‘माऊली’चा संघर्ष महिलांसाठी प्रेरणादायी

‘माऊली’चा संघर्ष महिलांसाठी प्रेरणादायी

अश्विनी पवार ः सकाळ वृत्तसेवा
परी, ता.११ ः कापडी पिशव्या शिवण्यापासून काही महिलांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी विविध ठिकाणी स्टॉल्सही लावले. शासनाच्या ‘वन स्टेशन, वन प्रोडक्ट’ या योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकावर स्टॉल लावायला सुरुवात केली. तेथे कापडी पिशव्यांसोबत खाद्यपदार्थही विकायला ठेवले. पण, काही महिन्यांनी रेल्वेने त्यांना परवानगी नाकारली. मात्र, त्याने खचून न जाता या महिलांनी शहरात विविध ठिकाणी खाद्य पदार्थांचे स्टॉल सुरू केले आणि आपल्यासोबतच इतर महिलांनाही रोजगार मिळवून दिला. ही कहाणी आहे माऊली महिला बचत गटातील महिलांची. त्यांचा संघर्ष सर्वच महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

छोट्या व्यवसायातून मिळविला रोजगार
निगडी प्राधिकरण येथील कविता शर्मा या सुरूवातीला आपल्या सहकारी महिलांसोबत विविध प्रदर्शनांतून खाद्यपदार्थांचा स्टॉल लावत होत्या. मात्र, हे काम प्रदर्शनापुरतेच मर्यादित असल्याने कायमस्वरूपी व्यवसायाच्या त्या शोधात होत्या. तीन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या ओळखीतील महिलांसोबत कापडी पिशव्या शिवून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. बाजारामधून कापड व ज्यूट विकत आणून त्याद्वारे या महिलांनी बॅग शिवण्याचे प्रशिक्षण घेतले व या पिशव्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाचे विविध प्रदर्शने, भीमथडी जत्रा, पवनाथडी जत्रा, आठवडे बाजार या माध्यमातून मार्केटिंग देखील केले. कविता यांना शासनाच्या ‘वन स्टेशन, वन प्रोडक्ट’ या योजनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शहरातील विविध रेल्वे स्थानकांवर स्टॉल लावायला सुरुवात केली. आपल्या विविध उत्पादनांसह खाद्यपदार्थही या ठिकाणी विक्रीस ठेवले. या योजनेत इतर महिलांनाही सहभागी करून घेत त्यांनाही रोजगार मिळवून दिला. दोन वर्षांपूर्वी या महिलांनी माऊली बचत गटाची स्थापना केली. रेल्वे प्रशासनाने मनाई केल्याने स्थानकावरील स्टॉल बंद झाल्यानंतरही या महिला जोमाने कार्यरत असून आठवडे बाजारांसह रोज शहरातील निगडी, आकुर्डी या भागात त्यांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले जात आहेत.

महाविद्यालयाबरोबर सामंजस्य करार
या बचत गटातील महिलांनी आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाबरोबर सामंजस्य करार झालेला आहे. त्याद्वारे या महाविद्यालयात अर्थशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थिनी स्टॉल्सवर इंटर्नशिपसाठी येतात. त्यातून या विद्यार्थिनींना स्टार्ट अप कसे सुरू करायचे ? मार्केटिंग कसे करायचे ? हे प्रत्यक्ष अनुभवता येते. महिलांनाही या विद्यार्थिनींची मदत होते. महाविद्यालयांकडून या बचत गटाला विविध योजनांची माहिती दिली जाते. तसेच प्रदर्शनात स्टॉल लावण्यास प्राधान्य दिले जाते.

मी गेल्या दोन वर्षांपासून बचत गटाशी जोडले गेले आहे. माझा स्टॉल निगडी येथे लागतो. त्यासाठी बचत गटातील महिलांची मदत तर होतेच. मात्र, माझ्या व्यवसायात बचत गटाबाहेरील इतर महिलांनाही माझ्यासोबत काम करता येत आहे. त्यांना अर्थार्जनाचा मार्ग दाखविल्याचे आम्हाला समाधान आहे.
- मीनल भावे, सदस्या, माऊली बचत गट

तीन वर्षांपूर्वी कापडी पिशव्या शिवण्याचा व्यवसाय आम्ही सुरू केला. दोन वर्षांपूर्वी बचत गटाची स्थापना झाली. बचत गटातील सर्व महिलांच्या सहकार्याने आम्ही इथपर्यंत पोचू शकलो आहोत. कोणताही व्यवसाय एकटीने करण्यापेक्षा एकत्र येऊन केला तर त्यात यश मिळते. याचा उत्तम अनुभव आम्हाला आलेला आहे.
- कविता शर्मा, अध्यक्षा, माऊली महिला बचत गट

आमच्या महाविद्यालयाचा माऊली महिला बचत गटाशी सामंजस्य करार झालेला आहे. त्यामुळे, आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आम्ही या महिलांकडे इंटर्नशिपसाठी पाठवतो. त्यामुळे, त्यांना व्यवसायातील बारकाव्यांची माहिती मिळते.
- प्रा. विदुला व्यवहारे, प्राध्यापिका, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी

माझा स्वतःचाही व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी मी नेहमी प्रवास करत असते. त्यातूनच माझी ओळख कविता यांच्याशी झाली. त्यावेळी त्या कचोरीचा स्टॉल लावायच्या. त्यांची मेहनत व धडपड पाहून मी सुद्धा त्यांच्यासोबत कामाला सुरुवात केली. त्यांच्या बचत
गटातही सहभागी झाले. महिला जर एकत्र आल्या; तर कोणत्याही व्यवसायात यश मिळवू शकतात. त्यामुळे, बचत गटाबाहेरील महिलांनाही आम्ही सहभागी करून घेतले आहे.
- दीपा देशमुख, सदस्या, माऊली बचत गट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com