प्रत्येक दोनशे मीटरवर नियंत्रित आराखडा

प्रत्येक दोनशे मीटरवर नियंत्रित आराखडा

पिंपरी, ता. ९ ः संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अर्थात आकुर्डीत कंट्रोल रुम उभारण्यात येणार आहे. तसेच, शहरातील पालखी प्रवास मार्गाचा नकाशा तयार केला जाणार असून, प्रत्येक २०० मीटर अंतराच्या नियोजनाच्या दृष्टीने नियंत्रित आराखडा तयार करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ३० जून रोजी आळंदी-पुणे पालखी मार्गाने शहरातील चऱ्होली फाटा, चोविसावाडी, वडमुखवाडी, मॅगझीन कॉर्नर, दिघी, बोपखेल फाटा या मार्गाने पंढरपूरकडे जाणार आहे. तर, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २९ जून रोजी आकुर्डीत मुक्कामी राहणार आहे. ३० जून रोजी खंडोबा माळ, चिंचवड स्टेशन, मोरवाडी चौक, पिंपरी चौक, खराळवाडी, वल्लभनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी मार्गे पुण्यात पोहोचणार आहे. या पालखी सोहळा कालावधीत चार ते पाच दिवस वारकऱ्यांचा सहवास शहरात असतो. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उपआयुक्त विठ्ठल जोशी, संदीप खोत, अण्णा बोदडे, रविकिरण घोडके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे आदी उपस्थित होते. वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवासुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. पालखी मार्गामध्ये वारकऱ्यांना गैरसोय होणार नाही याची योग्य खबरदारी घ्यावी, असा आदेश सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिला.

आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना
- पालखी मार्गावर पावसाचे पाणी कोठेही तुंबणार नाही, याची दक्षता घ्यावी
- आपत्कालीन परिस्थितीसाठी नियुक्त पथकांनी आवश्यक ठिकाणी योग्य कार्यवाही करावी
- आकुर्डी येथील पालखी मुक्कामासाठी आवश्यक व्यवस्था करावी
- पालखी मार्गाची वेळोवेळी पाहणी करून खड्डे बुजवावेत
- पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पार्कीगच्या जागी फलक लावावेत
- वारकऱ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांसंदर्भात फलक लावावेत
- पालखी मुक्कामाच्या ठिकाणी कंट्रोल रूम उभारावी
- शहरातील पालखी प्रवास मार्गाचा नकाशा तयार करावा
- रस्त्यांचे काम चालू असल्यास त्या ठिकाणी पक्के बॅरिकेट्स उभारावेत
- मार्गावरील अतिक्रमणे हटवावीत
- स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी

आयुक्त शेखर सिंह म्हणाले...
- वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक सर्वसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत
- मुक्कामाच्या ठिकाणी रस्त्यावरील व पालखी मार्गावरील राडारोडा उचलण्याबाबत आदेश दिले आहेत
- पालखी मार्गावर व कार्यक्रमांच्या ठिकाणी, मुक्कामाच्या व विसाव्याच्या ठिकाणी साफसफाई, जंतुनाशक फवारणी, महिला व पुरुषांकरिता स्वतंत्र फिरते शौचालय आदी नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील
- पालखी मार्ग, तसेच मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन वेंडींग व सॅनिटरी नॅपकीन बर्निंग मशीन ठेवण्यात येणार आहेत
- पालखी मार्गावर वैद्यकीय पथकासह रुग्णवाहिकेची व्यवस्था असेल
- पालखी सोहळा कालावधीत वारकऱ्यांसाठी महापालिकेच्या दवाखान्यात मोफत वैद्यकिय सुविधा २४ तास उपलब्ध असतील, तसेच फिरता दवाखानाही असेल
- पालखी मुक्काम, विसावा, स्वागत कक्ष आणि पालखी मार्गावर योग्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत
- सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्थाही केली जाणार आहे
- महापालिका व इतर आस्थापनांचे अधिकारी आणि पोलिस विभागाशी समन्वय ठेवण्यासाठी वॉकीटॉकी व्यवस्था असेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com