परप्रांतीय विद्यार्थ्यांकडून पब संस्कृतीला चालना

परप्रांतीय विद्यार्थ्यांकडून पब संस्कृतीला चालना

पिंपरी, ता. २२ : पिंपरी-चिंचवड शहर हे आयटी हब म्हणून दोन दशकांपूर्वी उदयास आले. तर गेल्या काही वर्षांत या शहरातील खासगी महाविद्यालयांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. विविध अभ्यासक्रम असणारी महाविद्यालये व चांगली नोकरी देणाऱ्या बहुराष्‍ट्रीय कंपन्या यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच बाहेर राज्यातून मोठा विद्यार्थीवर्ग शहरात येतो व नोकरीनिमित्ताने येथेच स्थायिक होतो. मात्र, या विद्यार्थ्यांवर पालकांचा कोणताही अंकुश नसल्याने रात्रीबेरात्री त्यांचा धुडगूस सुरू असल्याचे नागरिक सांगतात.
कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने दारू पिऊन गाडी चालविल्याने झालेल्या अपघाताचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत. यामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकही त्यांच्या भागात रात्री होत असलेल्या गैरप्रकारांबाबत व्यक्त होत आहेत. पिंपरी, आकुर्डी, रावेत, वाकड, ताथवडे या भागात बहुतांश खासगी शिक्षण संस्थांची शैक्षणिक संकुले आहेत. येथे शिकविले जाणारे विविध अभ्यासक्रम, उत्तम दर्जाचे शिक्षण यामुळे पुण्यानंतर पालक व विद्यार्थ्यांचा कल शिक्षणासाठी पिंपरी-चिंचवडकडे वळत आहे. महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी महाविद्यालयाच्या जवळच असणाऱ्या रावेत, वाकड, पुनावळे, ताथवडे, किवळे, चिंचवड, प्राधिकरण या भागात खासगी होस्टेल, पीजी किंवा फ्लॅट घेऊन राहतात. खासगी होस्टेलवर कोणतेही निर्बंध नसल्याने रात्री बेरात्री पार्टी करणे, पार्टीनंतर गोंगाट करणे, रस्त्यावर जोरजोरात दुचाकी व चारचाकी चालविणे, रेसींगचा आवाज जोरात करणे, जोरात गाणी लावत गाडी चालविणे, बुलेटच्या फटाक्यांचा आवाज काढणे हे प्रकार या भागात सर्रास सुरू असतात. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिक हैराण झाले आहेत.

नशेची साधने उपलब्ध
हिंजवडी आयटी पार्क येथे काम करणारे अनेक कर्मचारी रावेत, पुनावळे, ताथवडे भागातील सदनिका फ्लॅट घेऊन राहतात. या ठिकाणी विकेंडला उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या, मोठ्याने लावलेले संगीत, बाहेरून पार्टी करून येताना होणारी हुल्लडबाजी याचा त्रास इतर सदनिकाधारकांना सहन करावा लागतो. त्यामुळे बॅचलर मुलामुलींना सदनिका भाड्याने देण्यासही अनेकदा विरोध होतो. सुरुवातीला वाकड, हिंजवडी परिसरात असणारी पब संस्कृती आता या भागातही येऊ पाहत आहे. रावेत, ताथवडे या भागातील हायवे नजीकही रेस्टॉरंटमध्ये पब सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना नशेची साधने जवळच उपलब्ध होत आहेत.

रात्री हुल्लडबाजी
पिंपरीतील एका चौकाजवळील तीन पान टपऱ्यांमध्ये नजीकच्या कॉलेजमधील उच्चभ्रू तरुण व तरुणी मोठ्या प्रमाणात हुक्क्याचे व महागडे सिगारेट पॅकेट खरेदीला येत असतात. विशेषतः: तरुणींचे प्रमाणही हुक्का व महागडे सिगारेट व अन्य साहित्य खरेदीत लक्षणीय आहे. संत तुकारामनगर भागातील सदनिकांमध्ये राहणारे मुलेही मोठ्या प्रमाणात रात्री हुल्लडबाजी करताना दिसतात. सहा महिन्यांपूर्वी ‘सकाळ’ने कॉलेज परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्यांची बातमी दिल्यानंतर पोलिसांनी कडक कारवाई केली होती.

‘बाहेरून शिकण्यासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये स्वैराचाराचे प्रमाण वाढले आहे. आपल्या मित्रांचे अनुकरण करण्यासाठी इतर विद्यार्थीही व्यसनांच्या आहारी जातात. त्यामुळे आपल्या पाल्याला स्वैराचार व स्वातंत्र्य यातील फरक लक्षात आणून देणे ही पालकांची जबाबदारी आहे. एखादी गोष्ट रात्री किती वाजेपर्यंत उपलब्ध होऊ शकते, यावर निर्बंध हवेत. रेस्टॉरंट पब यांच्या वेळेवर नियंत्रण हवे. कायद्याचे पालन गांभिर्याने होण्यासाठी त्याबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.’
- ॲड ज्योती पांडे, महिला दक्षता समिती, रावेत

‘दिवस असो वा रात्र या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून कधीही वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. महाविद्यालय परिसरात ट्रिपल सीट गाडी चालविणे, रॅश ड्रायव्हिंग करणे, पदपथावरून गाड्या चालविणे हे नित्याचेच झालेले आहे. महाविद्यालयांच्या बाहेर
विद्यार्थी काय करतात यावर महाविद्यालय प्रशासनाचे नियंत्रण नसते.
रात्री रस्ते मोकळे असल्याने जोरजोरात गाड्या चालवल्या जातात.’
- महेश सरकाळे, नागरिक, रावेत

‘कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून आमच्याकडून रात्री गस्त सुरू असते. विभागाचे वीस ते बावीस कर्मचारी विविध भागात गस्त करत असतात. त्यामुळे परवानगीपेक्षा अधिक काळ रेस्टॉरंट सुरू ठेवले जाणार नाहीत याकडे आम्ही लक्ष देत आहोत.’
- महेंद्र कदम, पोलिस निरीक्षक, रावेत पोलिस स्टेशन

वाहतुकीचे नियम मोडल्यास होणाऱ्या शिक्षा
- लायसन्सशिवाय गाडी चालविल्यास तीन महिने तुरुंगवास
- चालक अल्पवयीन असल्यास तीन महिन्यांचा तुरुंगवास
- मद्यपान करून वाहन चालविल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास
- ओव्हरस्पिडींग असल्यास एक महिन्याचा तुरुंगवास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com