भोसरीतून शिवाजीराव आढळरावांना मताधिक्य, पण...

भोसरीतून शिवाजीराव आढळरावांना मताधिक्य, पण...

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ५ ः शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघाने २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे महायुतीला साथ दिली. मात्र, तब्बल २६ हजार ५०५ इतके मताधिक्य घटले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदलाचा फटका महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना बसला की, प्रमुख घटक असलेल्या भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘हातचा राखून काम केले’ अशी चर्चा आता सुरू झाली आहे. शिवाय, मराठा विरुद्ध माळी, राष्ट्रवादी व शिवसेनेतील फुटीचा फटकाही काही अंशी आढळराव यांना बसल्याचे दिसते.
भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीतील जागा वाटपात शिरूर मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला गेला. मतदार संघाच्या निर्मितीनंतर झालेल्या २००९ व २०१४ च्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाने मात्र, आढळराव यांना साथ देत ३६ हजार ७७ इतके मताधिक्य दिले होते. आताच्या निवडणुकीपूर्वीच्या अडीच वर्षात शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली. त्याचे राजकीय पडसाद भोसरी विधानसभा मतदारसंघातही पडले. आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र, त्यांचे समर्थक व भोसरी विधानसभा निवडणूक लढविलेल्या सुलभा उबाळे यांच्यासह सामान्य कार्यकर्ते ठाकरे यांच्यासोबतच राहिल्याचे दिसले. शिवाय, लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी महायुती म्हणून लढली. त्यांच्या जागा वाटपात शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा लागल्याने आढळराव यांनी शिवसेनेऐवजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मते मागितलेल्या भाजपची त्यांना नेहमीप्रमाणे साथ मिळणे अपेक्षित होते. ती मिळाल्याचे तळवडेपासून भोसरी-दिघीपर्यंत झालेल्या मतदानातून दिसते आहे. मात्र, दोघांच्या जातीचा ‘फॅक्टर’ प्रभावी ठरल्याचे दिसते. कारण, चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी, मोशी, चिखली या भागात दोन्ही जातींचे मतदान जवळपास समसमान आहे. तर, भोसरी व दिघीत मराठा वर्ग अधिक आहे. मात्र, संभाजीनगर, पूर्णानगरसह नव्याने विकसित झालेल्या चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, चिखलीतील गृहरचना संस्थांमध्ये राहायला आलेला मतदार संमिश्र राजकीय विचारांचा आहे. त्यामुळे बहुतांश मतदान केंद्रांवर कोल्हे व आढळराव यांच्या मतांमध्ये बोटांवर मोजण्याइतक्या मतांचा फरक आहे. भोसरीत भाजप आमदार महेश लांडगे यांचे प्राबल्य, त्यांचे समर्थक ३४ माजी नगरसेवक आणि भाजपला मानणारा मतदार यामुळे भोसरीसह काही भागात चिन्ह ‘घड्याळ’ असले तरी आढळरावांना तुलनेने अधिक मतदान झालेले दिसते. पण, ‘आता घड्याळासाठी मतं मागायची आणि विधानसभा व महापालिका निवडणुकीत ‘कमळ’ चिन्ह घेऊन मतदारांपर्यंत कसं जायचं’ या विचाराने अनेकांनी ‘हातचा राखून आढळरावांचं काम केले’ अशी चर्चा रंगू लागली आहे. चर्चा काहीही असली तरी आणि शिवसेना व राष्ट्रवादीची सहानुभूती असो वा जातीचा फॅक्टर असो, भोसरी विधानसभा मतदारसंघाने ‘युती धर्म’ निभावला हे नाकारून चालणार नाही.

भोसरी मतदारसंघातील मते
उमेदवार / पक्ष / मते / टक्केवारी
शिवाजीराव आढळराव पाटील / राष्ट्रवादी कॉंग्रेस / १,२७,३९५ / ४७.१७
डॉ. अमोल कोल्हे / राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार / १,१७,८२३ / ४३.६२

दृष्टिक्षेपात भोसरीतील निकाल
- शिरूरमधून विजयी झालेले डॉ. अमोल कोल्हे यांच्यापेक्षा आढळराव पाटील यांना ९,५७२ मते अधिक
- डॉ. अन्वर शेख यांना तिसऱ्या क्रमांकाची आठ हजार ५०९ मते मिळाली
- चौथ्या क्रमांकावरील मंदार वाडेकर यांना पाच हजार चार आणि पाचव्या क्रमांकावरील राहुल ओव्हाळ यांना तीन हजार ५८७ मते
- एकूण ३२ उमेदवारांमध्ये ‘नोटा’ला सहाव्या क्रमांकाची दोन हजार ४७७ मते आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com