वाघेरे यांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट

वाघेरे यांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट

पिंपरी, ता. ४ : निवडणुकीचा कल समजल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या कार्यालयाबाहेर मंगळवारी (ता. ४) सकाळपासूनच शुकशुकाट होता. सुरुवातीच्या फेरीपासून श्रीरंग बारणे आघाडीवर असल्यामुळे वाघेरे यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. अनुचित घटना टाळण्यासाठी वाघेरे यांच्या पिंपरी गावातील कार्यालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता.
मावळ लोकसभेची निवडणूक यंदा दोन्ही शिवसेनेमध्ये रंगली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून खासदार श्रीरंग बारणे उमेदवार होते. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आलेले संजोग वाघेरे हे उमेदवार होते. राज्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने भावनिक लाट होती. त्याचा फायदा निवडणुकीत होईल, असा अंदाज संजोग वाघेरे यांच्‍या समर्थकांमध्ये होता. तसेच बारणे यांच्यावर मतदारसंघातील लोकांची नाराजी असल्याची चर्चा रंगवली जात होती. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी तसेच भाजप हे खासदार बारणे यांना मदत करणार नाही, असा अंदाज वाघेरे यांचे कार्यकर्ते बांधत होते. त्यामुळे वाघेरे यांचा विजय होईल, या आनंदात समर्थक कार्यकर्ते होते. मात्र, निकालाचा कल हातात येताच सर्व अंदाज चुकीचे ठरल्याचे पाहायला मिळाले.
प्रत्येक फेरीत बॅकफूटवर असल्याने वाघेरे यांच्या पिंपरी गावातील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसले. या ठिकाणी कार्यकर्त्यांना बसण्यासाठी मंडप घालण्यात आला होता. खुर्च्यांची देखील व्यवस्था होती. मात्र, तुरळक कार्यकर्तेच या ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसले. कार्यालयासह परिसरात शुकशुकाट दिसत होता. वाघेरे यांच्या कार्यालयाबाहेर अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त होता. तसेच संपूर्ण निकाल हातात आल्‍यानंतर दुपारी तीननंतर काही समर्थक वाघेरे यांच्‍या कार्यालयाबाहेर जमले होते. मात्र, त्‍यांच्या चेहऱ्यावर नाराजीचा सूर उमटत होता. याबरोबरच पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सुरू केलेले संजोग वाघेरे यांचे कार्यालय बंद होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com