सण, उत्सव शांततेत होण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज

सण, उत्सव शांततेत होण्यासाठी 
पोलिस यंत्रणा सज्ज
Published on

पिंपरी, ता. ३० : आगामी सण, उत्सव शांततेत साजरे होण्यासाठी पोलिस आयुक्तालय स्तरावर लोकप्रतिनिधी आणि मध्यवर्ती शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आगामी सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस सज्ज असल्याचे सांगितले.
निगडीतील पोलिस मुख्यालय येथे झालेल्या या बैठकीस पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, आमदार दिलीप मोहिते-पाटील, उमा खापरे, अमित गोरखे व शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते.

आमदार अमित गोरखे म्हणाले, ‘डी. जे. आवाजाचा महिलांना जास्त त्रास सहन करावा लागतो, त्यावर पोलिसांनी लक्ष द्यावे. आमदार उमा खापरे यांनी रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत महिला एकटी असेल तर पोलिसांची मदत घ्यावी, तसे पोस्टर लावावेत, अशी सूचना केली. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. गणेश विसर्जनासाठी कृत्रीम तलाव तयार करण्याबाबत मुद्दे उपस्थित केले.

नागरिकांचे सहकार्य मिळावे
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे म्हणाले, ‘मागील काळात सण उत्सवादरम्यान सर्व पिंपरी-चिंचवडकरांचे सहकार्य मिळाले. तसेच नागरिक शांतता कमिटी सदस्य यांचे बहुमोल सहकार्य लाभले. यापुढेही सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतो. आमदार यांनी गणेश उत्सव स्थापना, विसर्जन, वाहतूक नियोजन, गर्दी नियोजनाबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. नागरिकांनी ‘एक गाव, एक गणपती’ असे उपक्रम राबवावेत. ज्या ठिकाणी मनुष्यबळ कमी आहे, तिथे मनुष्यबळ वाढवले आहे. ईद ए मिलाद सणाच्या अनुषंगाने चांगले सहकार्य मिळावे, तसेच इतर सर्व गोष्टींबाबत काही वाटल्यास माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.

पोलिस घालणार गैरप्रकारांना आळा
आगामी गणपती, गणेश विसर्जन अशा सर्व सणांसाठी पोलिसांच्या बैठका सुरू आहेत. यामध्ये गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था व मंडळांवर नियंत्रण याचे नियोजन करण्यात येत आहे. याबरोबरच गर्दीच्या काळात सोनसाखळी चोरी, वाहन चोरी किंवा इतर गुन्हे घडू नयेत यासाठी पोलिस यंत्रणा डोळ्यात तेल ओतून काम करणार आहे. नागरिकांनी याकाळात कोणताही गैरप्रकार त्यांच्या निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

पोलिसांनी मांडलेले मुद्दे
- गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था व मंडळांवर नियंत्रणाचे नियोजन
- गर्दीच्या काळात सोनसाखळी चोरी, वाहन चोरी किंवा इतर गुन्हे घडू नयेत यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज
- मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी मिरवणूक मार्ग व विसर्जन घाटांवर मोठा बंदोबस्त
- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत दीड हजार पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळांना परवानगी
- कोणताही गैरप्रकार त्यांच्या निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावे
------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com