स्वातंत्र्यदिन पुरवणी

स्वातंत्र्यदिन पुरवणी

Published on

तरुणाईने जमजून घ्यावे
भारतीय स्वातंत्र्य...!

मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लहुजी राघोजी साळवे, उमाजी नाईक, नानासाहेब पेशवे यांच्यापासून चाफेकर बंधू, भगतसिंह, राजगुरू सुखदेव यांच्यापर्यंत क्रांतिकारकांची शृंखला अखंडित सुरूच होती. ३० ते ३४ कोटी लोकसंख्या असलेला भारत यात एक ते दोन कोटी संख्या स्वातंत्र्यासाठी झुंझ देत होती. त्यातही दोन गट जहालवादी व मवाळवादी. पण लक्ष एकच पूर्ण स्वातंत्र्य! ते मिळालेही. त्याला आज ७५ वर्षे उलटूनही गेली. पण, हे स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी तरुणाईचे प्रबोधन करण्याची गरज आहे.
- उद्धव वैरट, विद्यार्थी, मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, निगडी

हिंदुस्थानचा जाज्वल्यमान अभिमान म्हणजे वैदिक संस्कृती, परंपरा, देश, धर्म, देव, सुख आणि समृद्धी. पण, त्यांवर चालून आलेली काळी रात्र म्हणजेच भारतावर स्वारीकरून आलेले मोगल, इंग्रज, पोर्तुगीज आदी. अवघा भारत लुटू पाहणाऱ्या हेतूने ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाखाली आलेले ब्रिटीश. कालांतराने जसेजसे सैन्य वाढत होते, अगदी त्याचप्रमाणे सहजतेने वाढत होती, त्यांची राज्यपद्धती, हुकूमशाही आणि गुलामशाही. याच गुलामशाहीच्या त्रासून १० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले. बघता बघता त्याची तीव्रता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरली. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले. लगोलग दिल्लीवर जबरदस्त हल्ला चढवून दिल्लीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना व ब्रिटिश सैन्याला चिरडले. ८१ वर्षांच्या बहादूरशहा दुसरा यांस हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. यामुळे ब्रिटीश सैन्य घाबरले. कंपनीने कुमक मागवून जुलै १८५७ मध्ये कानपूर व दिल्लीवर पुन्हा कंपनी शासन लागू केले. एक नोव्हेंबर १८५८ ला विद्रोह दडपल्यानंतर ब्रिटीश संसदेने संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला. देशातील कंपनीराज संपुष्टात आले. या वर्षभर चाललेल्या चळवळीत ब्रिटिशांचा विजय झाला. परंतु, ती आपली हार नव्हती. तर, ती एक ठिणगी होती. गगनभेदी ज्वाळेची. यातूनच एक एक क्रांतिकारी तयार होत होता. लढण्याची प्रेरणा घेऊन राष्ट्रासाठी जगू किंवा मरू म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत लढत होता. १८५७ ते १९४७ या ९० वर्षांच्या कालावधीत भारत कधी समाधानी नव्हताच. गुलामीची रात्र झोपूच देत नव्हती. भारताला गुलाम बनवणाऱ्या हेतूने शासनव्यवस्था म्हणजे निव्वळ त्यांच्या राज्यकारभाराचा एकतर्फी निर्णय होता. यासाठीच १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लहुजी राघोजी साळवे, उमाजी नाईक, नानासाहेब पेशवे आदी सक्रीय सहभागी होते. ब्रिटीश सरकारने ज्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हटले असे लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशनचे प्रमुख चंद्रशेखर आझाद, वासुदेव बळवंत फडके अशी कित्येक नावे आणि जीवन या स्वातंत्र्य लढ्यात आहेत. अवघे अवघे प्रेरणा घेत होते, स्वातंत्र्याची आणि यातूनच घडत होते नवीन तरूण क्रांतिकारी जसे चाफेकर बंधू, भगतसिंह, राजगुरू सुखदेव आदी. क्रांतिकारकांची ही शृंखला अखंडित सुरूच होती. ३० ते ३४ कोटी लोकसंख्या असलेला भारत यात एक ते दोन कोटी संख्या स्वातंत्र्यासाठी झुंझ देत होती. त्यातही दोन गट जहालवादी व मवाळवादी. पण लक्ष एकच पूर्ण स्वातंत्र्य!

