

पिंपरी, ता. १५ : मध्य प्रदेशमधून पिस्तूल आणून त्याची शहरात विक्री करणाऱ्यासह पाच जणांच्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून सात पिस्तुले आणि १४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
प्रदीप उर्फ अक्षय बाळासाहेब ढगे (वय २८, रा. आपटी, ता. शिरूर, जि. पुणे), सूरज अशोक शिवले (वय २४, रा. आपटी, ता. शिरूर, जि. पुणे), नवल वीरसिंग झामरे (वय २३, रा. पेरणे फाटा, ता. शिरूर, जि. पुणे. मूळ रा. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश), कमलेश उर्फ डॅनी कानडे (वय २९, रा. भारतमाता चौक, मोशी, पुणे), पवन दत्तात्रेय शेजवळ (वय ३५, रा. नारायणगाव, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत सुरुवातीला तिघांना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तूल, सात जिवंत काडतुसे, दोन मॅक्झिन जप्त केली. त्यानंतर, तिघांकडे तपास करत आरोपी नवल झामरे हा मध्य प्रदेश राज्यातून पिस्तूल घेऊन येत असून तो पिंपरी-चिंचवड शहरात त्याची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी झामरे याने कमलेश कानडे याच्यामार्फत पवन शेजवळ याला पिस्तुल विकले होते. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. तसेच झामरे याच्याकडून आणखी तीन पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईमध्ये एकूण सात पिस्तुले, १४ जिवंत काडतुसे, दोन मॅक्झिन, एक मोटार असा एकूण १५ लाख ६५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. झामरे याचे मूळगाव मध्य प्रदेश येथील असून तो पिस्तुलांची तस्करी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.