बनावट कपडे विक्रीप्रकरणी 
तीन दुकानदारांवर गुन्हा

बनावट कपडे विक्रीप्रकरणी तीन दुकानदारांवर गुन्हा

पिंपरी : बनावट कपडे विक्रीप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पिंपरीतील मेनबाजार येथील अकशा ड्रेसर्स, प्रगती ड्रेसर्स व एवन ड्रेसर्स येथे करण्यात आली. अफसर अली नसरुद्दीन शेख (वय ३३, रा. सुभाषनगर, रिव्हर रोड, पिंपरी), आकाश राजेश जेवरानी (वय ३२, रा. वैभवनगर, पिंपरी), माजीद अहमद शेख (वय ३५, रा. सहकार कॉलनी, ज्योतिबानगर, काळेवाडी, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेंद्र सोहन सिंग (रा. कसबा पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी त्यांच्या दुकानात फिर्यादी यांच्या कंपनीचे स्वामित्व असलेल्या प्युमा कंपनीचे बनावट टी शर्ट, शॉर्ट पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट विक्री करताना व विक्रीसाठी ठेवल्या असताना आरोपी मिळून आले. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
चिखली : बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने रूपेश संजय सोनकडे (वय २४, रा. गोपाळवस्ती, सोलापूर रोड, मांजरी, पुणे) याला अटक केली. ही कारवाई चिखली, स्पाईन रोड येथील राजे शिवाजीनगरमधील आर. डी, अपार्टमेंटजवळ करण्यात आली. आरोपीकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार ५०० रुपये किमतीचे एक पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केले.

बनावट आधार कार्ड बनवून बँकेची फसवणूक
पिंपरी : बनावट आधार कार्ड तयार करून व पॅन नंबरचा वापर करून बँकेतून पर्सनल लोन घेत त्याची परतफेड न करता बँकेची ४७ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार निगडी, भेळ चौकातील कोटक महिंद्रा बँकेत घडला. याप्रकरणी बँकेचे ब्रांच ऑपरेशन मॅनेजर मंगेश जानराव मराठे (रा. फेज १, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठ खातेदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी अन्य व्यक्तींचे पॅन नंबर वापरून त्याप्रमाणे बनावट आधार कार्ड तयार केले. आधार कार्ड व पॅन नंबरचा वापर करून कोटक महिंद्रा बँकेत डिजिटल पद्धतीने खाते सुरू केले. त्याद्वारे क्रेडिट कार्डचा वापर केला तसेच पर्सनल लोन घेतले. त्याची परतफेड न करता कोटक महिंद्रा बँक, शाखा, निगडी यांची ४७ लाख ३ हजार ९४८ रुपयांची फसवणूक केली.
-------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com