नालेसफाईचा दावाच केवळ ‘सफाई’दार
शहरातील स्थिती; पावसाच्या हजेरीमुळे अधिकाऱ्यांची ‘हजेरी’ घेण्याची वेळ

नालेसफाईचा दावाच केवळ ‘सफाई’दार शहरातील स्थिती; पावसाच्या हजेरीमुळे अधिकाऱ्यांची ‘हजेरी’ घेण्याची वेळ

पिंपरी, ता. ६ ः बिगर मोसमी पावसाने तीन दिवसांपासून शहरात हजेरी लावली आहे. मोसमी पाऊस उंबरठ्यावर आला आहे. पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ नये, पाण्याचा निचरा लवकर व्हावा, या साठी महापालिका आयुक्तांनी नालेसफाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. एक जून रोजी त्याबाबतचा आढावा घेऊन स्थळपाहणीही केली. तरीही बहुतांश नालेसफाई अद्याप झालेली नसल्याचे गुरुवारी (ता. ६) आढळून आले. मात्र, शंभर टक्के नालेसफाईचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

शहराच्या मध्यावरून पवना नदी वाहते. उत्तरेस इंद्रायणी आणि दक्षिणेस मुळा नदी आहे. या तीनही नद्यांना मिळणारे १४४ नाले शहरात आहेत. बहुतांश नाले काही भागात बुजवले असून, त्यावर बांधकामे झाली आहेत. काहींची कॉंक्रिटने बांधणी करून, ‘नाला पार्क’ केले आहेत. मात्र, नाल्यांमध्ये उगवलेले गवत, झाडे, झुडपे, नागरिकांकडून टाकला जाणारा राडारोडा, कचरा यामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह आडून पूरस्थिती निर्माण होते. ते टाळण्यासाठी नाल्यांची पावसाळ्यापूर्वी दरवर्षी नालेसफाई केली जाते. या वर्षीही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई, तसेच इतर सर्व कामांना गती देऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम वेळेत पूर्ण करण्याचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी गेल्या महिन्यात सर्व अधिकाऱ्यांना दिला होता. यासाठी सातत्याने स्थळ पाहणी करून पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा होईल आणि रस्ते जलमय होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, तसेच सांडपाणी व पाणीपुरवठा विभागाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, गुरुवारी (ता. ६) ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत बहुतांश नाल्यांची साफसफाई झालेली नसल्याचे आढळून आले.

आयुक्तांनी पाहिलेले नाले
मिल्कमेड बेकरी चिंचवड, आकुर्डी रुग्णालय, बजाज कंपनीसमोरील सबवे, निगडी उड्डाणपूल, माता अमृतानंदमयी शाळा, राधास्वामी सत्संग भवन, बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी उड्डाणपूल धावडे वस्तीकडील उतार, पीसीएमची चौक, आदिनाथनगर, आदिनाथ सोसायटीजवळील महामार्गाचा भाग येथील नाल्यांची, तसेच संभाव्य पाणी साठणाऱ्या भागांची एक जून रोजी आयुक्त शेखर सिंह यांनी पाहणी केली. या भागांची त्यापूर्वीच साफसफाई केलेली होती.

आरोग्य विभागाचा दावा
‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २५, ब-१५, क-२९, ड-१२, इ-१६, फ-१८, ग-९ आणि ह-२० असे १४४ नाले शहरात आहेत. या आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील नाल्यांच्या साफसफाईचे काम पूर्णत्वावर आले असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवणाऱ्या प्रश्नांचे पूर्व नियोजन करण्यात येत असल्याचा दावा महापालिका आरोग्य विभागाने एक जून रोजी केला होता. मात्र, अद्याप काही नाल्यांची साफसफाई झालेली नसल्याचे गुरुवारी आढळून आले.

शहरातील नालेसफाई शंभर टक्के झाली आहे. नाले स्वच्छ आहेत. त्यांच्या कडेला गवत किंवा झुडुपे असतील. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके नियुक्त केली आहेत. त्यांच्या माध्यमातून कामे सुरू आहेत.
- यशवंत डांगे, सहायक आयुक्त, महापालिका

गुरुवारी आढळलेली स्थिती
मोशी नाला
मोशीतील छत्रपती संभाजी महाराज भाजी मंडईलगतच्या नाल्यात गवत, झुडुपे व वेली वाढलेल्या आहेत. नाल्यामधूनच भूमिगत सांडपाणी वाहिन्या टाकलेल्या आहेत. त्यांच्या चेंबर्सची झाकणे तुटलेली आहेत. नाल्यात कचरा व काही प्रमाणात राडारोडाही टाकलेला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह आडून फुगवटा होऊ शकतो. या भागात मोशी-आळंदी रस्त्याचा सखल भाग असल्याने रस्त्यावर पाणीही साचते. त्यालगतच मंडई व छोटी दुकानेही आहेत.
(24297)

सेक्टर ११ प्राधिकरण
नवनगर विकास प्राधिकरण सेक्टर ११ मधील नाला इंद्रायणी नदीला मिळतो. नाल्यातच मोठी झाडे-झुडुपे व गवत वाढलेले आहे. नाल्याच्या एका बाजूस नेक्सस इम्पेरिया सोसायटीची संरक्षक भिंत असून, दुसऱ्या बाजूस गृहरचना प्रकल्पाचे काम सुरू आहे. नाला खूपच अरुंद व खोल आहे. त्यातच भूमिगत सांडपाणी वाहिन्यांचे चेंबर आहेत. त्यामुळे प्रवाह आडून लगतच्या सोसायट्यांच्या वाहनतळावर पाणी शिरू शकते.
(24294)

मोरवाडी नाला
मोरवाडी नाल्याला लालटोपीनगर येथे तीव्र उतार आहे. त्यात कचरा टाकू नये, यासाठी लोखंडी जाळी लावली आहे. तरीही मोठ्या प्रमाणात कचरा टाकलेला आहे. नाल्यातच सांडपाणी वाहिन्यांचे चेंबर असून, गवत व झुडपे वाढली आहेत. एम्पायर इस्टेट सोसायटीलगत कॉंक्रिटीकरण करून नाला बांधणी केली आहे. दोन वर्षापूर्वी नाला तुंबून सोसायटीतील रो-हाउसमध्ये पाणी शिरून परिसराला तलावाचे स्वरूप आले होते. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नालेसफाई आवश्यक आहे.
(24296)
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com