आरटीई प्रवेशात नवीन पेच; नोंदणीकृत भाडेकरार हवा

आरटीई प्रवेशात नवीन पेच; नोंदणीकृत भाडेकरार हवा

पिंपरी, ता.१ ः आरटीईद्वारे पाल्याला प्रवेश मिळवून देण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदणीकृत भाडेकराराची अट ठेवण्यात आल्याने पालकांसमोर नवीन पेच उभा राहिला आहे. मात्र, तसा करार करण्यास घरमालक तयार होत नाहीत. एखाद्या वेळी त्यांनी तशी तयारी दर्शविल्यास भाडेकराराच्या नोंदणीसाठी पालकांना ३ ते साडेतीन हजार रुपयांची आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) २००९ नुसार २०२४-२५ वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे, पालकांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रावर गर्दी केल्याचे चित्र आहे. पण, असंख्य पालक मुलांच्या शिक्षणासाठी भाड्याने घर घेऊन राहत आहेत. आरटीई अंतर्गत ऑनलाइन नोंदणी करताना दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरार पालकांकडे असणे आवश्यक आहे. त्याचा कालावधी ११ महिने अथवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा करण्यात आला आहे. मात्र, अनेक पालकांकडे दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरार नाही. प्रवेशासाठी पत्त्याच्या पुरावा म्हणून भाडेकरारपत्र महत्त्वाचे आहे. पण, हा करार करून देण्यास घरमालक तयार नाहीत. त्यामुळे, अनेक पालकांची मोठी अडचण झाली आहे.

किती शाळांची निवड करायची ?
निवासाचा पत्ता, जन्मतारखेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, फोटो आयडी, वैध दिव्यांग प्रमाणपत्र यासंदर्भात प्रशासन अधिकाऱ्यांकडून पालकांना कळवण्यात आले आहे. याशिवाय पालकांना एकच अर्ज करावा लागणार असल्याने निवासस्थानापासून १ ते ३ किलोमीटर अंतरातील किती शाळा निवडण्याची परवानगी आहे. यासंदर्भात पालक संभ्रमात आहेत.

आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- आवश्यक कागदपत्रांबाबत शिक्षण संचालनालयाकडून सुधारणा.
- निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द.
- निवासी पुराव्या करिता बँक पासबुक हे राष्ट्रीयकृत बँकेचे असावे.
- स्थानिक बँकेचे अथवा पतसंस्थेचे पासबुक गृहित धरले जाणार नाही.

आणखी कोणती कागदपत्रे हवीत ?
प्रवेश प्रक्रियेसाठीच्या कागदपत्रांमध्ये शिधापत्रिका (रेशनिंग कार्ड), वाहन चालविण्याचा परवाना, वीजदेयक, टेलिफोन देयक, मिळकतकर देयक, घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आदी यापैकी कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून अपूर्ण असतील तरच भाडेकरार हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

‘‘शालेय प्रवेशासाठी भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदणीकृत हवा असल्याने पालकांकडून त्यासाठी मागणी होत आहे. सुमारे साडेतीन हजार रुपये खर्च येत आहे. हा भाडेकरार १ ते ५ दिवसांत लगेचच दिला जात आहे.’’
- शंकर कुलकर्णी, चालक, महा ई सेवा केंद्र, मासुळकर कॉलनी, पिंपरी


पालक म्हणतात...
‘‘माझ्‍या मुलाला नर्सरीसाठी प्रवेश घ्यायचा आहे. मी भाड्याने राहत आहे. पण, काही कागदपत्रांचा अभाव आहे. घरमालक दुय्यम निबंधक कार्यालयाकडील नोंदणीकृत भाडेकरार करण्यास तयार नाही. खर्च खूप आहे. प्रवेशासाठी अडचण येत आहे.’’
- विशाल जाधव, पालक, पिंपळे गुरव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com