नालेसफाई ‘कासवगतीने’

नालेसफाई ‘कासवगतीने’

पिंपरी, ता. २३ ः पावसाच्या पाण्याचा निचरा प्रभावीपणे होण्यासाठी नाल्यांची साफसफाई करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नऊ मे रोजी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे. त्याला पंधरा दिवस उलटून गेले आहेत. शिवाय, पावसाळा अवघ्या पंधरा दिवसांवर आला असून, शहरातील १४४ नाल्यांच्या साफसफाईचे काम प्रगतिपथावर असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने गुरुवारी (ता. २३) केलेल्या पाहणीत बहुतांश ठिकाणी नालेसफाई झालेली नसल्याचे दिसून आले.
शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्या वाहतात. त्यांना लहान-मोठे मिळून १४४ नाले मिळतात. नद्यांना पूर आल्यास नाल्यांमध्ये फुगवटा होऊन किंवा नाल्यांमधील राडारोडा, कचरा, झाडेझुडपे यामुळे पाणी तुंबून नजिकच्या घरांमध्ये शिरत असते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. अनेकदा नाले व नदी काठच्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करावे लागते. हे टाळण्यासाठी नाल्यांमधून पावसाच्या पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांची पावसाळ्यापूर्वी दरवर्षी महापालिका साफसफाई करत असते. त्यासंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांनी, ‘पावसाच्या पाण्याचा निचरा प्रभावीपणे होण्यासाठी शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या नाल्यांची साफसफाई करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना नऊ मे रोजी दिला आहे. तसेच पूरपरिस्थिती सहजतेने हाताळण्यासाठी सर्व विभागांनी अंतर्गत समन्वय ठेवावा, असेही आदेशात म्हटले आहे.

आयुक्तांचे म्हणणे...
पावसामुळे उद्‍भवणाऱ्या प्रश्नांचे पूर्व नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. आरोग्य विभागामार्फत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत येणाऱ्या १४४ नाल्यांची साफसफाई करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. पावसाळ्याच्या अनुषंगाने महापालिका हद्दीत पूरपरिस्थिती उद्‍भवू नये, तसेच सखल भागात पाणी साचू नये, यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ज्या नाल्यांमध्ये साफसफाई करताना अडचणी येत आहेत, त्या नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. दररोज होणाऱ्या नाले साफसफाईच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. नालेसफाईच्या कामामध्ये दिरंगाई आढळल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.

यंत्रांद्वारे नालेसफाई
पावसाळ्यात नालेसफाईसंदर्भात कामे करण्यास अडथळा निर्माण होतो, त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईचे काम महापालिकेच्या वतीने पूर्ण करण्यात येणार आहेत. नालेसफाई करताना आवश्यक ठिकाणी जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनने नालेसफाई करण्यात येत आहे, तसेच अरुंद नाल्यांच्या ठिकाणी सुरक्षा साधने वापरूनच नालेसफाई केली जात आहे. शहरातील विविध भागात बुजविलेले नाले, नाल्यावर किंवा नाल्यामध्ये केलेले अतिक्रमण तसेच नाल्याची रुंदी कमी केलेली आढळून आल्यास संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे.

‘सकाळ’च्या पाहणीत आढळले...
एक ः लालटोपीनगर, मोरवाडी
टाटा मोटर्स व महापालिका आयटीआयकडून येणाऱ्या नाल्यात प्लॅस्टिक कचरा, बॅगा, राडारोडा, विटा, दगड आढळले. गवत व झाडेझुडपे वाढलेली आहेत. लालरंगाचे रसायनयुक्त पाणी नाल्यातून वाहत होते. त्याची दुर्गंधीही येत होती. नाल्याच्या दोन्ही बाजूला घरे आहेत.
(21554)

दोन ः एमआयडीसी, पिंपरी
ऑटो क्लस्टरच्या मागील बाजूच्या नाल्याची संरक्षक भिंत ढासळली आहे. नाल्यात राडारोडा असून, गाळ साचला आहे. झुडपे व गवत वाढलेले आहे. कडेला झाडांच्या सुकलेल्या फांद्या व एक खोड पडलेले आहे. पावसाच्या पाण्याला अडथळा होऊ शकतो.
(21557)

तीन ः एम-टेक कंपनीजवळ, मोरवाडी
दोन नाल्यांचा संगम आहे. त्यांचे कॉक्रिटीकरण केले असून, सांडपाणी वाहिन्यांचे चेंबर्सही आहेत. झुडपे व गवत वाढलेले आहे. राडारोडा आहे. दोन्ही नाल्यांच्या मधील भागात जेसीबीच्या साह्याने सपाटीकरणाचे काम सुरू होते. येथे कॉंक्रिटीकरण करणार असल्याने कामगारांनी सांगितले.
(21558)

क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रनिहाय नाले
कार्यालय / नाले
अ / २५
ब / १५
क / २९
ड / १२
इ / १६
फ / १८
ग / ९
ह / २०
एकूण / १४४
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com