ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात वाजणार तिसरी घंटा

ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात वाजणार तिसरी घंटा

पिंपरी, ता. ३ ः गेल्या वर्षी मेमध्ये उद्‍घाटन झालेल्या ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आता वर्ष उलटल्यानंतर नाटकाची तिसरी घंटा वाजणार आहे. या नाट्यगृहात व्यावसायिक नाटक व्हावे; यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्यावतीने पुढाकार घेण्यात आला आहे. १२ जून रोजी पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याच ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकाचा प्रयोग या नाट्यगृहात होणार आहे. या प्रयोगानंतरच या नाट्यगृहातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी काय करता येईल ? याबाबत स्पष्टता येईल, असे मत नाट्य परिषदेने व्यक्त केले आहे.
उद्योगनगरीमध्ये नाट्यसंस्कृती रुजावी आणि तिची वाढावी या हेतूने निगडी प्राधिकरण येथे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून ग.दि. माडगूळकर नाट्यगृह बांधण्यात आले. मात्र, हे नाट्यगृह बांधताना नाटकाच्या प्रयोगासाठी आवश्‍यक तांत्रिक बाबींचा विचार करण्यात न आल्याने येथे नाटक करण्यास अडथळे येऊ लागले. नाट्यगृहातील रंगमंचाची अर्धचंद्राकार रचना, तशीच बैठक व्यवस्था, रंगमचांची जास्त रुंदी अशा अनेक त्रुटींमुळे या नाट्यगृहाकडे पहिल्याच वर्षात व्यावसायिक नाट्य निर्मात्यांनी पाठ फिरविली. एकीकडे या ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम, स्नेहसंमेलन, राजकीय मेळावे अशा कार्यक्रमांचे बुकिंग फुल्ल होत असताना दुसरीकडे नाटकांचे प्रयोग होत नसल्याने या भागातील रसिकांची निराशा होत होती.

काय आहेत त्रुटी व उपाय...
नाटकाचे प्रयोग करण्यासाठी रंगमंचाची रचना ही सरळ रेषेत असणे गरजेचे असते. मात्र, अर्धगोलाकार रचनेमुळे नाट्यगृहात कडेला बसलेल्या प्रेक्षकांना रंगमंच नीट दिसत नाही. तसेच रंगमंचाची लांबी जास्त असल्याने नेपथ्य लावण्यास समस्या येतात. अशा अगदी गंभीर त्रुटी हे नाट्यगृह बांधताना झाल्या आहेत. मात्र, रंगमंचाच्या बाजूच्या दोन रांगांची तिकिटे न विकता केवळ मधल्या रांगांची तिकीट विक्री करून येथे प्रयोग होऊ शकतो, असे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी ‘सकाळ’ने घेतलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. रंगमंचाच्या रचनेतही सुधारणा होऊ शकते असेही त्यांनी यावेळी सुचविले होते. मात्र, महापालिकेने अद्याप याबाबत कोणतेही पाऊल उचलेले नाही. त्यामुळे, या प्रयोगानंतर महापालिका काय पाऊल उचलणार ? याकडे नाट्यक्षेत्राचे लक्ष असणार आहे.

प्रयोगातून दुरुस्तीकडे
हे नाट्यगृह बांधताना चूक झाली आहे. मात्र, येथे प्रयोग झाल्याशिवाय येथील अडचणी लक्षात येणार नाहीत. अशी भूमिका नाट्य परिषदेने घेतली आहे. त्यामुळे, दामले यांनी सुचविल्याप्रमाणेच या प्रयोगासाठी दोन्ही बाजूच्या रांगा सोडून मधल्या रांगांची तिकीट विक्री केली जाणार आहे. तसेच एक विंग वाढवून नेपथ्य लावले जाणार आहे. प्रयोगादरम्यान येणाऱ्या अडचणी काय आहेत ? याबाबत स्पष्टता येण्यासाठी या प्रयोगासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलविण्यात येणार असल्याचे नाट्य परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

निगडी प्राधिकरण परिसरात अनेक नाट्य रसिक आहेत. मात्र, या नाट्यगृहातील रंगमंचाच्या चुकलेल्या रचनेमुळे येथे नाटक करण्याचे धाडस नाट्यनिर्माते करत नाहीत. पण, या नाट्यगृहाचा वापर व्हावा यासाठी कुठेतरी सुरवात होणे गरजेचे आहे. नाटकांचे प्रयोग झाल्यास त्यातील अडचणी अधिक ठळकपणे मांडता येतील.
- भाऊसाहेब भोईर, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा

अर्धचंद्राकार रचनेमुळे बॉक्स सेट बसविण्यास अडचणी येतात. तसेच कडेच्या प्रेक्षकांना नाटक दिसणार नाही. त्यामुळे, आम्ही नेपथ्याची रचना थोडी पुढे घेऊन एक विंग वाढविणार आहोत.
- राजू बंग, कोषाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा

असे होणार बदल

एकूण आसनक्षमता प्रयोगासाठी ठेवण्यात आलेली आसने

तळमजला ः ५४८ ३४०
बाल्कनी ः ३४० १००

एकूण ८८८ ४२४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com