रिक्षांची बेशिस्ती जिवघेणी

रिक्षांची बेशिस्ती जिवघेणी
Published on

पिंपरी, ता. २२ ः प्रवाशांच्या सोईसाठी शहरातील चौकाचौकांत; पीएमपी, एसटी व मेट्रो स्थानकांच्या परिसरात रिक्षा थांबे आहेत. शिवाय, मुख्य चौकापासून पन्नास मीटर अंतरावर रिक्षा उभ्या करू नयेत, अशी सूचनावजा नियमावली दोन वर्षांपूर्वी केली होती. त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे रस्त्यांवरच रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने अपघाताचा धोका संभवतो.
मुंबई-बंगळूर, मुंबई-पुणे, पुणे-नाशिक या महामार्गांसह औंध-रावेत-किवळे, नाशिक फाटा-वाकड, हिंजवडी-चिंचवड-चिखली, काळेवाडी फाटा-चिखली (देहू-आळंदी रस्ता), भोसरी-निगडी टेल्को रस्ता, स्पाइन रस्ता, देहू-चिखली- मोशी- आळंदी रस्ता, आळंदी-पुणे हे प्रमुख व मोठे रस्ते शहरात आहेत. शिवाय, पिंपरी कॅम्प, चिंचवडगाव, आकुर्डी, निगडी, सांगवी, नवी सांगवी, भोसरी, मोशी, थेरगाव डांगे चौक, वाकड, पिंपळे सौदागर या भागात बाजारपेठ आहे. या रस्त्यांवर आणि गावांमधील मुख्य रस्त्यांवर मोठे व वर्दळीचे चौक आहेत. त्यांचा महापालिका, पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग यांनी दोन वर्षांपूर्वी संयुक्तपणे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार रिक्षा थांबे निश्चित करून नियमावली तयार केली होती. त्यांची अंमलबजावणीही सुरू केली होती. बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईही सुरू केली होती. तरीही बहुतांश चौकांमध्ये नियमांकडे दुर्लक्ष करून रिक्षा थांबवल्या जातात. त्याकडे सर्वच विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. शिवाय, २०१७ पासून रिक्षा परवाना वाटप खुला केला आहे. त्यामुळे रिक्षांची संख्या वाढत आहे. सध्या शहरात ३५ हजारांवर रिक्षा आहेत. शिवाय, शहरालगतच्या ग्रामीण भागातून व पुणे शहरातून येणाऱ्या रिक्षांची संख्याही अधिक असते.

उदाहरणे
एक ः मुंबई-पुणे महामार्ग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक (मोरवाडी चौक), पिंपरी ः चौकात मोरवाडी व चिंचवड स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर मेट्रो स्थानकाकडे जाण्यासाठी जिना आहे. मेट्रोचा मुख्य जिना व प्रवेशद्वार महापालिकेच्या प्रवेशद्वारालगत आहे. रिक्षा थांबवू नये, केवळ ‘पॅसेंजर ड्रॉप पॉइंट असे सूचना फलक लावलेले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून जिन्याखाली चौकातच रिक्षा उभ्या केल्या जातात.
दोन ः पुणे-नाशिक महामार्ग, राजे शिवछत्रपती चौक, मोशी प्राधिकरण ः नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर चौकातच रिक्षा उभ्या केल्या जातात. वाहतूक नियंत्रक दिव्यालगतच असे चित्र असते. या ठिकाणी स्पाइन रस्त्याने व वडमुखवाडीकडून येणारी वाहने मोशीकडे वळतात. शिवाय, महामार्गाचा दुभाजक असल्याने संतनगर, सेक्टर चारकडे जाणारे वाहनचालक उजवीकडे वळून यू-टर्न घेतात, त्यामुळे अपघाताची शक्यता आहे

रिक्षा चालक म्हणतात...
रिक्षांची संख्या वाढली आहे. अनेकांना रिक्षाच्या कर्जाचा मासिक हप्ता भरणे शक्य होत नाही. काही जण भाडेतत्त्वावर रिक्षा घेतात. सीएनजी भरण्यासाठी तासनतास पंपासमोर रांगेत रिक्षा उभी करून थांबावे लागते. प्रवासी पळविण्यासाठी स्पर्धा असते. थांब्यांवर रिक्षा थांबलेल्या असताना काही रिक्षाचालक परस्पर प्रवासी घेऊन निघून जातात. त्यामुळे रांगेत थांबलेल्या रिक्षाचालकांचे नुकसान होते. प्रसंगी वादाचे प्रसंग उद्‍भवतात, असे काही रिक्षाचालकांनी सांगितले.

मी म्हाळुंगेला राहायला आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी पिंपरी कॅम्पात आले होते. सोबत लहान मुलगी असल्याने ओला रिक्षा करून आले होते. तसे, कुठेही जायचे झाल्यास मी ओला किंवा उबेर रिक्षानेच प्रवास करते. महिलांच्या दृष्टिने ते सुरक्षित आहे.
- अक्षदा रूम, रिक्षा प्रवासी, म्हाळुंगे

मी नोकरी करून पार्टटाइम रिक्षा चालवतो. शेअर रिक्षा नियमानुसार व शिस्तीने चालविल्यास काहीच अडचण येत नाही. पोलिसही कारवाई करणार नाहीत. आजपर्यंत माझ्या गाडीवर एकदाही दंडात्मक कारवाई झालेली नाही.
- अमोल साबळे, रिक्षाचालक, पिंपरी

महापालिका आणि आरटीओने रिक्षा थांब्याची आखणी करून द्यावी.
तिथे रिक्षा थांबण्यासाठी स्वतंत्र ट्रॅक करून द्यावा. त्यामुळे रिक्षाचालक रांगेत येऊन प्रवासी घेऊन जातील. त्यांना शिस्त लागेल. रिक्षा चालकांनीही नियमांचे पालन करावे.
- काशिनाथ नखाते, संस्थापक अध्यक्ष, कष्टकरी रिक्षा महासंघ

अधिकारी म्हणतात...
आरटीओ, पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी संयुक्तपणे सर्वे केला होता. वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे नियोजन करून रिक्षा थांब्यांसाठी जागा निश्चित केल्या होत्या. त्यानुसार थांबे ठरवून वाहतूक पोलिस कारवाई करणार होते.
- बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, महापालिका

सुरळीत वाहतुकीसाठी रिक्षा थांबे निश्चित केले आहेत. त्यासाठी १४३ ठिकाणे अधोरेखित केली होती. त्याव्यतिरिक्त रिक्षा उभे करणारे, प्रमाणापेक्षा अधिक प्रवाशी बसविणारे, नियमभंग करणाऱ्या जानेवारीपासून आतापर्यंत जवळपास १८ हजार रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे.
- बापू बांगर, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

महापालिका, आरटीओ व पोलिस अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करून भौगोलिक रचनेनुसार रिक्षाथांबे निश्चित केली जातात. मात्र, कुठे थांबावे, किती अंतरावर थांबावे, याबाबत कायद्यात तरतूद नाही. सुरळीत वाहतुकीसाठी रिक्षाथांब्यांबाबत चालकांना संयुक्तपणे सूचना केली जाते.
- सुरेंद्र चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com