्निशामक केंद्र सुरू झाल्‍यास वेळेत मदत पोचेल. त्‍यामुळे होणारे नुकसान टळेल.
- जितेंद्र छाबडा, नागरिक

शाहूनगर, पूर्णानगर परिसरात अग्निशामक केंद्राची स्‍थापना करण्याबाबत सध्या महापालिकेची जागा उपलब्ध नाही. मात्र, या परिसरापासून चार मिनिटांच्‍या अंतरावर चिखली येथे अग्निशामक केंद्र आहे. आगीची घटना घडल्‍यास त्‍वरीत त्‍याठिकाणी वाहने पाठवण्याची व्‍यवस्‍था आहे. आगीच्‍या घटनेची व्‍याप्‍ती पाहून इतर केंद्रातील वाहनांना बोलावले जाते.
- मनोज लोणकर, उपायुक्‍त, अग्निशामक विभाग. पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com