विन्स्टन चर्चिल म्हणतात...
क्रांतिकारकांच्या देहाच्या आहुत्या ज्या ज्या वेळी या स्वातंत्र्याच्या आग्निकुंडात वाहिल्या गेल्या, त्या त्या वेळेस त्याच गगन भेदी ज्वलंत अग्नितून प्रकाशली १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याची तेजोमय सुवर्ण प्रभात!
सर विन्स्टन लिओनार्ड स्पेन्सर-चर्चिल (तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान) यांचे भारतीय स्वातंत्र्याबाबतचे विधान विचार करायला लावणारे होते. ते म्हणतात, ‘‘If Independence is granted to India, power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders will be of low calibre and men of straw. They will have sweet tongues and silly hearts. They will fight amongst themselves for power and India will be lost in political squabbles. A day would come when even air and water would be taxed in India.’’
म्हणजेच, भारताला स्वातंत्र्य मिळाले, तर सत्ता बदमाश, फुकट चालवणाऱ्यांच्या हातात जाईल. सर्व भारतीय नेते कमी क्षमतेचे आणि भुसभुशीत पुरूष असतील. त्यांना गोड जीभ आणि मुर्ख हृदये असतील. सत्तेसाठी ते आपसात भांडतील आणि भारत राजकीय भांडणात हरवून जाईल. असा दिवस येईल जेव्हा भारतात हवा आणि पाण्यावरही कर लावला जाईल. याची सत्यता नागरिकांना मान्य करावीच लागेल. चारचाकी गाडी घेताना मूळ किंमत यावर कर बसतो आणि तरीही रस्त्याचा टोल म्हणून पुन्हा एक ठराविक रक्कम आपल्याला मोजावीच लागते- हे पारतंत्र्य.

न्याय, स्वातंत्र्य की संधी?
भारतीय राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा भारताच्या विकसितपणाला रोखू पाहत आहे. ‘भारतीय संविधान’ पण या संविधानाचा फायदा कोणता? न्याय, स्वातंत्र्य की संधी?
न्याय ः न्याय व्यवस्थेची मूर्ती काहीच न पाहता नि:शब्द उभी असते, वकिलांची लाखो रुपयांची फी, असत्य व लबाडी बोलून न्यान व्यवस्थेचा केलेला अपमान. ह्याला न्याय म्हणता येणारं नाही.
स्वातंत्र्य ः ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य बदल करून ‘सदनिग्रहणाय खलरक्षणाय’ असे केलें तर वावग ठरणार नाही. वाढतं चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती, दिवसा होणारें महिला वर्गावर अत्याचार या सर्वांना खुलेआम स्वातंत्र्य आहे. त्यांना पायबंद घालण्यासाठी शासन प्रयत्नशील नाहीच! याउलट गुन्हेगारांनी पोलिस व्यवस्थेला पैसे खाऊ घालून दृष्टिहीन केले आहे. यामुळे गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी सज्जन माणसाला पोलिस, पोलिस व्यवस्थेचा वट दाखवत भीती घालतात. नागरिकांना भासणारी ही असुरक्षितता हेच पारतंत्र्य.
संधी ः सामान्य वर्गातील विद्यार्थांना शिक्षण आणि नोकरीची संधी? राजकीय लोकांनी स्वतःभोवती केलेले कुंपण पाहता, विकास होणार तो त्यांचाच. ते कुंपण तोडून स्वतःचा विकास करण्याची इच्छा असेल, तो त्याला गरज लागेल पैशांची. राज्यकर्त्यांचीच मुले राज्यकर्ते, राज्यकर्त्यांचीच मुले विदेशी शिक्षण घेण्यास पात्र, कारण उच्च वर्गाकडे पैसा, संपत्ती जास्त, श्रीमंत तो श्रीमंत गरीब तो गरीबच. विद्यालयांची फी तर लाखोंमध्ये, गावामध्ये सरपंचपदासाठी निवडणूक लढवण्यासाठी ४० ते ५० लाख कमीत कमी हवेच. आपला विचार थोड्याकाही पैशांपुढे गहाण ठेवायचा हीच तर लाचारी. हेच दृश्य पाहता चर्चिलांचे विधान सत्य ठरत आहे. स्वातंत्र्य, न्याय, संधी, सामान्य वर्गाला आहे का? याचा फायदा होतो आहे का? हेच पारतंत्र्य आहे. यातून मुक्त होऊन विकास घडवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.

