घरफोडीचे तब्बल ९० गुन्हे, कुख्यात गुन्हेगाराला बेड्या

घरफोडीचे तब्बल ९० गुन्हे, कुख्यात गुन्हेगाराला बेड्या

पिंपरी, ता. ५ ः घरफोडीचे तब्बल ९० गुन्‍हे दाखल असलेल्‍या कुख्यात गुन्‍हेगार विकी सिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय ३५ रा. रामटेकडी, हडपसर) याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या आहेत. रामटेकडी, हडपसर येथे त्‍याला अटक करण्यात आली. त्‍याच्‍यावर निगडी, बिबवेवाडी, डोंबिवली पोलिस ठाण्यात देखील विविध गुन्‍हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, निगडी प्राधिकरणातील श्री लक्ष्मी ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटून सुमारे ३० तोळे सोन्याचे दागिने, १० किलो चांदी, रोख रक्कम १८ हजार रुपये व तेथील डीव्हीआर चोरल्‍याची तक्रार निगडी पोलिस ठाण्यात २४ ते २५ मे रोजी दाखल झाली. पोलिसांनी घटनास्थळावरील व आजूबाजूच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. या गुन्ह्यातील आरोपींनी एक लाल रंगाचे वाहन वापरल्‍याचे निष्पन्न झाले.

सुमारे २५० सीसीटीव्हींची तपासणी
पिंपरी-चिंचवड, पुणे शहर परिसरातील सरकारी व खासगी असे एकूण २५० ते ३०० सीसीटीव्ही तपासल्‍यानंतर हे वाहन हडपसर भागात गेल्याचे निष्पन्न झाले. आरोपी कल्याणी याच्याकडे ३ ते ४ दिवसांपूर्वी हे वाहन पाहण्यात आल्‍याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. आरोपीवर यापूर्वी दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, खून, खुनाचा प्रयत्न आदींसह गंभीर ९० गुन्हे दाखल असल्याचे तपासात स्‍पष्ट झाले.

घरात घुसून अटक
आरोपी कल्याणी हा नेहमी पत्ते बदलत असे. तो स्वतःजवळ शस्त्र बाळगत असे. त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याचाही प्रकार घडला होता. त्यामुळे, त्याला पकडणे आव्हानात्मक होते. निगडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने सलग तीन दिवस रामटेकडी, हडपसर भागात त्‍याच्‍यावर पाळत ठेवली. ३० मे २०२४ रोजी अतिरिक्त कुमक मागवून रात्री दहा वाजता घरात घुसून आरोपीला बेड्या ठोकल्‍या.

धानोरी येथील सोनारालाही अटक
तीन साथीदारांसह निगडी येथील ज्वेलरीचे दुकान फोडल्याची कबुली आरोपी कल्याणी याने दिली. बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्‍या हद्दीत एक बंद फ्लॅट फोडल्याचा तसेच डोंबिवली पोलिस ठाणे हद्दीतील एका चारचाकी वाहनाची चोरी असे एकूण तीन गुन्हे केल्याचे त्याने मान्य केले. आरोपीने निगडीतील चोरीनंतर वाट्याला आलेले चांदी, सोन्‍याचे दागिने हे धानोरी, लोहगाव येथील अब्दुल्ला ताहीरबक्ष शेख या सोनारास विकल्‍याचे सांगितले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोनारास अटक केली. त्याच्‍याकडून १०० ग्रॅम सोन्याची लगड, ८ किलो ३०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट, गुन्ह्यात वापरलेले वाहन, घरफोडीचे सहित्य व दोन तलवार असा एकूण २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com