‘वायसीएम’मधील डायलिसिस युनिटच ‘डायलासिसवर’ वायसीएम मधील डायलासिस युनिटच डायलासिसवर

‘वायसीएम’मधील डायलिसिस युनिटच ‘डायलासिसवर’
वायसीएम मधील डायलासिस युनिटच डायलासिसवर
Published on

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३० ः महापालिकेच्या कै. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील नेफ्रोलॉजी विभागाच्या अंतर्गत डायलिसिस युनिट २०१४ पासून सुरू आहे. मात्र, डायलिसिस मशिन केवळ नऊ असून, त्यातील एक मशिन बंद आहे. दिवसेंदिवस मूत्रपिंड (किडनी) रुग्णांच्या संख्येत २०२१ च्या तुलनेत या २०२३ मध्ये दुपटीने वाढ झाली आहे. हे युनिट अपुरे पडत असल्याने तीस रुग्ण सध्या डायलिसिससाठी ‘वेंटींग’वर आहेत. परिणामी, डायलिसिस युनिटच ‘डायलासिस’वर असल्याचे दिसून येत आहे.
बदलती जीवनशैली खाण्या-पिण्याच्या वाईट सवयांमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, याचा सर्वाधिक परिणाम हा किडनीवर होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. दुसरीकडे वायसीएममध्ये आरोग्य सेवा पुरविण्यात महापालिका कमी पडत असल्याचा प्रत्यय डायलिसिस युनिट’कडे पाहून येतो. रात्री ‘इमर्जन्सी केस’मध्ये डायलिसिसची गरज पडते. त्यामुळे हे युनिट २४ तास सुरू असते. पण डायलिसिस मशिनची संख्‍या कमी असल्याने रुग्णांचे हाल होतात. या युनिटचा विस्तार करून मशिनची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने होत असूनही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. महापालिकेने सहा मशिन खरेदी केल्या असून तीन मशिन सामाजिक संस्थांनी दान केल्या आहेत. या वर्षात चार हजार ९६९ रुग्णांवर डायलिसिस उपचार घेत आहे.

डायलिसिस युनिट डॉक्टरविना
नेफ्रोलॉजी विभाग एक वर्षापासून विशेषतज्ज्ञ डॉक्टर विना सुरू आहे. डायलिसिस युनिटलाही डॉक्टर नियुक्त केले नसल्याचे प्रशासन सांगत आहे. डायलिसिस टेक्निशियन सहा असून, त्यापैकी तीन मानधन व तीन बीव्हीजी खासगी संस्थेचे आहेत. परिचारिका (नर्स) आठ असून, त्यामध्ये कायम तीन, मानधन तीन व एक बीव्हीजी संस्थेचा एक, एएनएम तत्त्वावर एक आहे.

डायलिसिससाठी धावपळ
पाच हजार कोटी रुपयांचे बजेट असलेल्या महापालिकेने अत्यावश्‍यक डायलिसिस मशिन खरेदी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे साधारणपणे आठवड्यातून दोन किंवा तीन वेळेस चार तासांचे डायलिसिस करणे गरजेचे आहे. मात्र, ‘वायसीएम’मधील डायलिसिस युनिटमध्ये वेटिंग असल्याने रुग्णांना इतर सेंटरमध्ये धावपळ करावी लागत आहे.

डायलासिसला किती खर्च येतो?
वायसीएममध्ये डायलासिसचा खर्च चारशे रुपये येत असून, खासगी युनिटमध्ये डायलिसिससाठी अडीच ते तीन हजार रुपये येतो. त्यामुळे गरीब, सर्वसामान्य रुग्णांना आठवड्याला साडेसात ते नऊ हजार रुपये खर्च करणे शक्य नाही. त्यामुळे ते सरकारच्या डायलिसिस युनिटमध्ये येतात.

डायलिसिस म्हणजे काय?
किडनी हा मानवाच्या सर्वांत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक अवयव आहे. डायलिसिस ही रुग्णांना त्यांचे रक्त फिल्टर करून कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्यास मदत करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा मूत्रपिंड निकामी होतात किंवा योग्यरीत्या काम करणे थांबवितात, तेव्हा डायलिसिसचा वापर रक्त स्वच्छ करण्यासाठी आणि शरीराची प्रणाली रासायनिकदृष्ट्या संतुलित ठेवण्यासाठी या मशिनचा वापर केला जातो

आकडे बोलतात
वर्ष ः डायलिसिस रुग्ण
२०२१-२२ ः २०७३
२०२२-२३ ः ४७७५
२०२३-२४ ः ४९६९

‘‘नेफ्रोलॉजीसारखे विशेषतज्ज्ञ डॉक्टर महापालिकेच्या रुग्णालयात जाहिरात देऊनही उपलब्ध होत नाही. सध्या ब्रेकडाउनमुळे एखादी मशिन बंद असते. सीएमसी केल्यावर दुरुस्ती केली जाते. ॲडमिट
रुग्णांचे डायलिसिस वेळोवेळी केले जाते. मेंटेनन्स डायलिसिसचे रुग्ण वेटींगवर असतात.’’
- डॉ. अभय दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

महापालिकेच्या थेरगाव रुग्णालय हृदयरोग विभाग नसल्याने डायलिसिससाठी वायसीएममध्ये किंवा ससूनमध्ये जाण्यास सांगितले. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात गेल्यावर डायलिसिससाठी वेटिंग असल्याचे सांगण्यात येते.’’
- संभाजी जगधने, काळेवाडी, नातेवाईक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com