शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून एकाची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून एकाची फसवणूक

पिंपरी : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून एकाची सव्वा चार लाखांची फसवणूक करण्यात आली.
याप्रकरणी पिंपळे सौदागर येथील ४५ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सलीम रामजी, मेलिस्सा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सोशल मीडियावर एक जाहिरात आली होती. त्यामध्ये तुमचे पैसे पाच पटीत वाढवून मिळतील, असे नमूद होते. फिर्यादी यांनी ती लिंक ओपन केली असता ते एका व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन झाले. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी १९ लाख ७० हजार गुंतविले. आरोपींनी त्यांना १५ लाख ४६ हजार रुपये परत केले. मात्र, त्यावरील परतावा न देता फिर्यादीची चार लाख २४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.
--------------------
तीनचाकी टेम्पोच्या धडकेत दोघे जखमी
हिंजवडी : भरधाव तीनचाकी टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना मुंबई-बंगळूर मार्गावर घडली. मानसी प्रवीण काळे (रा. वडाचीवाडी रस्ता, उंड्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीनचाकी टेम्पोचालक सुनीलकुमार पणिलाल रावत (वय ३३, रा. हिंजवडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचा मावसभाऊ सुयश समीर नाईक (वय २३) हे त्यांच्या दुचाकीवरून पाषाण येथून हिंजवडीकडे येत होते. दरम्यान, मुंबई-बंगळूर मार्गावर आले असता भरधाव तीनचाकी टेम्पोने फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांच्या तोंडाला तर त्यांचे भाऊ सुयश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुचाकीचेही नुकसान झाले.
------------------------
अभियंत्याची ऑनलाइन फसवणूक
पिंपरी : अभियंता तरुणाची ऑनलाइनद्वारे नऊ लाख ७४ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नेहरूनगर येथील २७ वर्षीय एका अभियंत्याने फिर्यादी दिली असून, त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादीला एका लिंकमध्ये जॉईन करून घेतले. एका कंपनीच्या लॉगिन पेजवर जाऊन टास्क देत टास्क पूर्ण करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांना जास्त पैशाचे आमिष दाखवून कंपनीने दिलेल्या वेगवेगळ्या बँकेत खात्यावर ऑनलाइन इंटरनेटचा वापर करून नऊ लाख ७४ हजार रुपये पाठवले. मात्र, नंतर फिर्यादी यांना पैसे परत न देता आणखी पैशाची मागणी करून फिर्यादीची फसवणूक केली.
-------------------
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सिद्धार्थ मारुती फुले (वय २२, रा. मोहननगर, चिंचवड, मूळ- मु. पो. आंबेगाव, ता. देवनी, लातूर) याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई चिंचवडमधील रामनगर येथे करण्यात आली. सिद्धार्थ याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले.
-----------------
वृद्धाश्रमासाठी जागा बघून देण्याच्या नावाखाली फसवणूक
पिंपरी : वृद्धाश्रमासाठी जागा बघून देतो, असे सांगून पैसे घेतले. मात्र, नंतर जागेचा व्यवहार पूर्ण न करता समाजसेवक महिलेची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी वानवडी येथील एका समाजसेवक महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार विक्रांत बहल (रा. बिहारी कॉलनी, दिल्ली, मूळ - इटावा, उत्तरप्रदेश) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून वृद्धाश्रमासाठी जागा बघून देतो, असे सांगितले. औंध येथे जागा असल्याचे सांगून त्यासाठी टोकन अमाऊंट म्हणून फिर्यादीकडून वेळोवेळी पैसे घेतले. मात्र, व्यवहार पूर्ण न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. तसेच फिर्यादीने दिलेले पैसे मागितले असता त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
----------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com