युतीधर्म निभावल्याने बारणेंना मताधिक्य

युतीधर्म निभावल्याने बारणेंना मताधिक्य

होमपिचवरच वाघेरे बॅकफूटवर!

प्रदीप लोखंडे
लो कसभेच्‍या मैदानात पिंपरी विधानसभेतील मतदार कोणाच्‍या बाजूने आपला कौल देतील, याबाबत शंका उपस्‍थित केल्‍या जात होत्‍या. महायुतीचा धर्म न पाळल्‍यास या मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांना फटका बसेल. संजोग वाघेरे पिंपरीचे स्‍थानिक असल्‍याने त्‍यांना त्‍याचा फायदा होईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे समर्थक मशालीकडे झुकतील? यासह अनेक अंदाज राजकीय जाणकार व्‍यक्‍त करीत होते. मात्र, सर्वांचे अंदाज निकालानंतर चुकीचे ठरले. महायुतीमधील मित्र पक्ष असणाऱ्या भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या राष्ट्रवादीने युतीचा धर्म निभावला. बारणे यांच्‍या पारड्यात भरघोस मते दिली. पिंपरीने विजयात सिंहाचा वाटा उचलला. खासदार बारणे यांना या मतदारसंघातून १६ हजार ७३१ मतांचे मताधिक्‍य मिळाले आहे.
लोकसभा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांच्‍या नावाला विरोध करण्यात पिंपरी विधानसभा पुढे होती. महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांनी मोठा विरोध केला होता. मात्र, अजित पवार यांनी महायुतीचा धर्म पाळावा, यासाठी सज्‍जड दम दिल्‍यानंतर त्‍यांचा आदेश शिरस्‍थ मानून राष्ट्रवादी कामाला लागली. याबरोबरच आगामी विधानसभेसाठी स्‍थानिक राजकीय गणिते जुळवून आणण्यासाठी आमदार बनसोडे यांनी देखील महायुतीच्‍या उमेदवाराला मदत केली. संजोग वाघेरे यांना मदत केली असती तर आगामी निवडणुकीत त्‍यांनी ॲड. गौतम चाबुकस्‍वार यांचाच प्रचार केला असता. त्‍यामुळे खासदार बारणे यांची नाराजी आणि वाघेरे यांची मदत न मिळणे असा दुहेरी फटका आमदार बनसोडे यांना बसला असता.
दुसरीकडे या मतदारसंघात मोठा मतदार भाजप आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्‍या रिपब्लिकन पक्षाचा आहे. यांनीदेखील खासदार बारणे यांच्‍या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपमधूनदेखील बारणे यांच्‍या नावाला विरोध असला तरी तो नाममात्र होता. आम्‍हाला ग्रहीत धरावे एवढीच मागणी पदाधिकाऱ्यांची होती. त्‍यांच्‍या भावना लक्षात घेऊन बारणे यांनी सर्वांशीच चर्चा करण्याची भूमिका ठेवली, त्‍याचा त्‍यांना फायदा झाला. छोट्या पक्षांसोबत देखील बारणे यांनी संवाद साधला. आकुर्डी येथील हॉटेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्‍या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मदतीचे आवाहन केले. प्राधिकरणातील संघ परिवारातील बाळा शिंदे यांनी मनोमिलनातून ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिकांच्या कार्यक्रमातून तसेच डिनर डिप्लोमसी संयमी नियोजन केले, अशा सर्वांशी बारणे यांनी साधलेला संवाद, सोशल मीडियात घेतलेली प्रचाराची आघाडी, मागील निवडणुकांचा अनुभव पाहता बारणे यांनी पिंपरी विधानसभेत १६ हजार ७३१ मतांची आघाडी घेतली.
पार्थ पवार यांच्‍या पराभवाचा राग या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक काढतील, असा अंदाज संजोग वाघेरे यांच्‍या समर्थकांनी बांधला होता. त्‍यांच्‍या स्‍थानिक नगरसेवकांवर विश्‍वास ठेवण्यात आला. परिणामी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील सहकारी नाराज झाले होते. यासह उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थकांचीही मदत झाली नाही. त्‍यामुळे वाघेरे यांच्‍या पराभवाला हे एक निमित्त झाले.

...अखेर मशाल पेटलीच नाही
श्रीरंग बारणे यांच्याविरोधात लाट होती. मात्र, त्‍या लाटेचा फायदा करून त्‍याचे मतदानात परिवर्तन करण्यात संजोग वाघेरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अपयशी ठरला. पिंपरी गावात स्‍थानिकचे रहिवासी असूनही या भागातील लोकांना आपल्‍या बाजूने वळविण्यात वाघेरे कमी पडले. ही एक बाजू असली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्‍या पदाधिकाऱ्यांचा देखील मतदारसंघातील प्रभाव उमटला नाही. प्रामाणिक काम केले असले तरी उद्धव ठाकरे यांच्‍या भावनिक लाटेचा फायदा घेता आला नाही. जनमानसाच्‍या मनाची पकड घेण्यात त्‍यांच्‍या शिवसेनेच्‍या पदाधिकाऱ्यांना अपयश आले, ही वस्तुस्थिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com