सिद्धी प्रकल्पातर्गंत महिलांचा करसंकलनास हातभार

सिद्धी प्रकल्पातर्गंत महिलांचा करसंकलनास हातभार
Published on

पिंपरी, ता. २१ ः कोणी घरकाम करणारे, कोणी धुणीभांडी करून घराला आर्थिक हातभार लावणारे तर कमी शिक्षण होऊनही काहीतरी काम करण्याची इच्छा या आणि अशा अनेक होतकरू महिलांनी केलेल्या बिल वाटपाच्या कामामुळे करसंकलनाला हातभार लागला आहे. २०२३ पासून सुरु झालेल्या सिद्धी प्रकल्पातर्गंत शहरातील विविध बचत गटांतील गरजू महिलांना महापालिकेची विविध बिले घरपोच करण्याचे काम देण्यात आले. महिलांनी पहिल्याच वर्षी ९८ टक्के बिलांचे वाटप केले. कलेच एवढेच नाही तर नवीन पत्ते, बदललेले मोबाईल नंबर यांची यादीही अद्ययावत करण्याचे काम केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका व महिला विकास महामंडळ यांच्याकडे नोंदणी असणाऱ्या बचत गटातील जवळपास साडेतीनशे महिला हे काम करत आहेत. २०२३ मध्ये पहिल्यांदा ही संकल्पना पुढे आली. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी कोणत्याही शिक्षणाची अट ठेवण्यात आली नाही. महिलांना करसंकलन विभागाच्यावतीने प्रशिक्षण देण्यात आले. विविध करांची बिले वाटण्याबरोबरच बदललेले मोबाईल नंबरची नोंद घेणे ते ॲपवर अद्ययावत करणे अशीही कामे या महिलांनी केली.

दोन महिन्यामध्ये काम पूर्ण
करपावत्या वाटपाचे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच करावे लागत असल्याने ते बरेच दिवस चालत असे. त्यामुळे करभरणा करण्यासाठी विलंबही होत असे, अनेकदा पावत्या न पोचल्याने करभरणा केला जात नसे. मात्र, या महिलांनी हे काम दोन महिन्यांमध्येच पूर्ण केल्याने २०२३- २४ मध्ये करसंकलन वाढले असल्याचे या विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.


सिद्धी प्रकल्पाव्दारे झालेली कामगिरी
- कराच्या बिलांचे वाटप ः चार लाख चौदा हजार ४०१ ( एक मे पासून आतापर्यंत)
- मोबाईल नंबरचे व्हेरिफिकेशन ः ६३ हजार ५७९
- अद्ययावत करण्यात आलेले मोबाईल नंबर ः दोन लाख वीस हजार ५४७

‘गेल्या वर्षी शहरात सहा लाख मालमत्तांची नोंद झाली होती. त्यातील जवळपास शंभर टक्के मालमत्ताधारकांना बिले प्राप्त झाली. तसेच, ज्या मालमत्ताधारकांच्या मोबाईल नंबरची नोंद आमच्याकडे नव्हती ती देखील करण्यात आली. हे काम सुरू असून केवळ महिनाभरात चार लाखांपेक्षा अधिक मालमत्ताधारकांना बिलांचे वाटप झालेले आहे. सिद्धी प्रकल्पामुळे करभरणा वाढला आहे.’
- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, करसंकलन विभाग

‘महिला आर्थिक विकास महामंडळामुळे सिद्धी प्रकल्पाची माहिती मला मिळाली. मी सलग दोन वर्षे बिले वाटपाचे काम करत आहे. आता एका बिलामागे आम्हाला २० रुपये मिळत असून करसंकलन विभागाने पुरेपूर मोबदला देत आहे. मुलांचे प्रवेश, शाळेच्या फी यासाठी आम्हाला या प्रकल्पाचा हातभारच लागत आहे.’
- लालूबाई एकशिंगे, काळेवाडी

‘बिल पावत्या वाटपाचे प्रशिक्षण आम्हाला दिले गेले. यामध्ये करसंकलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः आम्हाला मार्गदर्शन केले. बैठी घरे शोधण्यास सुरुवातीला थोडा त्रास झाला.मात्र या कामाचा आम्हाला उत्तम मोबदला दिला.’
- मनिषा ढेपे, नखाते वस्ती, रहाटणी

‘मी घरगुती शिवणकाम करत होते. महापालिकेच्या वतीने या कामासाठी आमच्या बचतगटातील महिलांना विचारण्यात आले. यावर्षी पहिल्यांदाच हे काम मी घेतले आहे. केवळ दोन महिन्यांच्या या कामातून चांगला मोबदला मिळत आहे. मी ज्या परिसरात राहते त्याच भागात हे काम असल्याने बिल वाटप सोपे झालेले आहे.’
- सीमा करडे, रुपीनगर

समाज विकास विभागाकडे ज्या नोंदणीकृत महिला बचत गटांना या प्रकल्पामुळे रोजगार मिळाला आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक सक्षमीकरण झालेले आहे.
- तानाजी नराळे, सहायक आयुक्त, समाज विकास विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com