याचिका दाखल केल्यामुळे 
सुरक्षारक्षकांची वेतन कपात
न्यू थेरगाव रुग्णालय ः ठेकेदाराविरूद्ध संघटनेची तक्रार

याचिका दाखल केल्यामुळे सुरक्षारक्षकांची वेतन कपात न्यू थेरगाव रुग्णालय ः ठेकेदाराविरूद्ध संघटनेची तक्रार

पिंपरी, ता. ६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या न्यू थेरगाव रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाने निर्धारित केलेल्या २७ हजार ६२० वेतनाऐवजी केवळ १६ हजार १०० रुपये मासिक वेतन दिले जात आहे. या विरोधात कामगारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे चिडलेल्या ठेकेदाराने सुरक्षा रक्षकांच्या पगारातून दर महिन्याला तीन दिवसांचा पगार कपात करण्यास सुरवात केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात भारतीय सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन (इंटक) या संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गरुड यांनी म्हटले आहे की, सुरक्षा रक्षकांनी पुणे जिल्हा सुरक्षा मंडळात नोंदणी केली व भारतीय सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन (इंटक) या संघटनेचे सभासद झाले. न्यू थेरगाव रुग्णालयात महापालिकेने नेमलेल्या सुरक्षा रक्षकांनी ठेकेदार मे. नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात
याचिका दाखल केली. त्यामुळे चिडून जाऊन, ठेकेदाराने महिन्याला तीन दिवसांचा पगार कपात करायला सुरवात केली.
राज्य सरकारने स्थापन केलेल्या पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने सुरक्षारक्षकांचा मासिक पगार २७ हजार ६२० रुपये निर्धारित केला आहे. मात्र, ठेकेदार त्यांना १६ हजार १०० रुपये देत आहे. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर ठेकेदाराने पुन्हा तीन दिवसांचा पगार कपात करायला सुरवात केली. सुरक्षा रक्षकांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. कमी दिलेले वेतन व वेतनातून केलेली कपात अन्यायकारक आहे. याबाबत विचार करून, बैठक लावावी, वेतन दराबाबत योग्य ते आदेश द्यावेत व त्यांचा कपात केलेला पगार त्यांना मिळवून द्यावा, अशी मागणी कामगार संघटनेने कामगार उपायुक्तांकडे केली आहे.

‘‘सुरक्षा रक्षकांनी महापालिकेकडेही तक्रार केलेली आहे. याबाबत सुरक्षा विभागाकडून माहिती मागवली आहे. चौकशी करून सुरक्षा विभागाकडून कागदपत्रांची पूर्तता करणार आहे. चौकशीतून जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कार्यवाही करणार आहोत.
- प्रमोद जगताप, कामगार कल्याण अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

‘‘या प्रकरणाची आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली असून, त्या विभागाचे क्षेत्रीय सहायक कामगार आयुक्तांकडे तक्रार वर्ग केली आहे. याबाबत लवकरच सुनावणी होऊन दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- अभय गीते, कामगार उपायुक्त, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com