ब्रिटीश राजनिती आजही?
‘फोडा आणि राज्य करा’ ही ब्रिटीश शासन पद्धत अजूनही असल्याची दिसते. सर्व वर्गांतील, जातीतील, लोक एकत्र येण्यास तयार नाहीत. ज्या वेळेस ते एकत्र येऊ पाहतात, त्याच वेळेस होते जातीचे राजकारण आणि मतभेद. हेच तर खरे स्वातंत्र्य हवे आहे, जिथे न्यायव्यवस्था, स्वातंत्र्य आणि संधी यांना सत्यतेची वाटचाल असेल. या गुलामीतून बाहेर पडणे अवघड आहे, पण अशक्य नाही. या गुलामीची सर्वात मोठी झळ बसते ती तरूण वर्गाला. या सर्व राजकारणात भरडला जातोय तो तरुण. सध्या मुलींचाही सज्जन व गरीब शेती करणारा मुलगा याला विवाहासाठी नकार देत आहेत. अडलेली शैक्षणिक, व्यावसायिक, नोकरी क्षेत्रातील संधी, कमी वयात लाखो आणि करोडो रुपयांची लालसा. बेरोजगारी, वयासोबत वाढत असलेली अवैचारिक पातळी. आजूबाजूचे वातावरण, संगत, समाजाचे होणारे आघात, नैराश्यता, अपयश, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप अशा असंख्य सोशल मीडियाद्वारे नवनवीन व्यसनांची जाहिरात बाजी. इतकेच नव्हे तर ज्यांना भारत सरकारने पद्मश्रीने पुरस्कृत कले आहे असे सिनेमा सृष्टीतील अभिनेता, अभिनेत्री ही याची जोरदार जाहिरात बाजी करताना दिसतात. याचाच प्रभाव म्हणजे विद्यालयीन युवक युवती याचेच अनुकरण करतात. शासन व्यसनांना पायबंद घालत नाही, त्यांची जाहिरात करते. याचमुळे तरुणाई वळण घेते व्यसनाधीनतेकडे. व्यसन हेच मोठे पारतंत्र्य आहे. या व्यसनांच्या गुलामीतून जो बाहेर पडला तो स्वतंत्र. यासाठीच पालकांनीच सतर्क राहणे गरजेचे. या सर्व बाबींचा तरुणांच्या आयुष्यावर होणारे वारंवार आघात, याचाच परिणाम आपले अस्तित्व विसरून व्यसनांच्या अधीन होऊन नको नको ते कृत्य करण्यास माघार न पाहणारी तरुणाई, इंग्रजी नववर्ष स्वागताला कित्त्येक अपघात, महिला वर्गावर होणारे अत्याचार याला कारणभूत म्हणजे व्यसने. यात दारू, व्यसनाधीन झालेली पिढी राष्ट्रकार्याला प्राधान्य देत नाही, ही शोकांतिका आहे.

राष्ट्र प्रथम विचार व्हावा!
राष्ट्र प्रथम हा विचार आपण सर्व जागे करूया, यासाठी तरुणाई मद्य धुंदीत नसावी. दारू, सिगारेट, तंबाखू आणि विशेष फोन हेही आपण व्यसन मानतो आहे. जर उद्याचा भारत सशक्त आणि धोरणी पाहायचा असेल तर आजचे वास्तव पाहता आपला पाल्य हा व्यसनांपासून कसा दूर ठेवता येईल हा विचार प्रत्येक माता-पित्याने करायला हवा. बाह्यक्षत्रूवर विजय मिळवणे शक्य आहे, परंतु अंतर्गत क्षत्रुवर अशक्य. अंतर्गत क्षत्रू म्हणजे व्यसनांमुळे झालेले असंख्य रोग. हा तरूण व्यसनांच्या पारतंत्र्यात आहे. व्यसन हेच मोठे पारतंत्र्य आहे. तरूण जेव्हा व्यसनाधीनते पासून दूर राहून उज्वल भवितव्याचा विचार करतील. त्याच बरोबर देशभक्ती जागृत ठेवतील. समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून काम करतील. स्वतः पुढे चालून समाजाला योग्य दिशा देतील, तेव्हा कुठे हा भारत खऱ्या स्वातंत्र्याला पात्र ठरेल.

व्यसनमुक्त तरुणाईसाठी..
व्यसनाधिन झालेली ही पिढी व्यसनमुक्त करण्यासाठी १९९९ रोजी युवकमित्र गुरुवर्य ह. भ. प. बंडातात्या महाराज कराडकर यांच्या मार्गदर्शनाने स्थापित झालेला संघ व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य गेली २५ वर्षे महाराष्ट्र राज्यात विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने, युवकांसाठी किल्ल्यांवर प्रतापी संस्कार सोहळे, गडकोट मोहीम, ३१ डिसेंबर रोजी ‘दारू नको दुध पिऊया’, जागतिक तंबाखूसेवन विरोधीदिन असे अनेक उपक्रम राबवत आहे. व्यसनमुक्ती विषयी जनजागृती करत आहे. हजारो युवकांना व्यसनमुक्त करून सदाचारी करणारा हा संघ, युवकांच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करत आहे. संघाच्या वतीने आम्ही अवघ्या तरूण पिढीला व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन करीत आहोत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com