‘लाडक्या बहिणी’च्या मदतीतून जपली ‘मैत्री’

‘लाडक्या बहिणी’च्या मदतीतून जपली ‘मैत्री’
Published on

पिंपरी, ता. २७ ः राज्य शासनाने जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण’ या योजनेचा लाभ सध्या लाखो महिलांना मिळत आहे. मात्र, या योजनेच्या माध्यमातून रोजगार मिळवून बचतगटातील महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. वाल्हेकर वाडीतील मैत्री स्वयंसहायता महिला बचत गटातील सदस्यांमुळे शहरातील गरजू महिलांपर्यंत योजना पोचून त्यांना ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण’ योजनेचा फायदा मिळत आहे.

महाराष्‍ट्र शासनाने जून महिन्यात ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण’ या योजनेची घोषणा केली. या योजनेचा लाभ कोणाला होणार इथपासून ते या योजनेचे फॉर्म कुठे भरायचे, कसे भरायचे, त्यासाठी कोणती कागदपत्र लागतील असे अनेक प्रश्‍न महिलांच्या समोर उभे राहिले. हे फॉर्म भरण्यासाठी अनेक एजंटांचाही सुळसुळाट झाला. हे टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने या योजनेचे अर्ज भरण्याचे काम शहरातील बचत गटातील महिलांना दिले. शहरातील बहुतांश बचतगट हे सर्वसामान्य व कमी उत्पन्न गटातील महिलांकडून चालविले जातात. त्यामुळे या महिलांना रोजगार मिळावा तसेच, त्यांच्या परिसरातील गरजू महिलांपर्यंत या योजनेची माहिती पोचावी यासाठी बचत गटांची निवड या कामासाठी करण्यात आली. या कामासाठी प्रति अर्ज पन्नास रुपये मानधन देखील देण्यात येत आहे.

घरातील कामे सांभाळून आपल्या वेळेत अर्ज भरण्याचे काम असल्याने बचत गटांतील महिलांना हे काम करणे शक्य झाले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांची निवड करण्यात आली. हे काम कसे करायचे यासाठी त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. गेल्या दीड महिन्यात हजारो अर्ज भरून महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात मदत केली आहे. दुसरीकडे या महिलांच्या कुटुंबालाही कामामुळे आर्थिक हातभार लागत आहे.

‘आम्ही गेल्या वर्षी बचत गटाची स्थापना केली. यापूर्वीही महापालिकेच्या विविध कामांसाठी आमची नेमणूक करण्यात आली होती. माझी लाडकी बहिण योजनेचे काम जुलै महिन्यात आम्हाला मिळाले. सुरुवातीला आम्ही दिवसभरात पन्नास पेक्षाही अधिक फॉर्म भरले आहेत. सध्याही हे काम सुरु आहे. या कामाचे आम्हाला प्रशिक्षण देण्यात आले.
- स्मिता बोलके, अध्यक्षा, मैत्री स्वयंसहायता महिला बचत गट

‘मी स्थापनेपासूनच या बचतगटाची सदस्या आहे. या कामामुळे आम्हाला घराबाहेर पडून काहीतरी करण्याचा आत्मविश्‍वास मिळाला आहे. या कामामुळे अर्थार्जन तर होतेच मात्र, महत्त्वाच्या योजनेचा लाभ महिलांना मिळावा यासाठी आम्ही कार्यरत आहोत याचे वेगळेच समाधान आहे.’
- सोनाली चवरे, खजिनदार, मैत्री स्वयंसहायता महिला बचत गट

‘लाडकी बहिण योजनेचा लाभ अनेक महिलांना मिळत आहे. हा लाभ त्यांना मिळवून देण्यात आमचाही हातभार लागत आहे. ही भावना अतिशय आनंदाची आहे. घरोघरी जाऊन महिलांचे अर्ज भरून घेण्यामध्ये काही अडचणी आल्या मात्र, त्यानंतर काम सुरळीत झाले.’
- प्रियांका कुरळे, सदस्य, मैत्री स्वयंसहायता महिला बचत गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com