गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

तरुणाला कोयत्याने मारहाण, एकजण अटक
काळेवाडी : वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने तरुणाला कोयत्याने व लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना काळेवाडीतील विजयनगर येथे घडली. याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यापैकी एकाला अटक केली आहे.
याप्रकरणी सोनू विनोद राम (वय, २०, रा. भारतमाता चौक, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी संकेत नानासाहेब चौधरी (वय २३, रा. साई कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) याला अटक केली असून बाळ्‍या जकाते (रा. भारतमाता चौक, विजयनगर, काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

वेबसिरीजच्या नावाखाली महिलेची फसवणूक
पिंपरी : वेबसिरीज तयार करण्याचे खोटे कारण सांगून व पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखवून एका महिलेची साठ हजार रुपयांची फसवणूक केली.
पिंपळे सौदागर येथील ५९ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, समीर उर्फ दीपक भटनागर (रा. वर्सोवा, अंधेरी वेस्ट, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीने त्यांच्या बँकेच्या खात्यातून आरोपीच्या नावाने असलेल्या बंधन बँकेच्या खात्यात साठ हजार रुपये पाठविले होते.

भरधाव मोटारीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
हिंजवडी : रस्ता ओलांडत असताना भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत मो. एहेतसाम अन्सारी फखरुद्दीन अन्सारी (वय २७) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-बंगळुरू महामार्गावरील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलासमोरील बस थांब्याजवळ घडली.
याप्रकरणी मोहमद एहसान अन्सारी फखरल हसन (रा. मंगळवार पेठ, जुना बाजार,पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तुकाराम विठ्ठल वाशिवले (वय २७, रा. मु. वाशिवली, ता. वाई, जि. सातारा) या चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी, फिर्यादीचा भाऊ हे नेहमीप्रमाणे त्यांचे केटरिंगचे काम संपवून घरी जाण्यासाठी निघाले असता हा अपघात घडला.

तीनशे टक्के नफ्याचे आमिष, महिलेला गंडा
पिंपरी : स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स खरेदी विक्री करून तीनशे टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरीगाव येथे घडला.
याप्रकरणी पिंपरीगावातील वाघेरे कॉलनीतील ३६ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी वेगवेगळ्या बँक खाते क्रमांकांवरून फिर्यादीचा विश्वास संपादन करत त्यांची दहा लाख १९ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : मोटारीचे पैसे न देता तसेच कर्ज स्वतःच्या नावावर न करता एकाची फसवणूक केल्याप्रकरणी ओंकार हणमंत शिंदे (रा. हांडेवाडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार थेरगाव येथील भोरडेनगर येथे घडला.
याप्रकरणी महेश थिटे (रा. भोरडेनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीच्या आईच्या नावावर असलेली मोटार ही दोन लाख रुपयांत विकत घेतो व मोटारीवर असलेले कर्ज स्वतःच्या नावावर करून घेतो, असे आमिष फिर्यादीला दाखवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com