सांडपाण्यामुळे वाहनचालक हैराण

सांडपाण्यामुळे वाहनचालक हैराण

पिंपरी, ता. २३ ः कात्रज-देहूरोज बाह्यवळण मार्गावरील ताथवडे व पुनावळे भुयारी मार्गांमधील तुंबणारे सांडपाणी वाहिनी ही कायमस्वरूपी समस्या आहे. त्यामुळे आधीच अरुंद असणाऱ्या भुयारी मार्गांमधून गाडी चालविताना वाहनचालकांना नाकी नऊ येत आहेत. पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने या भुयारी मार्गांत दोन ते तीन फुटापर्यंत पाणी साठत असल्याने पावसाळ्यापूर्वीच या भुयारी मार्गांतील सांडपाण्याची सफाई करावी, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.

पावसाळ्यात गाडी चालविणे धोकादायक
या भुयारी मार्गातच सांडपाणी तुंबल्याने अनेकदा वाहनचालकांना त्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागतो. अशाच पावसाळ्यात येथून वाहन चालविणे धोकादायक झालेले आहे. पावसामुळे भुयारी मार्गांत साठणारे पाणी व त्यामुळे झालेले खड्डे व होणारी वाहतूक कोंडी हे पुनावळे व ताथवडे येथील भुयारी मार्गातील पावसाळ्यात दिसणारे चित्र आहे. गेल्या आठवड्यातही अवघ्या अर्धा तास झालेल्या पावसामुळे हे भुयारी मार्ग जलमय झाले होते. तर ऐन पावसाळ्यात येथे काय गैरसोय होईल? याबाबत येथील नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.

पाण्याचा निचरा होणे आवश्‍यक
हे दोन्ही भुयारी मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीत येतात. येथील सांडपाणी भुयारी मार्गात येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेली आहेत. मात्र, त्याची योग्य देखभाल होत नसल्याने पाणी तुंबण्याचा प्रकार वारंवार घडत होता. प्राधिकरणाद्वारे नुकतेच ताथवडे येथील भुयारी गटारांची स्वच्छता केली. मात्र, भुयारी मार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्यावरील पावसाचे पाणीही या सांडपाण्यात वाहून येते. त्यामुळे या रस्त्यांवरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

महापालिका व एनएचएआयची भूमिका
भुयारी मार्गांमधील सांडपाण्यामध्ये आजुबाजूच्या परिसरातील सांडपाणी सोडण्यात आल्याने येथे वारंवार पाणी तुंबत असल्याची भूमिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली आहे. या बाबत महापालिकेला पत्रव्यवहार केला असून, आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत असल्याचे पुणे सातारा महामार्गाचे प्रकल्प व्यवस्थापक अमित भाटिया यांनी सांगितले. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी याबाबत कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

‘‘या दोन्ही भुयारी मार्गात तुंबणारे सांडपाणी ही वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनली आहे. ताथवडे भुयारी मार्गातील तुंबलेल्या भुयारी गटारांचे काम झाले असले तरी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अजून वेगळी व्यवस्था होणे आवश्‍यक आहे. पुनावळे येथील काम अद्याप बाकी आहे. या मार्गावर पडलेले खड्डेही बुजविण्यात आलेले नाहीत. ज्यामुळे पावसाळ्यात अपघाताचा धोका निर्माण होतो.’
- अपूर्व शर्मा, रहिवासी, ताथवडे

‘ताथवडे येथील भुयारी मार्गातील येणाऱ्या सांडपाण्याचे काम आम्ही केलेले आहे. पुनावळे येथील भुयारी मार्गाचे काम देखील सुरू करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी दोन्ही सांडपाण्याचे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. मात्र, या ते सांडपाणी वाहिनीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याने ही समस्या उद्‍भवत आहे.’
अमित भाटिया, प्रकल्प व्यवस्थापक, पुणे सातारा महामार्ग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com