रिशांकच्या बोटांची शस्त्रक्रिया यशस्वी
बोटापासून वेगळे झालेले मांस प्लॅस्टिक सर्जरी करून पुन्हा बसविले

रिशांकच्या बोटांची शस्त्रक्रिया यशस्वी बोटापासून वेगळे झालेले मांस प्लॅस्टिक सर्जरी करून पुन्हा बसविले

पिंपरी, ता. १० ः चिखली-कृष्णानगरमधील बारा वर्षाच्या रिशांक बबन राजपूतचा खेळता-खेळता गंभीर अपघात झाला. अवघ्या काही क्षणांत त्याच्या उजव्या हाताच्या बोटाचे मांस वेगळे होऊन जमिनीवर पडले. त्यामुळे फक्त हाड शिल्लक राहिले होते. हा भयानक प्रकार पाहून रिशांकच्या कुटुंबीयांचे सारे अवसान गळाले. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे रिशांकचे बोटापासून वेगळे झालेले मांस प्लॅस्टिक सर्जरी करून पुन्हा बसविण्यात यश आले. यासाठी जागृत नागरिक महासंघाने पाठपुरावा केला.
रिशांकचा अपघात २४ मे रोजी घडला. घटना घडल्यानंतर दोन-अडीच तासांत त्याला महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तत्पूर्वी त्याच्या आईने प्लास्टिक सर्जरीसाठी खासगी रुग्णालयामध्ये धाव घेतली. जवळपास तीन लाखांपर्यंत खर्च त्यांना सांगितला गेला. रिशांकच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हिरावलेले आहे. आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं? या विवंचनेत असताना त्यांच्या मदतीला राजू डोगीवाल आणि जागृत नागरिक महासंघाचे नितीन यादव धावून आले. यादव यांनी तत्काळ मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्याशी चर्चा करून महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी करण्याची विनंती केली.

डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न
अपघात झाला, त्या दिवशी रुग्णालयात प्लॅस्टिक सर्जरीसाठीचा दिवस नव्हता. त्यामुळे उपचारांमध्ये विलंब होण्याची शक्यता होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. गोफणे आणि डॉ. दादेवार यांनी ‘वायसीएम’मधील प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्लास्टिक सर्जन डॉ. दीपक पाटील आणि डॉ. राहुल निकम यांना बोलावून घेऊन, त्याचदिवशी सायंकाळी प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. विभागप्रमुख डॉ. बालाजी धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ३ तास शर्थीचे प्रयत्न करून शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश आले.

केवळ आठ हजारांत शस्त्रक्रिया!
जवळपास ३० दिवस ‘वायसीएम’मध्ये राहून तीन वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करून रिशांकला डिस्चार्ज वेळी केवळ तेरा हजार रुपयांचे बिल झाले. जागृत नागरिक महासंघाचे यादव यांनी पुन्हा डॉ. गोफणे आणि डॉ. दादेवार यांना विनंती करून त्यातून पाच हजार रुपये कमी करायला लावले. फक्त आठ हजार रुपये खर्च या शस्त्रक्रियेसाठी आला.

‘‘उजव्या हाताचे बोट जॉईंटपासून वेगळे झाले होते. पोटाचे मांस काढून शस्त्रक्रिया केली आहे. २१ दिवसानंतर शस्त्रक्रियेमुळे त्याच्या बोटावर मांस व्यवस्थित चढले आहे.’’
- डॉ. दीपक पाटील, प्लास्टिक सर्जन
फोटोः 25245, 25246

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com