गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

कासारवाडीत तरुणावर प्राणघातक हल्ला
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून सायबू सुखदेव कोळी (वय २५, रा. हिराबाई झोपडपट्टी, कासारवाडी) या तरुणावर चाकूने वार करत प्राणघातक हल्ला झाल्याची घटना कासारवाडी येथे घडली.
या प्रकरणी तुषार संतोष धेंडे (रा. कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. आदिल शेख (वय २७, रा. कासारवाडी) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र सायबू कोळी हे दुचाकीवरून घरी जात होते. दरम्यान, आरोपीने रिक्षा चालविण्यावरून यापूर्वी झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून सायबू याला दमदाटी व मारहाण केली. तसेच चाकूने डोक्यात व चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमी केले.

तरुणाच्या पोटात चाकू खुपसला
पिंपरी : भांडणात तरुणाच्या पोटात तीन वेळा चाकू खुपसून तरुणाला गंभीर जखमी केल्याची घटना माण येथे घडली. या प्रकरणी आप्पासाहेब भाऊ वायदंडे (रा. माण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अजय सिद्राम गायकवाड (वय २७, रा. माण) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी व आरोपी यांच्यात बाचाबाची होऊन भांडण झाले. यामध्ये आरोपीने भाजी कापण्याचा चाकू फिर्यादीच्या पोटात तीन वेळा खुपसून त्यांना गंभीर जखमी केले.

फसवणूकप्रकरणी चौघांवर गुन्हा
पिंपरी : जमिनीचे संपूर्ण पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दुय्यम निबंधक कार्यालय, मुळशी क्रमांक २ येथे घडला.
या प्रकरणी प्रथमेश अंकुश रानवडे (रा. वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऋतिक राजेंद्र धनकुडे, राजेंद्र ज्ञानोबा धनकुडे, रोहिणी राजेंद्र धनकुडे, साक्षी राजेंद्र धनकुडे (सर्व रा. बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांचे मनोरुग्ण वडील व आजी यांच्या नावे असलेली संपूर्ण जमीन कमी पैशात संपूर्ण पैसे न देता संगनमताने नियोजनबद्ध कट रचून बळकाविली.

जमिनीवरील नोंदीप्रकरणी २५ लाखांची फसवणूक
पिंपरी : जमिनीवरील नोंद कमी करण्यासाठी पैसे घेऊन एकाची २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार चिंचवडगाव येथे घडला.
या प्रकरणी उमेश पांडुरंग तांबे (वय ३७, रा. रामनगर, रहाटणी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सतीश वसंत आगळे व सविता वसंत आगळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे सासरे सतीश निंबाळकर यांची सर्वे १५८ गाव चिंचवड येथील राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार यांच्या संपादनातून जमिनीवरील नोंद कमी करण्यासाठी आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. यासाठी वेळोवेळी एकूण २५ लाख रुपये घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com